अभिजात वास्तवाची तिरपागडी कहाणी
महाराष्ट्र ह्या नावाचे एक राज्य आहे. तिथे बऱ्याच आधीपासून लोक एक भाषा बोलत आले आहेत. किती आधीपासून हे नक्की सांगता येईलच असे नाही. पण इसवी सनाच्या १२-१३व्या शतकापासूनचे ग्रंथ तरी उपलब्ध होतात. त्या ग्रंथांतल्या भाषेला प्राकृत, देशी, मऱ्हाटी, मराठी असे काही काही लोक म्हणत होते. संस्कृत ह्या देववाणीतच धर्मव्यवहार झाला पाहिजे ही अट ह्या भाषेच्या भाषकांनी धुडकावली. अगदी अपवाद वगळता संस्कृताला तसे हिणवले नाही पण मराठीचा आग्रह धरून ते मराठीच वापरत राहिले. ह्या भाषकांनी इतर भाषांशी संपर्क असतानाही आपली भाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला. काहींनी ती धर्मभाषा मानली. काहींनी संवादभाषा. कालांतराने ती महाराष्ट्रातल्या लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा झाली असे म्हणता येते. काळाच्या ओघात बरेच बदल झाले. राज्यकर्ते बदलले. परिस्थिती पालटली. मराठी भाषेलाही काही काळ तरी राजाश्रय मिळाला. पण ती वाढली आणि टिकली ती मुख्यत्वे लोकाश्रयामुळेच. इतर भाषांच्या संगतीने तिची रूपे पालटत राहिली. पण तरीही तिची ओळख पटावी असे स्वरूप तिला टिकवून धरता आले. वेगवेगळ्या क्षेत्रात तिचा वावर, वापर वाढावा असे वाटणाऱ्या मराठी ...