अभिजात वास्तवाची तिरपागडी कहाणी



महाराष्ट्र ह्या नावाचे एक राज्य आहे. तिथे बऱ्याच आधीपासून लोक एक भाषा बोलत आले आहेत. किती आधीपासून हे नक्की सांगता येईलच असे नाही. पण इसवी सनाच्या १२-१३व्या शतकापासूनचे ग्रंथ तरी उपलब्ध होतात. त्या ग्रंथांतल्या भाषेला प्राकृत, देशी, मऱ्हाटी, मराठी असे काही काही लोक म्हणत होते.

संस्कृत ह्या देववाणीतच धर्मव्यवहार झाला पाहिजे ही अट ह्या भाषेच्या भाषकांनी धुडकावली. अगदी अपवाद वगळता संस्कृताला तसे हिणवले नाही पण मराठीचा आग्रह धरून ते मराठीच वापरत राहिले. ह्या भाषकांनी इतर भाषांशी संपर्क असतानाही आपली भाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला. काहींनी ती धर्मभाषा मानली. काहींनी संवादभाषा. कालांतराने ती महाराष्ट्रातल्या लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा झाली असे म्हणता येते.

काळाच्या ओघात बरेच बदल झाले. राज्यकर्ते बदलले. परिस्थिती पालटली. मराठी भाषेलाही काही काळ तरी राजाश्रय मिळाला. पण ती वाढली आणि टिकली ती मुख्यत्वे लोकाश्रयामुळेच. इतर भाषांच्या संगतीने तिची रूपे पालटत राहिली. पण तरीही तिची ओळख पटावी असे स्वरूप तिला टिकवून धरता आले.

वेगवेगळ्या क्षेत्रात तिचा वावर, वापर वाढावा असे वाटणाऱ्या मराठी भाषकांच्या प्रयत्नांतून तिचा उण्या-अधिक प्रमाणात विस्तार होत राहिला. फार्सी, अरबी, पोर्तुगीज, इंग्लिश अशा प्रदेश, इतिहास, संस्कृती ह्या दृष्टीने उण्या-अधिक प्रमाणातील दूरच्या भाषा आणि संस्कृत, प्राकृत, कन्नड, तेलुगू, तमिळ, हिन्दी ह्यांसारख्या प्रदेश, इतिहास, संस्कृती ह्या दृष्टीने उण्या-अधिक प्रमाणातील जवळच्या भाषा ह्यांच्याशी कधी सहकार्य, कधी संघर्ष करत मराठी काळाच्या ओघात टिकून राहिली.

एकोणिसाव्या शतकापासून विकसित होऊ लागलेल्या सार्वत्रिक शिक्षणपद्धती आणि साहित्यव्यवहार ह्यांमुळे मराठी ही ज्ञानव्यवहाराची भाषा होईल, विविध क्षेत्रांत ती वापरण्यात येऊन ती समृद्ध होत राहील अशी स्वप्ने काहींनी पाहिली आणि इतरांनाही दाखवली. त्या स्वप्नांचे स्वत्व, स्वकीयत्व इत्यादी आधार फारसे पक्के होते असे आज दिसून येत नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या वल्गना हवेत विरल्या आहेत आणि मुळात तिच्यातली साक्षरतेची परंपरा किती काळ टिकेल ह्याविषयीच शंका वाटेल अशी परिस्थिती आहे.

आता मराठी भाषक म्हणवून घेणाऱ्यांना तिचा अभिमान आहे असे म्हणतात. ते खरेही असावे. इतिहासाच्या पटलावर पाहिले तर आज मराठी ही एका विस्तीर्ण राज्याची कागदोपत्री तरी राजभाषा आहे. मर्यादित प्रमाणात ती अर्थार्जनाचीही भाषा आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमे, प्रचारमाध्यमे अशा उद्योगांत आजही मराठीला बऱ्यापैकी महत्त्वाचे स्थान आहे. ती अजूनही बऱ्याच प्रमाणात मायेची आणि सोयीची भाषा आहे. विविध राजकीय आणि अराजकीय संघटनांनी आपापल्या लाभांसाठी मराठीचा वापर करून घेतला आहे आणि लोकांनी त्या वापराला सहमती दर्शवलेली आहे.

मराठी भाषकांना मराठी भाषा काही बाबतींत सोयीची वाटते तशी अनेक बाबतींत गैर सोयीचीही वाटते. मराठी ज्ञानव्यवहाराची भाषा करण्याचे स्वप्न कधीच निरर्थक झाले आहे. मराठीत ज्ञानव्यवहार करायचाच असेल तर तो साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास अशा काही मोजक्या क्षेत्रांपुरता आहे. ह्या क्षेत्रांचे महत्त्व पोट भरलेले असेल तेव्हाच लक्षात येते. पोट भरण्याचे साधन म्हणून मराठी निरुपयोगी आहे असा खराखोटा समजही काही नवा नाही. इतिहासातील मराठीचे अस्तित्व हे अपरिहार्य आहे. साहित्यात ती हौसेला आहे आणि तत्त्वज्ञानाच्या प्रतिष्ठित व्यासपीठांवरचे मराठीचे अस्तित्व धोक्यात असले तरी अजून ती आजही जिवंत असलेल्या माणसांच्या मेंदूत घर करून असल्याने कार्यरत राहते.

पण नव्या मेंदूंमधील तिचे स्थान डळमळलेले आहे. मराठी भाषकांना तिचा अभिमान असला तरी आपल्या पुढच्या पिढीने मराठी शिकावे असे त्यांना वाटत नाही. कारण मराठी शिकल्याने पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात येईल असे भयही आहे. अन्यभाषिक व्यक्ती मराठीत बोलत नाही म्हणून तिच्या अंगावर धावून जाणाऱ्या मराठी भाषकांपैकी किती जणांच्या घरातील पुढची पिढी मराठीत शिकते आहे का ह्याचाही शोध घेण्यासारखा आहे. मराठीचा विकास करायचा म्हणजे काय करायचे ह्यासंदर्भात कोणतेही धोरण स्पष्ट नसताना शासनयंत्रणा संमेलनांचे रमणे घालत मराठीचा विकास होत असल्याचे डंके बडवत आहेत. सत्तेवरचे पक्ष बदलतात पण निरुपाय तसाच आहे. कागदोपत्री असलेली राजभाषा कागदोपत्री विकास पावते आहे. प्रत्यक्षात तसे होते आहे का ह्याविषयी शंका यावी असेच वातावरण आहे.

एकीकडे मराठीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो आहे तर दुसरीकडे ह्या भाषेचे वस्तुसंग्रहालय करायचीही तरतूद न झाल्याने जुन्या मराठी हस्तलिखितांच्या, दोलामुद्रितांच्या, मुद्रित पुस्तकांच्या पानांचाही काळाच्या ओघात चुराडा होत चालला आहे. कविता करण्यापुरतीच मराठी हवी असणाऱ्यांना मराठीतील बरीवाईट जुनी कविता जपून ठेवण्याचीही आवश्यकता नसावी ह्यात नवल नाही. मराठीचे भवितव्य भाषकांसाठी धोकादायक आहे. तिचा भूतकाळ मिरवण्यापुरता हवा आहे पण एका पिढीचा ठेवा म्हणून संचित करायलाही फारसा नकोच आहे.

म्हटले तर ही विसंगती आहे. म्हटले तर हे वास्तव आहे. काय म्हणायचे ह्याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. विसंगतीचा स्वीकार किंवा परिहार ह्या दोन्हींबाबत माझ्याकडेही अन्य मराठी भाषकांप्रमाणेच कोणताही ठोस मार्ग नाही. निदान मला ही विसंगती दिसते आहे हे कुणाला तरी कळावे एवढ्याच हेतूने हे टिपण लिहिले आहे. मराठीच्या अभिमानाने ते लिहिलेले नाही. अशा विसंगत परिस्थितीत कशाचा अभिमान धरायचा हेही कळण्याजोगे वाटत नाही. मी पहिली भाषा शिकलो ती मराठीच होती. त्यामुळे मराठीविषयी माझ्या मनात स्वाभाविक जवळीक आहे. पण ती जवळीक असल्याने वास्तव बदलते असे नाही. विसंगती उकलते असेही नाही.

हसावे की रडावे हे कळत नसते तेव्हा रडून काही उपयोग नसतो (हसूनही नसतोच. पण हसणे सह्य असते.). विश्वाच्या विशाल पटावर पाहिले तर अशी एखादी भाषा आणि तिचे भाषक जगले काय किंवा मेले काय ह्याने काहीच फरक पडणार नसतो. हे मला कळते आहे. पण फरक कशानेच पडत नसतो. मग काहीच न करता सगळेच सोडून स्वस्थ बसायचे का? मराठी संदर्भातली विसंगत परिस्थिती लक्षात न घेता तिच्या अभिजाततेचे नगारे वाजत राहणार आहेत. माझ्याकडे मराठीचे नक्की काय करावे ह्याचा निश्चित उपाय नसूनही मी मला जाणवलेल्या विसंगतीकडे लक्ष वेधले आहे. माझ्या ह्या टिपणाला मराठीच्या अभिजात दर्जाइतकाच अर्थ/ निरर्थ आहे असे म्हणता येईल.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट