रविवार, २४ जानेवारी, २०२१

'आलोक' : मुक्त नियतकालिक


 मराठीला नियतकालिकांची मोठी परंपरा आहे. महाजालाच्या उदयानंतर चर्चापीठासारखा नवा प्रकार आकाराला आला. मनोगत, उपक्रम, मिसळपाव, ऐसी अक्षरे ह्या चर्चापीठांनी मराठी ज्ञानव्यवहारात आणि साहित्यव्यवहारात मोलाची भर घातलेली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दैनिकांच्या महाजालीय आवृत्त्या आणि अक्षरनामासारखी बहु-आशयी लेखस्थळे ह्यांमुळे महाजालावर मराठीचा वावर वाढतो आहे. हाकारासारखं सर्जनशील लेखनाला वाहिलेलं नियतकालिक मराठीत वेगवेगळ्या आशयाची अभिव्यक्ती सुकर करू पाहत आहे. 

ह्या सर्वांच्या जोडीला आता मराठीत 'आलोक' हे नवीन महाजालीय मुक्त नियतकालिक अवतरतं आहे. शास्त्रचर्चेस वाहिलेले पहिले मुक्त मराठी नियतकालिक  असं ह्या नियतकालिकाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की हे नियतकालिक आलोक नित्यमुक्त परवान्या-अंतर्गत वितरित करण्यात आलं आहे. ह्या नियतकालिकात प्रकाशित झालेली सर्व सामग्री मुक्त स्वरूपात (म्हणजे प्रत करून घ्यायला, प्रत करून इतरांना द्यायला, ह्या सामग्रीत बदल करून ती स्वतःसाठी वापरायला अथवा बदल केलेली सामग्री बदलांसह वितरित करायला प्रतिमुद्राधिकार-धारकांची मान्यता आहे. ह्यासाठी योग्य श्रेयनिर्दश करणे आणि बदलांसह सामग्री वितरित करताना ती ह्याच परवान्यांतर्गत वितरित करण्याची अट आहे.)

ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करून देण्याची ही परंपरा मराठीत ह्याआधीही आहे. उदा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे आपल्या पुस्तकांवर कोणतेही हक्क राखलेले नाहीत अशी सूचना छापत असत. पण ह्या मुक्त सामग्रीला वैधानिक स्वरूप देण्याची जी आधुनिक परंपरा रिचर्ड स्टॉलमन ह्यांनी सुरू केली आणि त्यामुळे केवळ मूळ सामग्रीच नव्हे तर तिच्यावर आधारित पुढील सर्व सामग्री-परंपरा मुक्त राहावी ह्यासाठी वैधानिक पद्धतीने परवाना देण्याची जी परंपरा सुरू झाली तिचं अनुसरण मराठीत होतं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

ह्या कालिकात लेखांचं वैविध्यंही पाहण्यासारखं आहे. आधुनिक काळात ज्ञानशाखांतल्या सीमारेषा धूसर होत आहेत आणि वितळतही आहेत. अशा वेळी विविध ज्ञानशाखांवर मराठीत साधार आणि विद्याव्यवहारातील रूढ संकेतांना अनुसरणारं लेखन होत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आलोक ह्या नियतकालिकाचं स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

आलोक ह्या नियककालिकाचं संकेतस्थळ : https://varnamudra.com/aalok/

आलोक ह्या नियतकालिकाचं पहिलं पुष्प : https://varnamudra.com/aalok/pushpa/pahile/


विशेष प्रकटीकरण :

(ह्या नियतकालिकाचे संपादक अस्मादिकांचे मित्र आहेत आणि ह्या नियतकालिकाच्या पहिल्या अंकात अस्मादिकांचं एक टिपणही प्रकाशित झालं आहे.)