हा ब्लॉग शोधा

सोमवार, ७ जून, २०२१

सुबोध


 

सुबोध

 (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा)

माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत राहतात. काहींचा सहवास सातत्याने लाभूनही जवळीक मात्र निर्माण होत नाही. उलट काही लोक सहवासात नसले तरी मनांत घर करून राहतात.

सुबोधला जाऊन आता महिना होत आला तरी ती बातमी खरी नाही, निदान खरी असू नये, असं वाटत राहिलंय. सुबोधशी मैत्रीचं नातं जुळलं ते फार वेगळं होतं. आम्ही परस्परांच्या व्यक्तिगत गोष्टी फारच क्वचित बोललो असू एकमेकांशी. रूढार्थाने ज्याला जीवलग मैत्री म्हणतात तिची लक्षणं ह्या मैत्रीत कुणाला क्वचितच दिसतील. पण तरी त्याच्या जाण्याने काही तरी हरवल्याची जाणीव मनात येतच राहिली. स्मरणं तपासू लागलो तर ह्या जाणिवेचा काही बोध होऊ शकेल असं वाटतं.

इ. स. २००२च्या सुमारास संवाद ह्या वाचकगटाच्या कार्यक्रमात सुबोधची भेट झाली. नेमकी कधी ते आठवत नाही. पण एका कार्यक्रमानंतर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिल्याची नोंद माझ्या दैनंदिनीत आहे. त्या गप्पांत सहभागी असणाऱ्यांत सुबोधचं नाव आहे.

संवाद ह्या वाचकगटाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी मराठी साहित्यावर चर्चेचा कार्यक्रम असे. विषय रोचक असत. सहभागाला कुणालाच कसलीच आडकाठी नव्हती. गटाचं स्वरूप बरंचसं अनौपचारिक होतं. भेटीची जागा तशी माझ्या तेव्हाच्या घरापासून जवळची होती. वरळीच्या नेहरू केंद्राच्या तालीमकक्षात ह्या चर्चेसाठी सगळे जमायचे. सगळंच सोयीचं होतं. त्यामुळे अगदी सहजच मी त्या उपक्रमांना उपस्थित राहू लागलो आणि चर्चेनंतरच्या चर्चेतही.

चर्चेत सहभागी होणारे बरेच असले तरी काही लोक अर्थातच लक्ष वेधून घेणारे होते. संवादची सगळी जमवाजमव सहजपणे करणारे प्रमोद बापट हे तर संवादचं केंद्र आहे हे सहज लक्षात येण्याजोगं होतं. लक्ष वेधून घेणाऱ्यांत एक सुबोधही होता. विषय कोणताही असला तरी त्याच्याकडे त्यातलं वेगळं सांगण्यासारखं काही तरी असायचं. त्याचं वाचन चौफेर होतं. मुख्य म्हणजे ते केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नव्हतं. नियतकालिकांतल्या लेखांचे, दिवाळीअंकांचे संदर्भ त्याच्या बोलण्यात अगदी सहज यायचे. जादुगाराने आपल्या पोतडीतून काही तरी अद्भुत काढून दाखवून आपल्याला मंत्रमुग्ध करावं तसं आपल्या पोतडीतून सुबोध काय काय काढून दाखवायचा. बरं हे सगळं सहज व्हायचं. त्यात आपल्याला किती माहीत आहे हे दाखवण्याचा आव नसायचा. आपलंच ऐकवण्याचा अट्टाहासही नव्हता. इतरांना दाद देण्याचा उमदेपणाही होताच.

संवादच्या ठरलेल्या विषयावरील चर्चेनंतर मोजक्या लोकांच्या गप्पा सुरू होत. सुबोध त्यात असायचाच. पुढेपुढे तर त्या संवादनंतरच्या संवादासाठीच आम्ही भेटू लागलो की काय असं वाटायला लागलं. रात्रीरेव व्यरंसीत असं होऊ लागलं. माझं घर तसं जवळ होतं. पण इतर अनेक जण लांब लांब राहणारे. उपनगरांतले. पण गप्पा अशा रंगायच्या की वेळेचं भानच उरायचं नाही. मार्गाच्या कडेला उभं राहून तासन् तास आम्ही बोलत असू. कधी बंद दुकानांच्या पायऱ्यांवर थोडं टेकतं होत असलो तर तेवढंच.

ह्या काळात सुबोधच्या भेटीगाठी झाल्या त्या मुख्यत्वे संवादच्या निमित्ताने. पण हळू हळू निष्कारणही आम्ही भेटू लागलो हेही आठवतंय. सुबोध हा सतत काहीतरी योजना डोक्यात घेऊनच वावरायचा. संवादच्या सहकाऱ्यांपुढे त्याने एक योजना तेव्हा मांडली होती. पुस्तकांच्या मानाने नियतकालिकांतलं साहित्य वैशिष्ट्यपूर्ण असलं तरी दुर्लक्षित राहतं. त्यामुळे दर तीन महिन्यांनी नियतकालिकांतल्या निवडक साहित्याचा परिचय करून देणारी एक त्रैमासिक पत्रिका टाइम्स लिटररी मॅगझिनच्या धर्तीवर काढावी अशी त्याची योजना होती. ही योजना त्याने ज्यांच्यापुढे मांडली होती ते आम्ही सगळे आपापल्या निर्वाहाच्या कामांत इतके अडकलेले होतो की त्यानंतर त्या योजनेचं काही झालं नाही हे सांगायची आवश्यकता नाही. पण नंतरही सुबोध अशा योजना आखत राहिला आणि सांगत राहिला. बऱ्याचशा योजना बारगळल्या तरीही.

नंतरच्या काळात मी आयाआयटी मुंबईतल्या संगणकविज्ञान आणि संगणकअभियांत्रिकी विभागांतर्गत भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रात काम करत असताना कालांतराने सुबोधही काही काळ तिथे माझा सहकारी म्हणून काम करत होता. तो तिथे कसा लागला ते आठवत नाही. पण तिथे सुबोध आल्यामुळे त्याचा सहवास अधिक मिळाला. तिथल्या मित्रपरिवारात तो अर्थातच मिसळून गेला. ते दिवस खरोखरंच आयुष्यातले फार छान दिवस होतो. मनांत उत्साह होता. आव्हानात्मक अभ्यासविषय होते आणि कडोविकडीचे वाद घालता येतील आणि मनसोक्त चर्चा करता येईल असे सगळे मित्र होते.

तिथे चालणाऱ्या चर्चांत सुबोधच्या मार्मिक टिप्पण्या रंग भरायच्या. ह्या काळात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात आली ती म्हणजे एखादी गोष्ट समजून घेऊन ती नेमक्या शब्दांत मांडण्याची सुबोधची क्षमता. ही क्षमता इतकी अफाट होती की 'सुबोध उवाच' अशा नावाचा संग्रहच काढावा अशी चर्चा आमच्या मित्रांत होत असे.

गणिताचा अभ्यासक असलेल्या आमच्या एका तर्कप्रेमी मित्राचं वर्णन करताना सुबोध म्हणाला, "आपल्या शिडी लागते ती आपल्याला वर जायचं असतं किंवा खाली यायचं असतं ह्यासाठी. पण त्याला शिडीवरून वरखाली करता येतं ह्याचाच आनंद आहे." नीट पाहिलं तर हे वर्णन टवाळकीचं नव्हतं. तर्कबुद्धीकडे पाहण्याच्या आमच्या आणि त्या दृष्टिकोणातलं अंतरही ह्यात अधोरेखित झालं होतं. आम्ही तर्काचा उपयोग साधन म्हणून करत होतो. त्याला तर्काचे आकृतिबंध शोधण्यात रस होता ही गोष्ट सुबोधने नेमक्या शब्दांत सांगितली होती.

सुबोधला अशा गोष्टी सहज दिसायच्या. आमचं काम भाषा आणि संगणक ह्यांच्यातल्या संवादाच्या व्यवस्था तयार करण्याचं होतं. त्यामुळे व्याकरणिक विश्लेषणावर चर्चा व्हायच्या, वाद व्हायचे. एऱ्हवीच्या बोलण्यातही व्याकरणातल्या संज्ञांचा वापर व्हायचा. क्रियापदांचं विश्लेषण करताना काळ, व्याप्ती आणि अर्थ ह्या अनुषंगाने विश्लेषण होतं. इंग्लिशेत ह्यांना अनुक्रमे टेन्स, आस्पेक्ट आणि मूड अशा संज्ञा आहेत. त्यांची आद्याक्षरी टीएएम ह्या अक्षरांनी टॅम अशी होते. तर सुबोधने एकदा मर्ढेकरांच्या कवितेतल्या ओळी आम्हा सर्वांना इ-टपालाने पाठवल्या : "होते, आहे, होइल यांतुन वीज वाहते होण्याचीच". ह्या पत्राला शीर्षक दिलं होतं : "मर्ढेकरांची टॅम कविता".

सुबोधचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक विषयांत रस तर होताच. पण गतीही होती. त्याचं औपचारिक शिक्षण म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयातली पदविका तो उतरला होता. पण त्याची जिज्ञासा पदवीने अडवलेली नव्हती. त्याचं वाचन चौफेर होतं. श्रीनिवास हरि दीक्षितांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' ह्या पुस्तकापासून अमेरिकी कादंबऱ्यांपर्यंत त्याने बरंच काही वाचलं होतं आणि तो सतत वाचतही असायचा. राजीव साने ह्यांची मांडणी त्याला आवडायची. शिक्षणक्षेत्रांतल्या प्रयोगांकडे त्याचं लक्ष असे. डब्ल्यू. टी. सॉयर ह्यांच्या दि व्हिजन इन एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स ह्या पुस्तकातली मांडणी त्याला खूप आवडली होती. आपल्याला आवडलेल्या पुस्तकांविषयी सुबोध इतकं प्रभावी वोलायचा की तो तुमचा विषय असो वा नसो, ते पुस्तक आपण वाचलंच पाहिजे असं वाटायचं.

भाषेची सूक्ष्म जाण असल्याने साहित्यातले बारकावे सुबोधला कळायचे. त्याचं कवितावाचन अर्थवाही असे. त्याच्या कवितावाचनाचं ध्वनिमुद्रण करायला हवं होतं असं आता जाणवायला लागलं. पण आता उशीर झालाय. कवितेतली सौंदर्यस्थळं तो अचूक टिपायचा. शंकर वैद्य ह्यांची 'हा असा पाऊस पडत असताना' वाचताना त्या कवितेतला सगळा मिश्कीलपणा सुबोधच्या वाचनातून ठळक व्हायचा. आयआयटीत असताना एकदा त्याने मंगेश पाडगांकरांच्या प्रेमकविता वगळून इतर कविता वाचण्याचा कार्यक्रम ठरवला होता. त्यावेळी सुबोधने वाचलेली 'सकाळ' ही त्यांच्या विदूषक ह्या संग्रहातली कविता आताही माझ्या कानांत आहे. दया पवारांच्या 'उत्खनन' ह्या कवितेत शेवटच्या "बरे झाले, असे शहर गाडण्याच्याच लायकीचे" ह्या ओळीने साधलेल्या उत्कर्षबिंदूचं रसग्रहण त्याच्याकडूनच ऐकावं असं असे.

एखाद्या विषयात कुतूहल वाटलं की मिळेल त्या मार्गाने त्या विषयाची माहिती मिळवायची त्याची वृत्ती होती. मग तो त्या विषयांतल्या तज्ज्ञांना भेटण्यासाठी प्रयत्न करायचा. 'मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद' ह्या पुस्तकातली मांडणी त्याला आवडल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर ह्यांना भेटण्यासाठी तो पुण्याला त्यांच्या घरी जाऊन पोहोचला. पण त्या वेळी त्यांचं वय झालं होतं. त्यामुळे चर्चा हवी तशी झाली नाही. सुबोधच्या मते ते तेव्हा तर्ककर्कश युक्तिवाद करणारे अभ्यासक राहिल नव्हते तर प्रेमळ आजोबा झाले होते. पण तरी त्यांचे शुद्धलेखनाविषयीचे लेख महाजालावर घालण्यासाठी त्यांची अनुमती घ्यायला सुबोधने खूप साहाय्य केलं होतं.

'संवाद वाचकगटा'च्या विविध उपक्रमांत सुबोधचा सहभागच असायचा असं नव्हे. तो सक्रिय असायचा. बोरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने केलेला एक कार्यक्रम गोव्यात झाला. तो पार पाडण्यात सुबोधने बरंच योगदान दिलं होतं. आमची एकत्र भेटण्यासाठीची जागा नंतर मिळेनाशी झाली तेव्हा सुबोध वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्याच्या युक्त्या सुचवायचा. उपाहारगृहांत, मैदानांत असे प्रयोग करून झाले. नंतर वांद्र्याला त्याच्या ओळखीने एका शाळेतही एक चर्चा झाली. पण नंतर 'संवादभेटी' उणावतच चालल्या होत्या. तेव्हा सुबोधने फेसबुकावर एक गट करून तिथे चर्चा करण्याचा मार्ग सुचवला. त्याने गटही तयार केला.

सुबोधच्या वृत्तीत एक भटक्या होता. त्याच्याविषयी भाकितं करणं कठीण असे. त्याच्या मनात असेल तर तो कुठेही प्रकट व्हायचा. नाही तर त्याची भेट कधी होईल हे सांगता यायचं नाही. तो असला आपल्यासोबत तर आपला असे. नाही तर नाही.

एकदा सुबोध आणि मी नाणेघाटाला जायचं ठरवून निघालो. सकाळी निघून संध्याकाळी परतायचं असा बेत होता. नाणेघाटात पोहोचल्यावर घाटमाथ्यावरून पलीकडे गेल्यावर देशावर जाता येईल हे लक्षात आलं. मग लगेच बेत बदलला. घाटमाथ्यावरच्या एका शेतकऱ्याच्या घरी विचारणा केल्यावर दुपारी जुन्नरला जाणारी एसटीची बस मिळू शकेल हे कळलं. मग ती बस धरून जुन्नरला पोहोचलो. रात्री तिथेच एका धर्मशाळेत राहिलो. दुसऱ्या दिवशी शिवनेरी आणि लेण्याद्री पाहून मगच मुंबईला पोहोचलो.

आपण केलेल्या गोष्टी मिरवत न बसणं हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. त्याने आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या. त्या अनुभवांचं मोलही दिलं होतं. पण त्यांतून त्याच्या गाठीशी बरंच संचितही जमलं होतं. पण हे संचित तो फारसं मिरवत नसे. कधी तरी सहज बोलता बोलता त्याच्या तोंडून काही कळलं तर कळायचं. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातल्या त्याच्या कामामुळे तो किती लोकप्रिय आहे ह्याची कल्पना त्याच्या शोकसभेपर्यंत खऱ्या अर्थाने आलीच नाही. त्याचं कौतुक वाटायचं. पण आदर वाटायला हवा होता हे फार उशिरा जाणवलं.

शिक्षणातला ज्ञानाचा आनंद आणि शिक्षणव्यवस्थेत शिकणाऱ्यांची व्यावहारिक प्रयोजनं ह्या दोन्ही गोष्टींचं सजग भान सुबोधच्या बोलण्यातून दिसायचं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा उतरण्याचे उपाय तो सुचवायचा. परीक्षा उतरणं हे एक तंत्र आहे असं तो अनेकदा म्हणायचा. पण विषय कळण्यासाठी केवळ तंत्र पुरत नाही. गणित आणि विज्ञान नीट शिकता येण्यासाठी विद्यार्थ्याचं किमान एका भाषेवर चांगलं प्रभुत्व हवं अशी त्याची ठाम धारणा होती. विद्यार्थ्यांना सल्ले अनेकजण देत असतील. पण विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यासाठी त्यांनी कोश वापरले पाहिजेत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे पालक आणि कोश प्रकाशित करणारी संस्था ह्यांना एकत्र आणण्याची कल्पना त्यालाच सुचायची.

आता विचार करतो तेव्हा लक्षात येतं की सुबोध मला भेटल्यानंतर तो अनेक ठिकाणी माझ्यासोबत होता. त्यांपैकी अनेक गोष्टींशी त्याचा कोणताही थेट संबंध नव्हता. पण त्याला जिज्ञासा होती आणि तो कर्ता सुधारक होता. मराठी-अभ्यास-केंद्राच्या वतीने आम्ही युनिकोडाची पहिली कार्यशाळा घेतली तेव्हा कार्यशाळेच्या पूर्वतयारीला आदल्या दिवसापासून सुबोध माझ्यासोबत होता. कार्यशाळेच्या दिवशीही होता. अशोक शहाणे ह्यांच्याशी कोलटकरांविषयी गप्पा मारायचा कार्यक्रम ठरला. तेव्हा त्यांना सोबत घेऊन येण्यापासून पुन्हा घरी सोडण्यापर्यंतचं दायित्व सुबोधने आपणहून घेतलं होतं. अर्जुनवाडकरांचे लेख संकेतस्थळावर घालण्यासाठी त्यांच्या अनुमतिपत्रावर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी सुबोध पुण्याला गेला होता. संवाद वाचकगटाने नंतर राबवलेल्या 'आप्तवाक्य' ह्या उपक्रमात सुबोध सहभागी होताच. पण नंतर त्या कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणं घेऊन त्यांतील महत्त्वाचे अंश संकलित करून यूट्यूबेवर घालण्याचा उद्योगही सुबोधनेच केला. त्यासाठीचा पाठपुरावाही तोच करत राहिला.

ह्याच वृत्तीने तो अनेक गोष्टी करत राहिला. त्यातल्या काही त्याच्याकडून कळल्या होत्या. बचतगट चालवायला मार्गदर्शन करणं, दबावगट निर्माण करणं इ. तीन-चार वर्षांपूर्वी त्याने दोन उपक्रम आखले. एक होता गणेशोत्सवांत मराठी शाळांविषयी जागृती करण्याचा. त्यासाठीचे फलक त्याने बनवून घेतले होते. गणेशोत्सवांच्या व्यवस्थापकांना भेटून ते लावण्याची व्यवस्था करणं आणि तिथे जमलेल्या लोकांशी बोलायची संधी मिळवणं अशी दोन कामं करायची होती. मला तरी ह्या कामांत फारसं यश लाभलं नाही. बाकी काय झालं ते माहीत नाही. दुसरा उपक्रम म्हणजे मराठी शाळांत जाऊन मुलांना चांगल्या कविता वाचून दाखवायच्या. त्यासाठी त्याने एका पत्राचा मजकूरही तयार केला होता. ते पत्र घेऊन मीही काही शाळांत गेलो. एकाच शाळेने प्रारंभी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. पण नंतर काहीच नाही. पण सुबोधकडे अशा योजनांची उणीव नव्हती. त्याला आणखीही काय काय सुचतच राहायचं.

लिहिण्यासारखं पुष्कळच आहे. सगळंच लिहिता येईल असंही नाही. त्यातून सुबोध मला जसा दिसला तसाच इतरांना दिसला असेल असं नाही. माणसाच्या जगण्याला अनेक पैलू असतात. त्याचा मला जो मर्यादित सहवास लाभला त्यांत मला ज्या गोष्टी अनुभवता आल्या त्यांत प्राधान्याने एका जिज्ञासू, रसिक, सक्रिय कार्यकर्त्या मित्राची प्रतिमा मला जाणवली. सगळ्यांना सुबोध असाच दिसला असेल असंही नाही.

सुबोधविषयी सांगताना दोन वैयक्तिक प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आयाआयटीत असताना नंतर नंतर कामाविषयीचं असमाधान वाढू लागलं होतं. नवीन असतानाची नवलाई संपली. कोणत्याही नोकरीत आपल्याला हवं तसं सगळं घडतंच असं नाही हे अद्याप उमगलेलं नव्हतं. अशा वेळी सगळ्या असमाधानाचा आणि त्राग्याचा त्रास सहन करावा लागायचा तो सहकाऱ्यांना. आज विचार करताना आपल्या मूर्खपणाचं हसूही येतं आणि आपण मित्रांशी कसे वागलो ह्याची लाजही वाटते. अशाच एका उद्रेकाच्या क्षणी आता आपण ही नोकरी करू नये असं वाटू लागलं. आपण करतोय ते सगळं निरर्थक आहे. हे काम आपल्या योग्यतेचं नाही असं काहीही मनात येऊ लागलं. हे कुणाशी बोललो नव्हतो. पण वर्तन बदललेलं दिसतच होतं. सहकारी आणि मित्र समजूत काढायला आले तर मी त्यांच्याविषयीच गैर समज करून बसलो आणि त्यांनाच दुरुत्तरं केली. खूप चिडचिड करून घेऊन घरी आलो. खूप वाईट मनस्थिती होती. आपण मित्रांशी चुकीचं वागलो ह्याची जाणीव होती. कामावर जावंसंच वाटत नव्हतं. सगळं जगणंच निरर्थक वाटत होतं. अशा वेळी संध्याकाळी प्रमोद बापट आणि सुबोध माझ्या घरी आले. बापटांना सुबोध घेऊन आला होता हे उघड होतं. त्या दोघांनी मला काय समजावलं हे मला आता लक्षातही नाही. पण ती संध्याकाळ आणि त्या दिवशी त्या दोघांचं येणं मी विसरू शकणार नाही.

दुसरा प्रसंग माझे वडील गेले तेव्हाचा. वडिलांची साखर कमी झाल्याने ते कोमात गेले होते. केईएम रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छ्वासावर त्यांना ठेवलं होतं. मी सकाळी त्यांना तिथे दाखल केलं तेव्हापासून रुग्णालयातच होतो. सकाळी त्यांना दाखल करायला नेताना सुबोधचा दूरध्वनी आला होता. तेव्हा केवळ त्याला असं असं झालंय हे सांगितलं होतं. रात्री रुग्णालयात थांबण्यासाठी सुबोध आला. मी त्या दिवशी तिथेच थांबायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला म्हटलं तू घरी जा. पण तो मला सोबत द्यायला तिथेच थांबला. झोप काही होणार नव्हती. तरी त्याने काही काळ आग्रहाने मला झोपायला लावलं. सकाळी मी घरी गेल्यावर आई रुग्णालयात यायची होती. सुबोधने सकाळी माझ्यासाठी खायला आणलं. मला काही खायची इच्छा नव्हती. पण त्याने खूप आग्रह करून दोन घास खायला लावले. मी खात असतानाच वडिलांची प्राणज्योत मालवल्याचं यंत्रांनी दाखवलं. माझा भाऊ मला सांगायला आला. मी जाऊन पाहिलं आणि पायांतलं त्राणच गेलं. पुढचा काही काळ काहीच कळलं नाही. पण ह्या काळात सुबोधने सगळ्या मित्रांना कळवलं होतं. पुढची व्यवस्था लावून मगच तो तिथून निघाला.

ह्या दोन्ही प्रसंगांत सुबोधने माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्यांविषयी त्याने नंतर कधी एक शब्दही काढला नाही. ते त्याचं सहजकर्म होतं.

उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे । 

राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ।।

हे मित्रलक्षण सुबोधने बऱ्यापैकी निभावलं होतं. मला मात्र त्याची परतफेड करता आली नाही.

प्रियजनवियोग ही आयुष्यातली अपरिहार्य घटना आहे हे जाणवण्याच्या वयाच्या टप्प्यावर आता पोहोचलो आहे. वाचनातून, अनुभवांतून आता असे प्रसंग येणं स्वाभाविक आहे ह्याची जाणीवही झाली आहे.  पण ज्याविषयी असा विचारच केला नव्हता अशा कुणाचं तरी अचानक कालवश होणं स्वीकारायला जड जातंच. ०७ जून हा त्याचा वाढदिवस. ह्यापुढे शुभेच्छा देण्याऐवजी स्मरणच करायचंय हे कालौघात उमजून येईलच. 

कालवश व्यक्तींचा उल्लेख करताना वापरण्यात येणाऱ्या धर्मसंबद्ध संज्ञांऐवजी स्मृतिशेष ही इहवादी संज्ञा आम्हा दोघांनाही आवडली होती. सुबोधविषयीच ती वापरण्याचा योग येईल हे मात्र वाटलं नव्हतं.


============================================

सुबोधच्या लेखनाचे आणि भाषणांचे महाजालावरचे दुवे

 

अनुदिनी

लेखन


चित्रफिती

रविवार, २४ जानेवारी, २०२१

'आलोक' : मुक्त नियतकालिक


 मराठीला नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. महाजालाच्या उदयानंतर चर्चापीठासारखा नवा प्रकार आकाराला आला. मनोगत, उपक्रम, मिसळपाव, ऐसी अक्षरे ह्या चर्चापीठांनी मराठी ज्ञानव्यवहारात आणि साहित्यव्यवहारात मोलाची भर घातलेली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दैनिकांच्या महाजालीय आवृत्त्या आणि अक्षरनामासारखी बहु-आशयी लेखस्थळे ह्यांमुळे महाजालावर मराठीचा वावर वाढतो आहे. हाकारासारखं सर्जनशील लेखनाला वाहिलेलं नियतकालिक मराठीत वेगवेगळ्या आशयाची अभिव्यक्ती सुकर करू पाहत आहे. 

ह्या सर्वांच्या जोडीला आता मराठीत 'आलोक' हे नवीन महाजालीय मुक्त नियतकालिक अवतरतं आहे. शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक  असं ह्या नियतकालिकाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की हे नियतकालिक आलोक नित्यमुक्त परवान्या-अंतर्गत वितरित करण्यात आलं आहे. ह्या नियतकालिकात प्रकाशित झालेली सर्व सामग्री मुक्त स्वरूपात (म्हणजे प्रत करून घ्यायला, प्रत करून इतरांना द्यायला, ह्या सामग्रीत बदल करून ती स्वतःसाठी वापरायला अथवा बदल केलेली सामग्री बदलांसह वितरित करायला प्रतिमुद्राधिकार-धारकांची मान्यता आहे. ह्यासाठी योग्य श्रेयनिर्दश करणे आणि बदलांसह सामग्री वितरित करताना ती ह्याच परवान्यांतर्गत वितरित करण्याची अट आहे.)

ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करून देण्याची ही परंपरा मराठीत ह्याआधीही आहे. उदा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे आपल्या पुस्तकांवर कोणतेही हक्क राखलेले नाहीत अशी सूचना छापत असत. पण ह्या मुक्त सामग्रीला वैधानिक स्वरूप देण्याची जी आधुनिक परंपरा रिचर्ड स्टॉलमन ह्यांनी सुरू केली आणि त्यामुळे केवळ मूळ सामग्रीच नव्हे तर तिच्यावर आधारित पुढील सर्व सामग्री-परंपरा मुक्त राहावी ह्यासाठी वैधानिक पद्धतीने परवाना देण्याची जी परंपरा सुरू झाली तिचं अनुसरण मराठीत होतं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

ह्या कालिकात लेखांचं वैविध्यंही पाहण्यासारखं आहे. आधुनिक काळात ज्ञानशाखांतल्या सीमारेषा धूसर होत आहेत आणि वितळतही आहेत. अशा वेळी विविध ज्ञानशाखांवर मराठीत साधार आणि विद्याव्यवहारातील रूढ संकेतांना अनुसरणारं लेखन होत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आलोक ह्या नियतकालिकाचं स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

आलोक ह्या नियककालिकाचं संकेतस्थळ : https://varnamudra.com/aalok/

आलोक ह्या नियतकालिकाचं पहिलं पुष्प : https://varnamudra.com/aalok/pushpa/pahile/


विशेष प्रकटीकरण :

(ह्या नियतकालिकाचे संपादक अस्मादिकांचे मित्र आहेत आणि ह्या नियतकालिकाच्या पहिल्या अंकात अस्मादिकांचं एक टिपणही प्रकाशित झालं आहे.)

 





 

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

प्रश्न स्वातंत्र्याचा असतो !




 संगणकीय सामग्रीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही सामग्री सहज प्रतीकरणीय आहे. म्हणजे संगणकीय स्वरूपात साठवलेलं पुस्तक, ध्वनिमुद्रण, गाणं, छायाचित्र, चलच्चित्र, आरेखन अशी कोणतीही सामग्री असो. तिची प्रत करून घेणं हे सहज शक्य असतं.

प्रतीकरणाच्या प्रयत्नातूनच मुद्रणतंत्र निर्माण झालं. पूर्वी पुस्तकाची प्रत हस्तलिखित स्वरूपात असे. ती यथामूल नकलून घेणं हे अतिशय कष्टाचं काम होतं. अनेक हस्तलिखितांच्या शेवटी हे कष्ट व्यक्त करणारे श्लोक आढळतात ते उगाच नाही. पण मुद्रणतंत्राने प्रतीकरण सोपं केलं आणि त्यामुळे वितरण सोपं होऊन प्रसारही सोपा झाला. ज्ञानेश्वरीच्या प्रती ज्ञानेश्वरांच्या काळी जितक्या असतील त्याच्या कैक पटीने आज उपलब्ध आहेत. ह्याचं कारण मुद्रणतंत्र आहे हे विसरून चालणार नाही.

येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी येशूच्या कथा आणि त्याचा उपदेश ह्यांचा प्रचार मनःपूर्वक केला. त्याला कालांतराने ग्रंथरूप दिलं (शुभवर्तमान). अतिशय कष्टपूर्वक आणि प्रतिकूलतेशी झुंज देत त्यांनी आपला पंथ विस्तारण्याचा प्रयत्न केला. राजसत्तेचं साहाय्य मिळाल्याने हा प्रसार जरी बराच फोफावला असला तरी मुद्रणतंत्राच्या साहाय्याने तो जितका फोफावला त्याची तुलनाच करता येणार नाही. मुद्रणतंत्रामुळे येशूचं शुभवर्तमान देशोदेशी पसरलं. त्याची भाषान्तरं झाली, भाषान्तराच्या प्रती वितरित झाल्या. धर्मप्रसाराविषयी आपलं मत काहीही असो. पण प्रसारासाठी प्रतीकरणाचं तंत्र महत्त्वाचं ठरलं आहे ह्याविषयी मतभेद होण्याची शक्यता नाही.  
 
पण प्रतीकरणाचं तंत्र एकटंच आलं नाही. तंत्रविद्येला भांडवल लागतं. मग भांडवलदार आले. गुंतवणूक आली. परताव्याचा विचार आला. नफ्याचा विचार आला. त्यामुळे मग प्रत कुणी करायची आणि कुणी नाही ह्याची भांडणंही आली. प्रतिमुद्राधिकार (कॉपिराइट) नावाची गोष्ट मुद्रणतंत्राच्या प्रसारानंतर दोन शतकांतच अस्तित्वात आली. प्रतिमुद्राधिकार म्हणजे प्रत करू देण्याचा अधिकार. एकीकडे ही तंत्रविद्या हे प्रचाराचं साधन होतं तर दुसरीकडे नफा मिळवण्याचं.

अर्थात मुद्रणतंत्रावर बंधन होतं ते कुणी मुद्रण करावं (प्रती कुणी तयार कराव्या) ह्यासंदर्भात. वाचकांना तिचा फारसा त्रास नव्हता. आपण प्रत विकत घेतली की ती आपली झाली. मित्राला वाचायला हवी असेल तर ती सहज देता येत असे. एका मर्यादेत सामूहिक वाचनही करता येईल. म्हणजे मुद्रणतंत्रासह आलेल्या प्रतिमुद्राधिकाराने प्रतीकरणावर मर्यादा आणली. वाचनावर नाही.

पण नफा ही फार आकर्षक गोष्ट असते. उत्पादनव्यवस्थेत मूल्य हे मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वानुसार ठरतं. मागणी जास्त, पुरवठा कमी असं झालं तर मूल्य वाढतं. मागणी कमी पण पुरवठा जास्त असं झालं तर मूल्य घटतं. मग हुशार लोक ह्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी झटू लागले. पुरवठा कमी करण्याचा एक मार्ग हा पुरवठा कुणी करायचा ह्यावरच बंधन आणणं असा आहे. प्रत करायचा अधिकार मर्यादित केला की पुरवठ्यावर मर्यादा येणार. म्हणजे प्रत करायचा अधिकार असणाऱ्यांनाच पुरवठा करता येणार. त्यांनाच मूल्य ठरवता येणार. कारण प्रती पुरवणाऱ्यांमध्ये स्पर्धाच नसणार.

प्रतीकरणाचं मुद्रणाचं तंत्र एकदा निर्माण झाल्यावर ते वेगवेगळ्या तऱ्हांनी विकसित होत राहिलं. पण त्यात मोठ्या प्रमाणावर प्रती करायच्या असतील तरच प्रती करणं सोयीचं होतं. एकच प्रत हवी असेल तर हे तंत्र वापरून प्रत करणं खर्चिक झालं असतं. पण तरी इतर स्वरूपात प्रती शक्य होतं. म्हणजे एखाद्या पुस्तकावर आधारित नाट्यनिर्मिती शक्य होती. प्रतिमुद्राधिकाराने ह्यावर जमेल तितका अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला. साहित्य ही प्रतिभेची निर्मिती असते ही आपली पारंपरिक समजूत. प्रतिभा म्हणजे "अ-पूर्व-वस्तु-निर्माण-क्षमा प्रज्ञा". त्यामुळे अ-पूर्वतेला महत्त्व आलं. नवनिर्मिती महत्त्वाची ठरली. अशी निर्मिती करणारी व्यक्ती विशेष ठरू लागली. तिला वलय प्राप्त झालं. प्रतिमुद्राधिकार हा अशा व्यक्तीला दिलेला अधिकार होता. ह्यात दोन गोष्टी वादविषय ठरल्या.

पहिली म्हणजे अ-पूर्वता. अपूर्वता म्हणजे नेमकं काय? ती खरंच निरवलंब स्वरूपाची असते का? ती परंपरेत निर्माण होत असेल तर ती परंपरेची निर्मिती नव्हे का? निर्मितीला विविध संबंध असतात. त्यामुळे अपूर्वताही सापेक्षच असते. काळाच्या विशिष्ट टप्प्यावर जे नवं वाटतं त्याची कारणपरंपरा कालौघात चालत आलेली असते. निर्मितीचं श्रेय नाकारता येत नाही. पण ही निर्मिती सर्वस्वी निरवलंब नसते. तिला परंपरेने आधार पुरवलेले असतात.

दुसरा मुद्दा निर्मात्याला मिळालेल्या अधिकाराचा. प्रत्यक्षात हा अधिकार निर्मिती करणारी व्यक्ती वापरू शकत होती का असा प्रश्न आहे. निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला आपली निर्मिती ही क्रयवस्तू म्हणून बाजारात नेता येईलच असं नाही. निर्मितिप्रक्रिया ही गुंतागुंतीची असते.

पुस्तकाचं उदाहरण घेतलं तर लेखिका ते लिहिते. पण हे लिहिलेलं वाचनयोग्य रूपात मांडावं लागतं. त्याला पुस्तकाचा आकार द्यावा लागतो. वेगवेगळे तंत्रवेत्ते त्या प्रक्रियेत सहभागी असतात. त्यासाठी जी संसाधनं लागतात. ही संसाधनं पुरवू शकेल अशी यंत्रणा निर्माण होते. उदा. प्रकाशिका इ. लेखिकेला वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशिकेचा प्रकाश आवश्यक ठरतो. मग प्रकाशिका तिचं पारिश्रमिक म्हणून लेखकेचा अधिकार स्वतःकडे घेते. म्हणजे अधिकार निर्माती म्हणून लेखिकेला मिळाला पण प्रत्यक्षात प्रकाशिकाच तो वापरते आहे असं झालं.

प्रतीकरणाची प्रगती होत असताना एक टप्पा आला तो प्रतिरूपणाचा. छायाप्रतींचा. पुस्तकाची छायाप्रत करता येऊ लागली. एकच प्रत करता येणं शक्य झालं. कधी ती थोडी महाग पडे. पण मुद्रणाइतका खर्च येत नव्हता. पण प्रतीकरणातला हा टप्पा एका माध्यमापुरताच मर्यादित राहिला.

आणि मग संगणक आले. आधी टेबलावर, मग मांडीवर आणि आता हातांतही. दृक्-श्राव्य अशा विविध प्रकारच्या सामग्रीची निर्मिती आणि वितरण हे संगणकामुळे शक्य झालं. त्याला देशांच्या मर्यादा राहिल्या नाहीत. विजेच्या साहाय्याने आणि विद्युद्वेगाने संपर्क होऊ लागले. देवाणघेवाण शक्य झाली. जे जग आपल्याला अलब्धच होतं ते सहज दिसू लागलं. ही यंत्र आधी महाग होती. खोलीएवढ्या विस्ताराची होती. मग त्यांचे आकार आणि किंमती आवाक्यात येऊ लागले आणि क्षमता मात्र भरमसाट वाढू लागली.

संगणकांनी नवी आशा आणली. नवी संस्कृती आणली. संपर्काच्या मर्यादा उधळून लावल्या. हे विश्वचि माझे घरं ही ज्ञानोबांची उक्ती साकारलीच आहे असं वाटेल अशी परिस्थिती दिसू लागली. मानवी संस्कृतीचं युगानुयुगींचं संचित संगणकाच्या शून्यैकी संकेतात रूपांतरित होऊ लागलं. संकलित होऊ लागलं.

ही परिस्थिती बाजाराला अनुकूलच होती. बाजारही संगणकावर आरूढ होऊन महाजालाच्या आधारे जगभर विस्तारला. मागणी आणि पुरवठा ह्यांना देशांच्या सीमा राहिल्या नाहीत. काय काय विकता येईल ह्याचाही विचार बदलला. जे पूर्वी विकता येईल असं वाटलंही नव्हतं तेही विकता येऊ लागलं. विदा (डेटा) नावाची नवी क्रयवस्तू आकाराला आली. माणसांच्या कृती ह्याच कच्चा माल झाल्या. त्यांच्या कृतींचं विदेत रूपान्तर करून विकता येतं आणि त्यांच्या आधारे माणसांच्या कृती नियंत्रितही करता येतात हे लक्षात आलं.

माणसं संगणक वापरू लागली. त्यांच्या आयुष्याचा तो महत्त्वाचा घटक झाला. पण संगणक म्हणजे काय आणि संगणन म्हणजे काय ह्याचा विचार करणारे थोडेच होते. सोयीच्या नावाखाली मर्यादित संगणन करू देणाऱ्या गोष्टी जगाची 'खिडकी' म्हणून यंत्रात ठाण मांडून बसल्या. संगणकासोबत येणाऱ्या ह्या गोष्टी म्हणजे कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम).

संगणक म्हणजे गणिती-तार्किक क्रिया करून देणारं यंत्र. आपल्याला ज्या क्रिया त्याच्याकडून करवून घ्यायच्या असतील त्या करवून घेता येतात. त्यासाठी संगणकाला कोणत्या क्रिया कोणत्या क्रमाने करायच्या हे सांगणारी आज्ञावली (क्रमाने लिहिलेली आज्ञांची मालिका) पुरवावी लागते. ह्या आज्ञावल्यांनुसार संगणकाचं काम चालतं. एखाद्या यंत्रावर वेगवेगळ्या आज्ञावल्यांचा वापर शक्य करून देणारी आज्ञावली म्हणजे कार्यकारी प्रणाली.

आज्ञावली कोणतीही असो तिचं एक रूप माणसांशी जोडलेलं असतं. म्हणजे आज्ञावली कशी लिहायची हे शिकलेल्या माणसांना समजेल आणि समजून घेता येईल अशा स्वरूपातली आज्ञावली म्हणजे आज्ञालेख (सोर्स कोड). आज्ञावलीचं दुसरं रूप यंत्राशी जोडलेलं असतं. माणसांना कळू शकणारा आज्ञालेख इथे शून्यैकी संकेतात रूपांतरित होतो. आता तो आज्ञालेख राहत नाही. तो केवळ यंत्रांनाच कळेल असा ०,१ ह्या दोन अंकचिन्हांच्या संयोग-क्रमयोगांची मालिका बनतो. त्याला यंत्रलेख म्हणता येईल. यंत्रलेख यंत्राकडून काम करून घेतो. पण त्यात नेमकं लिहिलंय ह्याची उकल करणं म्हणजे महाकठीण कर्म होऊन बसतं.

वापरकर्त्यांना आज्ञावली ही आज्ञालेखाच्या स्वरूपात मिळाली तर वापरकर्ते आपल्याला हवे ते बदल त्या आज्ञावलीत करू शकतात. ती सुधारूही शकतात. पण जर आज्ञावली केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात असेल तर वापरकर्त्यांना ती मिळाली आहे तशी वापरणं ह्यापलीकडे काहीही करता येत नाही.

आज्ञावलीवर नियंत्रण राहावं ह्या हेतूने केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात आज्ञावल्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यांना स्वामित्वाधीन (प्रोप्राय्टरी) आज्ञावल्या म्हणतात. वर उल्लेखलेली 'खिडकी' ही ह्या प्रकारातलीच.

पण संगणक हे अशा कार्यकारी प्रणाल्यांद्वारेच वापरता येतात असं नाही. आज्ञालेख हेतुतःच पुरवून संगणन समजून घ्यायला न अडवणाऱ्या, सहकार्यशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यकारी प्रणाल्या आहेतच. त्यांना मुक्त आज्ञावल्या म्हणतात. पण ह्यांचे वापरकर्ते अद्याप मर्यादितच आहेत.

कार्यकारी प्रणाली मुक्त आहे की नाही एवढाच प्रश्न आहे असं नाही. संगणन मुक्त राहू न देणारी संस्कृती हळूहळू फोफावत गेली.
"तुम्हाला पुस्तक वाचायचंय? वाचता येईल. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील."
हेही आपण मान्य करायला हरकत नाही.
पण "हे पुस्तक वाचायला तुम्हाला आम्ही पुरवू तीच विशिष्ट आज्ञावली किंवा विशिष्ट यंत्रच वापरलं पाहिजे" असंही बंधन येऊ लागलं. पण ते बंधन सोय म्हणून दाखवण्यात आलं.
"आम्ही तुम्हाला पुस्तक वाचायची सोय करून देत आहोत. पण ती वापरण्यासाठी तुम्ही केवळ पैसे देऊन भागणार नाही. तुम्ही काही अटी मान्य करायला हव्यात. तुम्ही पुस्तक आम्ही सांगू तसंच (विशिष्ट यंत्रात किंवा विशिष्ट आज्ञावलीच्या साहाय्यानेच) वाचायला हवं. ही सोय आहे. पण हे यंत्र किंवा ही आज्ञावली नेमकं काय काय करू शकते हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही. तुमची कोणकोणती माहिती ती गोळा करते हे आम्ही सांगू. पण तेवढीच माहिती गोळा करते ह्याची खात्री काय असं तुम्ही आम्हाला विचारता कामा नये. विचारून काही उपयोगही नाही. कारण ते यंत्र किंवा आज्ञावली वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला देतो तेव्हाच तुम्ही हे मान्य केलेलं असतं की आम्ही केवळ आज्ञावली वापरू. पण ती कशी काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. तसा प्रयत्न आमच्याकडून झाल्यास आम्ही दरोडेखोर ठरू आणि दंडास पात्र होऊ."

इतकी सगळी बंधनं कशासाठी आहेत? प्रतीकरण रोखण्यासाठी? संगणकीय सामग्रीचं जे वैशिष्ट्य आहे? तेच अडवण्यासाठी? केवळ तितकंच नाही.

विदा ही गोष्ट विक्रीयोग्य आहे हे जाणवलेलं आहे. संगणक वापरणाऱ्या व्यक्ती आपले व्यवहार संगणकाच्याच आधाराने करत असतील तर त्यांच्या व्यवहारांविषयीची विदा अनिर्बंधपणे मिळवता येण्यासाठी संगणकीय व्यवहारावर नियंत्रण मिळवावं लागेल. म्हणजे वापरकर्ते संगणक वापरतील. पण त्यावर त्यांचं नियंत्रण कमीत कमी असेल अशा यंत्रणा निर्माण करण्यात येतात. असं करण्यासाठी संगणकीय व्यवहारांत जी यंत्रणा राबवतात तिला इंग्लिशेत डिजिटल-राइट-मॅनेजमेंट तथा डीआरएम अशी संज्ञा वापरण्यात येते. तिचं मराठीकरण करायचं तर संगणकीय-अधिकार-व्यवस्थापन तथा संअव्य असं करता येईल. वस्तुतः पाहिलं तर हे संअव्य म्हणजे संगणकीय-अडवणूक-व्यवस्थापन असतं. वापरकर्त्यांना संगणकीय सामग्री सहज वापरता येणार नाही अशा अडचणी पेरून ठेवणं, वापरकर्त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्याचे उपाय योजणं हे ह्या व्यवस्थांचं काम असतं. असं करण्यामागे विविध कारणं असतात. मुख्य कारण हे नफा कमावणं हे असतं. त्यासाठी यंत्र (हार्डवेयर) किंवा आज्ञावली (सॉफ्टवेयर) ह्यांचा वापर करण्यात येतो.

तेव्हा संअव्य ही व्यवस्था वापरकर्त्यांवर अनावश्यक बंधनं घालणारी, त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था आहे. तिच्या नावात जरी अधिकाराचा उल्लेख असला तरी तिचा हेतू अडवणूक करणं हाच आहे. कारण ह्या व्यवस्थांच्या वापराविनाही ते संगणकीय व्यवहार शक्य आहेत. उदा. संगणकीय पुस्तक वाचता येण्यासाठी एखाद्या संअव्य वापरणाऱ्या विशिष्ट आज्ञावलीची आणि तिला लागणाऱ्या विशिष्ट स्वरूपातील पुस्तकाची आवश्यकता नाही. इपब-सारख्या मुक्त स्वरूपात इ-पुस्तके तयार करता येतात आणि ती वाचण्यासाठी वेगवेगळ्या मुक्त आज्ञावल्यांपैकी कोणतीही आज्ञावली वापरली तरी चालते.

उदा. संअव्य वापरून जी पुस्तकं वाचायला मिळतात ती आपल्याला आपल्या मित्रांना देता येत नाहीत. कारण प्रतीकरण शक्य नाही. मुद्रित पुस्तकांपेक्षा संगणकीय पुस्तकाचं प्रतीकरण सहज शक्य आहे. पण ते इथे ते अडवण्यात येते.

संअव्य वापरून ज्या गोष्टी वापराव्या लागतात त्यांत प्रतीकरणच अडवण्यात येते असे नाही. वापरकर्त्यांची विविध प्रकारची माहिती ती आज्ञावली वा ते यंत्र संकलित करत असू शकते. पण ते नेमके काय करते आहे हे वापरकर्त्यांना कळण्याची सोय नसते. कारण ते यंत्र नेमके काय करते वा ती आज्ञावली काय करते हे पाहण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध नसते. त्यामुळे वापरकर्ते अगतिक असतात.

संअव्ययुक्त गोष्टी मुक्त नसल्याने त्या वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या यंत्रांत वा आज्ञावलीत परस्पर बदल घडवून आणू शकतात. उदा. एका प्रसिद्ध उद्योगसमूहाने आपल्या वापरकर्त्यांच्या वाचनयंत्रांतून ऑरवेलच्या १९८४ ह्या कादंबरीच्या प्रती परस्पर उडवून टाकल्या.

संअव्यच्या समर्थनार्थ वेगवेगळे युक्तिवाद करण्यात येतात. त्यातला एक म्हणजे संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकाराचे रक्षण होते हा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा उद्देश  प्रतीकरण मर्यादित करणे असा आहे. म्हणजे प्रतीकरण प्रतिमुद्राधिकारधारकाच्या अनुमतीनेच व्हावे असा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद असते. प्रतिमुद्राधिकार त्यावेगळ्या वापरावर नियंत्रण ठेवत नाही. संअव्यमुळे वापरकर्त्यांवर अतिरिक्त बंधने येतात. ती अनावश्यक असतात.

संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकार अबाधित राहतो असं नाही. ज्या कुणाला अनधिकृतरीत्या प्रत करून घ्यायची आहे ते ह्या व्यवस्थांचा वापरच करणार नाहीत आणि ज्यांना अनधिकृत वापर करायचा नाही त्यांना ह्या व्यवस्था वापरल्यामुळे अनावश्यक बंधनांना सामोरे जावं लागतं. आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करून घ्यावा लागतो. संअव्य वापरून प्रतिमुद्राधिकाराचं रक्षण होतं असं म्हणणं हे "साक्षर व्हा" असे फलक लिहिण्याइतकंच हास्यास्पद आहे. ज्यांना ते वाचता येणार नाहीत (म्हणजे जे निरक्षर आहेत) त्यांच्यासाठी तो संदेश लिहिलेला आहे आणि जे संदेश वाचू शकतात (म्हणजे जे साक्षर आहेत) त्यांना त्या संदेशाची आवश्यकताच नसते.

संअव्यचा वापर केला नाही तर निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचं मोल मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद अनेकदा करण्यात येतो. पण संअव्य न वापरताही निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचा उचित मोबदला मिळणं शक्य आहे. अनेक लेखक आपली पुस्तके अशा पद्धतीने वितरितही करत असतात. ही पद्धती अद्याप फारशी रूढ झालेली नसली तरी जोम धरते आहे. अनेक प्रकाशकही आपण संअव्यमुक्त पुस्तकं विकतो असे सांगताना आढळतात. (उदा. https://www.smashwords.com/about/supportfaq#drm आणि https://leanpub.com/theoldleanpubmanual/read) उलट संअव्यचा वापर राबवण्याची यंत्रणा ही सामान्यतः प्रत्यक्ष निर्मात्यांकडे नसतेच. ती प्रकाशकांकडे वा वितरकांकडे असते. 


संअव्यचा वापर टाळायला हवा कारण ही व्यवस्था मुक्त आज्ञावल्यांचा वापर करत नाही हे तर्कतःच स्पष्ट आहे. ती वापरकर्त्यांवर बंधन घालते. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करते. त्यामुळे शक्य तितकी ही गोष्ट टाळायला हवी.


संअव्य टाळण्यासाठी काय काय करता येईल?

ज्यांत विशिष्ट आज्ञावली वा विशिष्ट यंत्राचाच वापर आवश्यक आहे अशा गोष्टी शक्य तितक्या टाळाव्या. त्यांऐवजी मुक्त स्वरूपात असणाऱ्या गोष्टी वापराव्या. उदा. संगणकीय पुस्तकांसाठी इपब अथवा पीडीएफ अशा विशिष्टच एका आज्ञावलीवर आधारित नसलेल्या स्वरूपांची निवड करावी.

ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेयर फाउंडेशनचे संअव्यविरोधी चळवळीचे संकेतस्थळ (https://www.defectivebydesign.org/) पाहता येईल. ह्या संकेतस्थळावरील (https://www.defectivebydesign.org/guide) हा विभाग बराच उपयुक्त आहे. प्रस्तुत लेखात ह्या संकेतस्थळावरील माहितीचा साभार उपयोग केला आहे.

दि. ०४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय संअव्यविरोधी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हे लहानसे टिपण लिहिले आहे.

प्रतिमुद्राधिकार, शर्विलकी (पायरसी) ह्यांबाबत एका लेखकाचं मत.


गुरुवार, १४ मे, २०२०

'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांचं निधन

अरुण फडके गुरुजी गेले. त्यांच्या मराठी लेखन-कोशाने मराठी प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली. अमुक शब्द कसा लिहायचा ह्यावर अडलेल्या व्यक्तीला सहज वापरता येईल असं संदर्भसाधन उपलब्ध झालं. 

प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या नियमावल्यांना मर्यादा असतातच. पण तरी त्यांचा उपयोग होतो. पण तो उपयोग करून घ्यायलाही काही तयारी करावी लागते. ती सर्वसामान्यांच्या सहज आवाक्यातली नसते. लेखनकोशासारखं संदर्भसाधन अशा प्रसंगी कामी येतं. पण असं साधन तयार करणं हे सोपं नाही. प्रमाण/ शुद्ध लेखन ही लोकव्यवहारावर आधारलेली गोष्ट आहे. तिला अनेक अवधानं सांभाळावी लागतात. लेखनपरंपरा, व्याकरण, व्युत्पत्ती, अर्थभेदकता इ. ह्या गोष्टींचं आपापसात सगळंच जुळतं असंही नाही. त्यामुळे एकाच निकषाने सगळं बांधता येत नाही. फाटे फुटत राहतात. अशा परिस्थितीत फडके ह्यांच्या लेखन-कोशातल्या काही रूपांविषयी मतभेद होणं ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. पण त्यामुळे त्यांचं श्रेय उणावत नाही.

फडके ह्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीच्या लेखननियमांचा अभ्यास करून रूढ नियमावलीवर आधारित असा लेखनकोशच केला नाही तर त्या रूढ नियमावलीतल्या उणिवांचा धांडोळा घेऊन त्या उणिवांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही करून पाहिला. त्यांच्या भाषेत, "मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत" असे नवे लेखननियम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याबाबतच्या त्यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नव्हतो आणि नाही. पण तरीही अभ्यासक म्हणून त्यांच्या ह्या वृत्तीचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही. त्यांच्या नव्या नियमावलीच्या प्रयत्नांनी मराठीच्या लेखनसरणीतले अनेक प्रश्न लक्षात यायला साहाय्य झालं हे मात्र नोंदवणं आवश्यक आहे.

मराठी लेखन-कोशाच्या रूपात त्यांचा प्रथम परिचय झाला. एम. ए.च्या वर्षांत कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ओळखही झाली. त्यांच्या कार्यशाळेत शिकल्याने माझ्या लिहिण्यात बराच नेटकेपणा आला हेही नोंदवलं पाहिजे. वाचन, विचार ह्यांनी आपण बदलत राहतो. त्याप्रमाणे त्यांची अनेक मतं पटत नव्हतीही. एका इ-टपाल-गटावर त्यांच्याशी प्रदीर्घ वाद-चर्चाही झडली. त्या चर्चेने खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता आला.

एक अनुभव नोंदवणं अतिशय आवश्यक आहे. मराठीच्या नव्या लेखननियमांसंदर्भात मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका बैठकीत मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यासाठी अरुण फडके ह्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं. ही घटना इ-टपाल-गटावरच्या वादचर्चेनंतरची आहे. माझी अनेक मतं त्यांच्या मतांशी जुळणारी नाहीत हे स्पष्ट असतानाही त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नोंदवणं आवश्यक आहे. असं करायला मनाचं मोठेपण लागतं. ज्ञानव्यवहारात वादपरंपरा अटळ असते. पण तिचं औचित्य आणि तिच्या मर्यादा ह्या दोहोंचं भान असणं महत्त्वाचं असतं. आज त्यांच्या जाण्याने ही स्मरणं मनात येत राहतात.  त्यांच्या स्मृतीलाच नव्हे तर कृतीला, निष्ठेला आणि कष्टांनाही विनम्र अभिवादन.

बुधवार, ६ जुलै, २०१६

नावात बरेच काही आहे... आणि त्यावेगळेही बरेच काही आहे

०१. ज्या ज्या ठिकाणी अजूनही बॉम्बे असे नाव रूढ आहे आहे तिथे मुंबई असे नाव वापरणे योग्य आहे हे माझे स्पष्ट मत आहे. अशा सुधारणांना विरोध का व्हावा हे मला कळत नाही. माझा एक मित्र काही कारणांनी माझे नाव चुकीचे उच्चारतो म्हणून मी माझे नाव सुधारून सांगू नये ह्यात कोणता शहाणपणा आहे हे मला कळलेले नाही.

०२. बॉम्बेचे मुंबई झाले/ केले ही मांडणीच चुकीची आहे. ब्रिटिश येण्यापूर्वीपासून मुंबई हे नाव आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या उच्चाराप्रमाणे ते लिहिले. ते गेल्यावर मुंबई हा उच्चार आणि लेखन माहीत असणारे लोक सत्तेवर आले. ते येऊनही काही वर्षे बॉम्बे हे नाव काही ठिकाणी चालत होते. यथावकाश सगळीकडे मुंबई अशी सुधारणा झाली. हेच मद्रास, कलकत्ता इ. बाबत झाले. काही पक्षांनी ह्याबाबत आपली पाठ थोपटून घेतली. काही विरोधकांनी आक्षेप घेतले. शिवीगाळही केली. पण ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी चुकीच्या कारणासाठी केल्या आहेत. सोम्याचे नाव एखादा तोतरा मनुष्य तोम्या असे उच्चारत असेल आणि त्याला अनुसरून इतरही तोम्या असे उच्चारू लागले. त्यामुळे सोम्याचे नाव तोम्या होत नाही. लोक तोम्याऐवजी सोम्या म्हणू लागले हा बदल नाही सुधारणा आहे हे लक्षात न घेता पाठ थोपटून घेणे किंवा आक्षेप घेणे निरर्थक आहे.

०३. ब्रिटिश राजवटीच्या परंपरेतून जो विधिव्यवहार आणि न्यायव्यवहार भारतात रूढ झाला त्यात तयार झालेल्या व्यवस्थांत आणि अधिनियमांत काही ठिकाणी बॉम्बे असे नाव मुंबईऐवजी वापरात आहे. नव्या विधिव्यवस्थेच्या नियमानुसार काही अधिनियम किंवा अध्यादेश काढून बॉम्बेऐवजी मुंबई अशी सुधारणा करण्यात येत असेल तर ते मला मान्य आहे. त्यासाठी कुणी सक्रिय प्रयत्न करत असेल तर माझा त्यांना पाठिंबा आहे. अट इतकीच की त्यांनी हा बदल आहे असे न म्हणता ही सुधारणा आहे हे स्पष्ट केले पाहिजे.

०४.  नाव सुधारल्याने/ बदलल्याने काय होणार? हा नामी मुद्दा मांडण्यात येतो. नावे बदलणे भावनिक आहे असे हिणवण्यात येते. नावे बदलून काही होत नाही ही बाब सर्वस्वी खरी नाही. नाव बदलल्याने नाव बदलते एवढा (काही वेळा एवढाच) परिणाम होतो. ही उघड बाब आहे. तरी नाव बदलण्याची प्रथा आहे. ब्रिटिश गेल्यावर भारताचा झेंडा बदलला. (इतकेच कशाला आजही एका भारतीय पक्षाचा झेंडा दुसऱ्याला चालत नाही. भाजपावाले लाल बावटा लावणार नाहीत आणि माकपवाले भगवा फडकवणार नाहीत.) हा झेंडा बदलल्याने जो (आणि जितका) फरक पडलेला आहे तितकाच फरक नावे बदलल्याने होतो. मराठवाड्यात विद्यापीठाच्या नामांतरासाठी (नावातील सुधारणेसाठी नव्हे) एक पिढी लढत राहिली. शेवटी ते नाव बदलण्यातही आले. नावे बदलून जेवढा फरक पडतो तेवढा ह्या उदाहरणातही पडला आहे. चर्चा केल्याने जेवायला मिळत नाही. म्हणून चर्चा निरर्थक ठरत नाहीत. जेवण मिळवण्यासाठी श्रम करावेच लागतात. चर्चांचे फलित वेगळे असते. श्रमांचे वेगळे. तेव्हा केवळ भावनिक म्हणून हिणवण्यानेही काही फरक पडत नाही. नावे बदलणे भावनिक असतेच. ते भावनिकच असेल तर भावनिक गोष्टीं दुर्लक्षणीय मानणाऱ्यांनी त्यावर इतकी चर्चा कशाला करावी? आंब्याच्या झा़डाला पेरू लागत नाहीत म्हणून आंबे लावणे निरर्थक ठरवणे एक तर मूर्खपणाचे आहे किंवा लबाडीचे आहे.

०५. नावे सुधारणे/ बदलणे हे करणे पुरेसे नाही हे आपल्याला माहीतच अाहे. मग नावे बदलण्याव्यतिरिक्त जे करायचे ते आपल्या परीने करत राहावे. नावे सुधारल्याने/ बदलल्याने काही होत नाही असे म्हणत नावे सुधारण्याला/ बदलण्याला विरोध करणे हे ढोंगीपणाचे आहे.

०६. वरील मजकूर लिहिण्याला कारण घडलेली घटना म्हणजे उच्च न्यायालयांच्या नावांत केंद्रीय शासनाने (त्याच्या मते) केले बदल. माझ्या मते हा बदल नसून सुधारणा आहे. असो. पण शासनाने अजूनही एक महत्त्वाचे काम करणे आवश्यक आहे. मुंबई उच्च न्यायालय असे नाव जरी असले तरी ह्या उच्च न्यायालयात राज्याच्या राजभाषेलाच -- मराठीलाच -- प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. हा नागरिकांवर अन्याय आहे. मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा मिळाला तर उच्च न्यायालयात मराठी कागदपत्रांची इंग्लिश भाषांतरे करून द्यावी लागणार नाहीत. राज्याच्या राजभाषेला उच्च न्यायालयात प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता नसणे हे लोकनियुक्त प्रतिनिधीला विधिमंडळात मते मांडण्यास अटकाव करण्यासारखेच अन्याय्य आहे. सर्व पक्षांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनी राजभाषेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी एकत्र यायला हवे. राजभाषेला उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी ह्यासाठी लढा उभारणाऱ्या लोकांना सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा. हा अन्याय दूर करायला हवा.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे

आज (०९ ऑक्टोबर २०१५) दुपारी एक दुःखद वार्ता कळली. मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे काही दिवसांपूर्वी कालवश झाल्याची. १८०० ते १९५० ह्या काळातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करून ह्या सूचिकार्याची पायाभरणी श्री. शंकर गणेश दाते ह्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापुढील कालखंडातील १९५१ ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम साठे सरांकडे सोपवले होते. ते साठे सरांनी पूर्ण करत आणले होते. त्यातल्या शेवटच्या ५ वर्षांच्या कालखंडाचे काम सर करत होते. पण दुर्देवाने ते पूर्ण होऊ शकलेले नाही.

१९५१ ते १९८५ ह्या ३५ वर्षांत प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची साठे सरांनी ४ भागांत (मराठी ग्रंथसूची भाग ३ ते ६ ) तयार केली. ह्यासाठी मुख्य आधार त्यांनी घेतले ते कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथसूचीचे (नॅशनल बिब्लिओग्राफीचे) खंड आणि मुंबईच्या एक्झामिनर ऑफ बुक्स ह्यांच्या तालिकांचे तिमाही अंक ह्यांचे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ह्यांच्या दाखल-नोंद-वह्यांचाही पूरक वापर त्यांनी केला.

अभ्यासकांना आपल्या क्षेत्रात आधी काय काम झाले आहे ह्याची माहिती करून घेण्यासाठी ग्रंथसूचीसारखे साधन उपयोगी ठरते. ग्रंथसूचीतील ग्रंथवर्णन ह्या भागात ग्रंथांच्या माहितीची विषयवार मांडणी केलेली असते. त्यानंतर लेखक, ग्रंथनाम, विषय, प्रकाशक, प्रकाशनस्थळ, अनुवादित ग्रंथ ह्यांसारख्या निर्देशसूची नेमका ग्रंथ हुडकायला साहाय्य करतात. संगणकपूर्व काळातील विदागार (डेटाबेस) रचण्याचे हे काम आहे. अत्यंत निष्ठापूर्वक सातत्याने हे काम सरांनी केले.

ह्याव्यतिरिक्त अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश, ज्ञानेश्वरीची ओवीसूची (मुंबई विद्यापीठाच्या 'ज्ञानदेवी' खंड ३ मध्ये समाविष्ट), ज्ञानेश्वरपंचकाच्या (ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताई, चांगदेव) अभंगांची चरणसूची आणि शब्दसूची ह्यासारखी कामेही सरांनी केली. पदसंदर्भकोशात ग्रंथात आलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद असते तो ग्रंथात कुठे आला आहे ह्याचा पत्ता दिलेला असतो आणि तो शब्द ज्या ओळीत वापरलेला आहे त्या ओळीचा मजकूरही दिलेला असतो. त्यामुळे शब्दाच्या वापराचा संदर्भ त्वरित कळून येतो. इतकेच नव्हे तर ग्रंथातील पुनरुक्त शब्द, त्यांची वारंवारता, ग्रंथातील अनन्य शब्द ह्यांचीही माहिती मिळते. मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेण्यापूर्वी केलेली ही कामे करायला ११ वर्षांत सुमारे ७००० तास लागल्याचा उल्लेख सरांनी आपल्या एका लेखात केला आहे.

विविध तऱ्हेचे सूचिकार्य हा सरांचा ध्यास होता. बॅंकेतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी १९५० ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथसूचीचे काम स्वीकारले. सातत्य, चिकाटी आणि परिश्रम ह्या गुणांच्या आधारे ते काम बऱ्यापैकी पूर्ण केले. मराठी ग्रंथसूचीच्या ६व्या खंडाला त्यांनी ग्रंथकार-अल्पपरिचय-कोश जोडला आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनांतून माहिती गोळा केली. लेखकांची जन्म-मृत्यु-वर्षे, हयात लेखकांचे पत्ते व संपर्कक्रमांक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला.

सूचिकार्यासारखे मोजक्या अभ्यासकांना उपयोगी पडणारे आणि त्यांचे कितीतरी श्रम वाचवणारे कार्य त्यांनी सातत्याने केले. हे अर्थातच फारशी प्रसिद्धी मिळवून देणारे काम नव्हे. पण ते किचकट काम सर प्रसिद्धीची आस न बाळगता निरलसपणे करत राहिले. ते १ ऑक्टोबर २०१५ रोजी कालवश झाले. त्याची वार्ताही आज कळली. प्रसारमाध्यमांना ही माहिती पोचली की नाही कुणास ठाऊक? असो.

कालाय तस्मै नमः ।

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

उत्सव बहु थोर होत...

अमुक उत्सवाचा उद्देश कोणता? किंवा 'खरा' उद्देश कोणता? ह्या प्रश्नांना खरंच काही अर्थ असतो का? उत्सवांचा वापर विविध मंडळी आपापल्या हेतूंसाठी करून घेत असतात. हे केवळ धार्मिक उत्सवांनाच लागू नाही. इतरही उत्सवांचं तेच आहे. अनेकांना हे उत्सव हवे असतात. गोंगाट, ध्वनिवर्धकांचा ढणढणाट, उन्मादी नृत्यं, अगदी दोन्ही प्रकारचं दारुकामसुद्धा!

कदाचित ह्यामागे काही स्वाभाविक मानवी प्रेरणा असतील. दैनंदिन रहाटगाडग्यातून सुटका म्हणून हा उत्सवी उतारा असेल. काहीही असेल. पण हे उत्सव आपल्या सामाजिक जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. बाजार हा जर आपल्या सगळ्याच जगण्यात महत्त्वाचा ठरत असेल तर उत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये ह्या अपेक्षेला काय अर्थ आहे? उत्सव हे बाजाराला सोयीचेच असतात. मागणी निर्माण झाली की पुरवठ्याची सोय होतच असते.

समाजही एकसंधपणे उत्सव साजरे करत नाही. काही उत्सव 'आपले' असतात. काही उत्सव 'त्यांचे'. त्यामुळे 'त्यांच्या' उत्सवाला नावं ठेवत 'आपले' उत्सव साजरे करत राहण्याची उत्तम सोय उपलब्ध असते. उत्सव हा 'संस्कृती'चा आविष्कार असतो. त्यामुळे संस्कृती जपण्यासाठी ते साजरे करावेच लागतात. कोणती संस्कृती केव्हा अंगीकारायची ह्याचं स्वातंत्र्यही आपल्याला असतंच. त्यामुळे 'पाश्चात्त्य' संस्कृतीला नावं ठेऊन आपण ३१ डिसेंबरच्या रात्री धिंगाणा घालायला मोकळे असतो. फुले, आगरकर, आंबेडकर ह्यांचं नाव घेत आपल्याला उंचच उंच थरांच्या दहीहंड्या बांधायला कसलीच अडचण नसते. पवित्र धार्मिक उत्सव असं म्हणून मग त्याच्या नावावर दारू पिऊन, बीभत्स हालचालींची नृत्यं करायला काहीच आडकाठी नसते. थोरांच्या जयंत्या/ मयंत्या साजऱ्या करायला विचारांची आवश्यकता नसते. दिवसभर ध्वनिवर्धक ढणढणत असले. मिरवणुका आणि मंडप बांधून वाहतुक अडवता आली की ते पुरेसं असतं.

आपली सामाजिक जाणीव इतकी जागृत असते की कोणतीही नियमावली नसलेले जीवघेणे 'खेळ' आपण आयोजित करतो आणि खेळणाऱ्यांच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतुक करत बघायला मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. टाळ्या वाजवतो. यशस्वी होणाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. थर लावणाऱ्या गोविंदांवर पाणी भरलेले फुगे मारताना मजा येते हे नाकारण्यात काय अर्थ आहे? आपला फुगा बसून थर कोसळला तर जेवढी मजा येते तितकंच कुणी थरावरून पडून घायाळ झालं किंवा कुणाला जीव गमवावा लागला तर व्यक्त होणारी आपली हळहळ ही खरी नसते असंही म्हणता येणार नाही.

उंचच उंच थर लावणाऱ्या गोविंदांचं कौशल्य, त्यांनी घेतलेले कष्ट हे खरेच असतात. त्यांचा उत्साह, त्यांचं साहस नाकारता येईल का? मंडळं इतके कष्ट घेऊन पोरं जमवतात. त्यांना थोडी (काही लाखांची!) बक्षिसं मिळाली तर त्यात वावगं काय आहे? कोणता खेळ सर्वस्वी सुरक्षित असतो? आणि साहसी खेळ हे अपघातप्रवण असणारंच. गोविंदांना ते माहीतच असतं.

जिथे इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा होतात तिथे आपली पोळी भाजायचा काही जण प्रयत्न करणारच. मग सबंध परिसराला दुधाच्या पिशव्या पुरवल्या जातात. कृष्णाचा उत्सव असल्याने दही, दूध हवंच ना! मग छानछान नटनट्या आपलं कौशल्य घेऊन रंगमंचावर (व्यासपीठ, रंगमंच ह्या वेगवेगळ्या शब्दांपेक्षा ष्टेज हा शब्द सोयीचा आहे.) अवतरतात. भक्तिगीतं, प्रेमगीतं, लावण्या, डिस्को, रॅप अशा विविध कलाप्रकारांचं एकत्रित सादरीकरण होतं. त्यात 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' आणि 'शीला की जवानी' एकत्र आली तर नाकं कशाला मुरडायची? सगळा सोवळेपणा आपोआप मोडून पडलेला असतो. 'समाधि से संभोग तक' आणि 'संभोग से समाधि तक' काहीही क्षणाच्या अवकाशाने उपस्थित होऊ शकतं.  आयोजक असलेले भाऊ/ दादा/ अण्णा/ आप्पा इ. दिवसभर उभे असतात. ध्वनिक्षेपक हातात घेऊन उत्साहाने बोलत असतात. आलेले 'ख्यातकीर्त' त्यांच्या गुणांचं तोंड भरून कौतुक करतात. त्यांचा प्रचार आपसूकच होतो. लोकांनाही फुकट कार्यक्रम बघायला मिळतात. दुधाच्या पिशव्या मिळतात. मग हे सर्व आयोजित करायला इतका पैसा कुठून येतो ह्याचा विचार कशाला हवा?

अशा अनेक सोयी उपलब्ध असणाऱ्या गोष्टींत सुधारणा करणं सोपं नाही. कारण सुधारणा करू इच्छिणारे सर्व एकसारखे नसतात. त्यांचेही वेगवेगळे हेतू असणार. पण ह्या सर्व क्रियाप्रतिक्रियांतून काही बदल घडून येतील. त्यांमुळे काहींच्या सोयी कमी होतील. पण काही चांगल्या गोष्टीही घडू लागतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

विविध प्रेरणांनी घडून येणाऱ्या गोष्टींमध्ये काही जणांना आरोपी करून आपण मोकळं होणं सोपं आहे. पण तेवढंच करून फार काही चांगलं घडेल अशी अपेक्षा नाही. अनेक विचार, अनेक हेतू, अनेक हितसंबंध ह्यांच्या परस्परक्रियेतून जे घडायचं ते घडणार आहे. आपल्या म्हणण्यात कोणतेही हितसंबंध, हेतू, विचार नसतीलच असही नाही. मात्र आपण आपल्याला जितका विचार करता येतो तितका प्रामाणिकपणे करून त्यानुसार वागायचं ठरवलं आणि ते शक्य तसं वर्तनात आलं तरी ते उपयोगी ठरेल.

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...