हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १४ मे, २०२०

'मराठी लेखन-कोश'कार श्री. अरुण फडके ह्यांचं निधन

अरुण फडके गुरुजी गेले. त्यांच्या मराठी लेखन-कोशाने मराठी प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या क्षेत्रातली एक मोठी उणीव भरून काढली. अमुक शब्द कसा लिहायचा ह्यावर अडलेल्या व्यक्तीला सहज वापरता येईल असं संदर्भसाधन उपलब्ध झालं. 

प्रमाण/ शुद्ध लेखनाच्या नियमावल्यांना मर्यादा असतातच. पण तरी त्यांचा उपयोग होतो. पण तो उपयोग करून घ्यायलाही काही तयारी करावी लागते. ती सर्वसामान्यांच्या सहज आवाक्यातली नसते. लेखनकोशासारखं संदर्भसाधन अशा प्रसंगी कामी येतं. पण असं साधन तयार करणं हे सोपं नाही. प्रमाण/ शुद्ध लेखन ही लोकव्यवहारावर आधारलेली गोष्ट आहे. तिला अनेक अवधानं सांभाळावी लागतात. लेखनपरंपरा, व्याकरण, व्युत्पत्ती, अर्थभेदकता इ. ह्या गोष्टींचं आपापसात सगळंच जुळतं असंही नाही. त्यामुळे एकाच निकषाने सगळं बांधता येत नाही. फाटे फुटत राहतात. अशा परिस्थितीत फडके ह्यांच्या लेखन-कोशातल्या काही रूपांविषयी मतभेद होणं ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. पण त्यामुळे त्यांचं श्रेय उणावत नाही.

फडके ह्यांची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीच्या लेखननियमांचा अभ्यास करून रूढ नियमावलीवर आधारित असा लेखनकोशच केला नाही तर त्या रूढ नियमावलीतल्या उणिवांचा धांडोळा घेऊन त्या उणिवांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्नही करून पाहिला. त्यांच्या भाषेत, "मराठीच्या प्रकृतीशी सुसंगत" असे नवे लेखननियम तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याबाबतच्या त्यांच्या अनेक भूमिकांशी मी सहमत नव्हतो आणि नाही. पण तरीही अभ्यासक म्हणून त्यांच्या ह्या वृत्तीचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही. त्यांच्या नव्या नियमावलीच्या प्रयत्नांनी मराठीच्या लेखनसरणीतले अनेक प्रश्न लक्षात यायला साहाय्य झालं हे मात्र नोंदवणं आवश्यक आहे.

मराठी लेखन-कोशाच्या रूपात त्यांचा प्रथम परिचय झाला. एम. ए.च्या वर्षांत कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ओळखही झाली. त्यांच्या कार्यशाळेत शिकल्याने माझ्या लिहिण्यात बराच नेटकेपणा आला हेही नोंदवलं पाहिजे. वाचन, विचार ह्यांनी आपण बदलत राहतो. त्याप्रमाणे त्यांची अनेक मतं पटत नव्हतीही. एका इ-टपाल-गटावर त्यांच्याशी प्रदीर्घ वाद-चर्चाही झडली. त्या चर्चेने खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता आला.

एक अनुभव नोंदवणं अतिशय आवश्यक आहे. मराठीच्या नव्या लेखननियमांसंदर्भात मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या एका बैठकीत मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यासाठी अरुण फडके ह्यांनी माझं नाव सुचवलं होतं असं मला कळलं. ही घटना इ-टपाल-गटावरच्या वादचर्चेनंतरची आहे. माझी अनेक मतं त्यांच्या मतांशी जुळणारी नाहीत हे स्पष्ट असतानाही त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. ही गोष्ट कृतज्ञतापूर्वक नोंदवणं आवश्यक आहे. असं करायला मनाचं मोठेपण लागतं. ज्ञानव्यवहारात वादपरंपरा अटळ असते. पण तिचं औचित्य आणि तिच्या मर्यादा ह्या दोहोंचं भान असणं महत्त्वाचं असतं. आज त्यांच्या जाण्याने ही स्मरणं मनात येत राहतात.  त्यांच्या स्मृतीलाच नव्हे तर कृतीला, निष्ठेला आणि कष्टांनाही विनम्र अभिवादन.

1 टिप्पणी:

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...