हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

हुतात्मा चौक कहाँ है?

आजचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. मी वासुदेव बळवंत फडके चौकातून हुतात्मा चौकात जाण्यासाठी टॅक्सी पाहात होतो. पहिली टॅक्सी थांबली. आत एक म्हातारबाबा चालक होते. मी विचारलं, "हुतात्मा चौकात सोडणार का?" त्या म्हातारबाबांनी कसनुसा चेहरा करून प्रतिप्रश्न केला "हुतात्मा चौक कहाँ है?".
माझ्या उत्तराची वाट न पाहता गाडी पुढे निघून गेली.
xxx
मग दुसरी टॅक्सी शोधू लागलो. ती दिसली. पुन्हा तोच प्रश्न.
"कहाँ है ये हुतात्मा चौक?" तोच अनपेक्षित प्रतिप्रश्न.
मला फारच आश्चर्य वाटलं होतं. मी गाडीतच शिरलो. म्हटलं, "मी दाखवतो हुतात्मा चौक कुठे आहे तो."
मग पुढचा संवाद. मी तापलोच होतो. तावातावाने मराठीतून बोलत होतो. त्याला न जुमानता हिंदीतून उत्तरं येत होती. स्वरात कुठेही आपलं काही चुकलंय असा भाव नव्हता.
मी म्हटलं, "तुम्ही मुंबईत इतके दिवस टॅक्सी चालवता तरी तुम्हाला हुतात्मा चौक माहीत नाही?"
"हो. नाही माहीत."
"तुम्हाला मुंबईतली ठिकाणं माहीत नाहीत तर तुम्हाला टॅक्सी-चालकाचा परवाना कसा मिळाला?"
"परवाना दलालांकरवी मिळतो"
टॅक्सीवाल्याला मंत्रालय माहीत होतं. तो रोज हुतात्मा चौकातूनच तिकडे जात होता. पण...
मी काय बोलणार?
निमूट हुतात्मा चौकात उतरलो. टॅक्सीवाल्याला हुतात्मा शब्दाचा अर्थ हिंदीत समजावून सांगितला. त्या ठिकाणाला हुतात्मा चौक असं का म्हणतात ते सांगितलं.
xxx
माझं काम आटोपून मी हुतात्मा चौकातून मंत्रालयात जाण्यासाठी टॅक्सीत बसलो. सहज टॅक्सीवाल्याला विचारलं. "हुतात्मा चौक कुठे आहे ते माहीत आहे का?"
"नाही."
xxx
संध्याकाळी सगळी कामं आटोपली. स्थानकाकडे निघालो होतो. शेजारी कुणा दोघांनी टॅक्सीला हात दाखवून टॅक्सी थांबवली. ते आपसात मराठीतून बोलत होते. त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारलं. "फ्लोराफाउंटन?"
टॅक्सीवाल्याने होकार दिला असावा. त्याने ते उतारू टॅक्सीत बसवले होते.

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...