हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०१५

मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे

आज (०९ ऑक्टोबर २०१५) दुपारी एक दुःखद वार्ता कळली. मराठी-ग्रंथ-सूचिकार श्री. शरद केशव साठे काही दिवसांपूर्वी कालवश झाल्याची. १८०० ते १९५० ह्या काळातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करून ह्या सूचिकार्याची पायाभरणी श्री. शंकर गणेश दाते ह्यांनी केली. राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापुढील कालखंडातील १९५१ ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची करण्याचे काम साठे सरांकडे सोपवले होते. ते साठे सरांनी पूर्ण करत आणले होते. त्यातल्या शेवटच्या ५ वर्षांच्या कालखंडाचे काम सर करत होते. पण दुर्देवाने ते पूर्ण होऊ शकलेले नाही.

१९५१ ते १९८५ ह्या ३५ वर्षांत प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची साठे सरांनी ४ भागांत (मराठी ग्रंथसूची भाग ३ ते ६ ) तयार केली. ह्यासाठी मुख्य आधार त्यांनी घेतले ते कोलकात्याच्या राष्ट्रीय ग्रंथसूचीचे (नॅशनल बिब्लिओग्राफीचे) खंड आणि मुंबईच्या एक्झामिनर ऑफ बुक्स ह्यांच्या तालिकांचे तिमाही अंक ह्यांचे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे ह्यांच्या दाखल-नोंद-वह्यांचाही पूरक वापर त्यांनी केला.

अभ्यासकांना आपल्या क्षेत्रात आधी काय काम झाले आहे ह्याची माहिती करून घेण्यासाठी ग्रंथसूचीसारखे साधन उपयोगी ठरते. ग्रंथसूचीतील ग्रंथवर्णन ह्या भागात ग्रंथांच्या माहितीची विषयवार मांडणी केलेली असते. त्यानंतर लेखक, ग्रंथनाम, विषय, प्रकाशक, प्रकाशनस्थळ, अनुवादित ग्रंथ ह्यांसारख्या निर्देशसूची नेमका ग्रंथ हुडकायला साहाय्य करतात. संगणकपूर्व काळातील विदागार (डेटाबेस) रचण्याचे हे काम आहे. अत्यंत निष्ठापूर्वक सातत्याने हे काम सरांनी केले.

ह्याव्यतिरिक्त अमृतानुभवाचा पदसंदर्भकोश, ज्ञानेश्वरीची ओवीसूची (मुंबई विद्यापीठाच्या 'ज्ञानदेवी' खंड ३ मध्ये समाविष्ट), ज्ञानेश्वरपंचकाच्या (ज्ञानेश्वर, निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताई, चांगदेव) अभंगांची चरणसूची आणि शब्दसूची ह्यासारखी कामेही सरांनी केली. पदसंदर्भकोशात ग्रंथात आलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद असते तो ग्रंथात कुठे आला आहे ह्याचा पत्ता दिलेला असतो आणि तो शब्द ज्या ओळीत वापरलेला आहे त्या ओळीचा मजकूरही दिलेला असतो. त्यामुळे शब्दाच्या वापराचा संदर्भ त्वरित कळून येतो. इतकेच नव्हे तर ग्रंथातील पुनरुक्त शब्द, त्यांची वारंवारता, ग्रंथातील अनन्य शब्द ह्यांचीही माहिती मिळते. मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेण्यापूर्वी केलेली ही कामे करायला ११ वर्षांत सुमारे ७००० तास लागल्याचा उल्लेख सरांनी आपल्या एका लेखात केला आहे.

विविध तऱ्हेचे सूचिकार्य हा सरांचा ध्यास होता. बॅंकेतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी १९५० ते १९९० ह्या कालखंडातील मराठी ग्रंथसूचीचे काम स्वीकारले. सातत्य, चिकाटी आणि परिश्रम ह्या गुणांच्या आधारे ते काम बऱ्यापैकी पूर्ण केले. मराठी ग्रंथसूचीच्या ६व्या खंडाला त्यांनी ग्रंथकार-अल्पपरिचय-कोश जोडला आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनांतून माहिती गोळा केली. लेखकांची जन्म-मृत्यु-वर्षे, हयात लेखकांचे पत्ते व संपर्कक्रमांक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला.

सूचिकार्यासारखे मोजक्या अभ्यासकांना उपयोगी पडणारे आणि त्यांचे कितीतरी श्रम वाचवणारे कार्य त्यांनी सातत्याने केले. हे अर्थातच फारशी प्रसिद्धी मिळवून देणारे काम नव्हे. पण ते किचकट काम सर प्रसिद्धीची आस न बाळगता निरलसपणे करत राहिले. ते १ ऑक्टोबर २०१५ रोजी कालवश झाले. त्याची वार्ताही आज कळली. प्रसारमाध्यमांना ही माहिती पोचली की नाही कुणास ठाऊक? असो.

कालाय तस्मै नमः ।

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...