प्रश्न स्वातंत्र्याचा असतो !
संगणकीय सामग्रीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही सामग्री सहज प्रतीकरणीय आहे. म्हणजे संगणकीय स्वरूपात साठवलेलं पुस्तक, ध्वनिमुद्रण, गाणं, छायाचित्र, चलच्चित्र, आरेखन अशी कोणतीही सामग्री असो. तिची प्रत करून घेणं हे सहज शक्य असतं.
प्रतीकरणाच्या प्रयत्नातूनच मुद्रणतंत्र निर्माण झालं. पूर्वी पुस्तकाची प्रत हस्तलिखित स्वरूपात असे. ती यथामूल नकलून घेणं हे अतिशय कष्टाचं काम होतं. अनेक हस्तलिखितांच्या शेवटी हे कष्ट व्यक्त करणारे श्लोक आढळतात ते उगाच नाही. पण मुद्रणतंत्राने प्रतीकरण सोपं केलं आणि त्यामुळे वितरण सोपं होऊन प्रसारही सोपा झाला. ज्ञानेश्वरीच्या प्रती ज्ञानेश्वरांच्या काळी जितक्या असतील त्याच्या कैक पटीने आज उपलब्ध आहेत. ह्याचं कारण मुद्रणतंत्र आहे हे विसरून चालणार नाही.
येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी येशूच्या कथा आणि त्याचा उपदेश ह्यांचा प्रचार मनःपूर्वक केला. त्याला कालांतराने ग्रंथरूप दिलं (शुभवर्तमान). अतिशय कष्टपूर्वक आणि प्रतिकूलतेशी झुंज देत त्यांनी आपला पंथ विस्तारण्याचा प्रयत्न केला. राजसत्तेचं साहाय्य मिळाल्याने हा प्रसार जरी बराच फोफावला असला तरी मुद्रणतंत्राच्या साहाय्याने तो जितका फोफावला त्याची तुलनाच करता येणार नाही. मुद्रणतंत्रामुळे येशूचं शुभवर्तमान देशोदेशी पसरलं. त्याची भाषान्तरं झाली, भाषान्तराच्या प्रती वितरित झाल्या. धर्मप्रसाराविषयी आपलं मत काहीही असो. पण प्रसारासाठी प्रतीकरणाचं तंत्र महत्त्वाचं ठरलं आहे ह्याविषयी मतभेद होण्याची शक्यता नाही.
पण प्रतीकरणाचं तंत्र एकटंच आलं नाही. तंत्रविद्येला भांडवल लागतं. मग भांडवलदार आले. गुंतवणूक आली. परताव्याचा विचार आला. नफ्याचा विचार आला. त्यामुळे मग प्रत कुणी करायची आणि कुणी नाही ह्याची भांडणंही आली. प्रतिमुद्राधिकार (कॉपिराइट) नावाची गोष्ट मुद्रणतंत्राच्या प्रसारानंतर दोन शतकांतच अस्तित्वात आली. प्रतिमुद्राधिकार म्हणजे प्रत करू देण्याचा अधिकार. एकीकडे ही तंत्रविद्या हे प्रचाराचं साधन होतं तर दुसरीकडे नफा मिळवण्याचं.
अर्थात मुद्रणतंत्रावर बंधन होतं ते कुणी मुद्रण करावं (प्रती कुणी तयार कराव्या) ह्यासंदर्भात. वाचकांना तिचा फारसा त्रास नव्हता. आपण प्रत विकत घेतली की ती आपली झाली. मित्राला वाचायला हवी असेल तर ती सहज देता येत असे. एका मर्यादेत सामूहिक वाचनही करता येईल. म्हणजे मुद्रणतंत्रासह आलेल्या प्रतिमुद्राधिकाराने प्रतीकरणावर मर्यादा आणली. वाचनावर नाही.
पण नफा ही फार आकर्षक गोष्ट असते. उत्पादनव्यवस्थेत मूल्य हे मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वानुसार ठरतं. मागणी जास्त, पुरवठा कमी असं झालं तर मूल्य वाढतं. मागणी कमी पण पुरवठा जास्त असं झालं तर मूल्य घटतं. मग हुशार लोक ह्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी झटू लागले. पुरवठा कमी करण्याचा एक मार्ग हा पुरवठा कुणी करायचा ह्यावरच बंधन आणणं असा आहे. प्रत करायचा अधिकार मर्यादित केला की पुरवठ्यावर मर्यादा येणार. म्हणजे प्रत करायचा अधिकार असणाऱ्यांनाच पुरवठा करता येणार. त्यांनाच मूल्य ठरवता येणार. कारण प्रती पुरवणाऱ्यांमध्ये स्पर्धाच नसणार.
प्रतीकरणाचं मुद्रणाचं तंत्र एकदा निर्माण झाल्यावर ते वेगवेगळ्या तऱ्हांनी विकसित होत राहिलं. पण त्यात मोठ्या प्रमाणावर प्रती करायच्या असतील तरच प्रती करणं सोयीचं होतं. एकच प्रत हवी असेल तर हे तंत्र वापरून प्रत करणं खर्चिक झालं असतं. पण तरी इतर स्वरूपात प्रती शक्य होतं. म्हणजे एखाद्या पुस्तकावर आधारित नाट्यनिर्मिती शक्य होती. प्रतिमुद्राधिकाराने ह्यावर जमेल तितका अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला. साहित्य ही प्रतिभेची निर्मिती असते ही आपली पारंपरिक समजूत. प्रतिभा म्हणजे "अ-पूर्व-वस्तु-निर्माण-क्षमा प्रज्ञा". त्यामुळे अ-पूर्वतेला महत्त्व आलं. नवनिर्मिती महत्त्वाची ठरली. अशी निर्मिती करणारी व्यक्ती विशेष ठरू लागली. तिला वलय प्राप्त झालं. प्रतिमुद्राधिकार हा अशा व्यक्तीला दिलेला अधिकार होता. ह्यात दोन गोष्टी वादविषय ठरल्या.
पहिली म्हणजे अ-पूर्वता. अपूर्वता म्हणजे नेमकं काय? ती खरंच निरवलंब स्वरूपाची असते का? ती परंपरेत निर्माण होत असेल तर ती परंपरेची निर्मिती नव्हे का? निर्मितीला विविध संबंध असतात. त्यामुळे अपूर्वताही सापेक्षच असते. काळाच्या विशिष्ट टप्प्यावर जे नवं वाटतं त्याची कारणपरंपरा कालौघात चालत आलेली असते. निर्मितीचं श्रेय नाकारता येत नाही. पण ही निर्मिती सर्वस्वी निरवलंब नसते. तिला परंपरेने आधार पुरवलेले असतात.
दुसरा मुद्दा निर्मात्याला मिळालेल्या अधिकाराचा. प्रत्यक्षात हा अधिकार निर्मिती करणारी व्यक्ती वापरू शकत होती का असा प्रश्न आहे. निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला आपली निर्मिती ही क्रयवस्तू म्हणून बाजारात नेता येईलच असं नाही. निर्मितिप्रक्रिया ही गुंतागुंतीची असते.
पुस्तकाचं उदाहरण घेतलं तर लेखिका ते लिहिते. पण हे लिहिलेलं वाचनयोग्य रूपात मांडावं लागतं. त्याला पुस्तकाचा आकार द्यावा लागतो. वेगवेगळे तंत्रवेत्ते त्या प्रक्रियेत सहभागी असतात. त्यासाठी जी संसाधनं लागतात. ही संसाधनं पुरवू शकेल अशी यंत्रणा निर्माण होते. उदा. प्रकाशिका इ. लेखिकेला वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशिकेचा प्रकाश आवश्यक ठरतो. मग प्रकाशिका तिचं पारिश्रमिक म्हणून लेखकेचा अधिकार स्वतःकडे घेते. म्हणजे अधिकार निर्माती म्हणून लेखिकेला मिळाला पण प्रत्यक्षात प्रकाशिकाच तो वापरते आहे असं झालं.
प्रतीकरणाची प्रगती होत असताना एक टप्पा आला तो प्रतिरूपणाचा. छायाप्रतींचा. पुस्तकाची छायाप्रत करता येऊ लागली. एकच प्रत करता येणं शक्य झालं. कधी ती थोडी महाग पडे. पण मुद्रणाइतका खर्च येत नव्हता. पण प्रतीकरणातला हा टप्पा एका माध्यमापुरताच मर्यादित राहिला.
आणि मग संगणक आले. आधी टेबलावर, मग मांडीवर आणि आता हातांतही. दृक्-श्राव्य अशा विविध प्रकारच्या सामग्रीची निर्मिती आणि वितरण हे संगणकामुळे शक्य झालं. त्याला देशांच्या मर्यादा राहिल्या नाहीत. विजेच्या साहाय्याने आणि विद्युद्वेगाने संपर्क होऊ लागले. देवाणघेवाण शक्य झाली. जे जग आपल्याला अलब्धच होतं ते सहज दिसू लागलं. ही यंत्र आधी महाग होती. खोलीएवढ्या विस्ताराची होती. मग त्यांचे आकार आणि किंमती आवाक्यात येऊ लागले आणि क्षमता मात्र भरमसाट वाढू लागली.
संगणकांनी नवी आशा आणली. नवी संस्कृती आणली. संपर्काच्या मर्यादा उधळून लावल्या. हे विश्वचि माझे घरं ही ज्ञानोबांची उक्ती साकारलीच आहे असं वाटेल अशी परिस्थिती दिसू लागली. मानवी संस्कृतीचं युगानुयुगींचं संचित संगणकाच्या शून्यैकी संकेतात रूपांतरित होऊ लागलं. संकलित होऊ लागलं.
ही परिस्थिती बाजाराला अनुकूलच होती. बाजारही संगणकावर आरूढ होऊन महाजालाच्या आधारे जगभर विस्तारला. मागणी आणि पुरवठा ह्यांना देशांच्या सीमा राहिल्या नाहीत. काय काय विकता येईल ह्याचाही विचार बदलला. जे पूर्वी विकता येईल असं वाटलंही नव्हतं तेही विकता येऊ लागलं. विदा (डेटा) नावाची नवी क्रयवस्तू आकाराला आली. माणसांच्या कृती ह्याच कच्चा माल झाल्या. त्यांच्या कृतींचं विदेत रूपान्तर करून विकता येतं आणि त्यांच्या आधारे माणसांच्या कृती नियंत्रितही करता येतात हे लक्षात आलं.
माणसं संगणक वापरू लागली. त्यांच्या आयुष्याचा तो महत्त्वाचा घटक झाला. पण संगणक म्हणजे काय आणि संगणन म्हणजे काय ह्याचा विचार करणारे थोडेच होते. सोयीच्या नावाखाली मर्यादित संगणन करू देणाऱ्या गोष्टी जगाची 'खिडकी' म्हणून यंत्रात ठाण मांडून बसल्या. संगणकासोबत येणाऱ्या ह्या गोष्टी म्हणजे कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम).
संगणक म्हणजे गणिती-तार्किक क्रिया करून देणारं यंत्र. आपल्याला ज्या क्रिया त्याच्याकडून करवून घ्यायच्या असतील त्या करवून घेता येतात. त्यासाठी संगणकाला कोणत्या क्रिया कोणत्या क्रमाने करायच्या हे सांगणारी आज्ञावली (क्रमाने लिहिलेली आज्ञांची मालिका) पुरवावी लागते. ह्या आज्ञावल्यांनुसार संगणकाचं काम चालतं. एखाद्या यंत्रावर वेगवेगळ्या आज्ञावल्यांचा वापर शक्य करून देणारी आज्ञावली म्हणजे कार्यकारी प्रणाली.
आज्ञावली कोणतीही असो तिचं एक रूप माणसांशी जोडलेलं असतं. म्हणजे आज्ञावली कशी लिहायची हे शिकलेल्या माणसांना समजेल आणि समजून घेता येईल अशा स्वरूपातली आज्ञावली म्हणजे आज्ञालेख (सोर्स कोड). आज्ञावलीचं दुसरं रूप यंत्राशी जोडलेलं असतं. माणसांना कळू शकणारा आज्ञालेख इथे शून्यैकी संकेतात रूपांतरित होतो. आता तो आज्ञालेख राहत नाही. तो केवळ यंत्रांनाच कळेल असा ०,१ ह्या दोन अंकचिन्हांच्या संयोग-क्रमयोगांची मालिका बनतो. त्याला यंत्रलेख म्हणता येईल. यंत्रलेख यंत्राकडून काम करून घेतो. पण त्यात नेमकं लिहिलंय ह्याची उकल करणं म्हणजे महाकठीण कर्म होऊन बसतं.
वापरकर्त्यांना आज्ञावली ही आज्ञालेखाच्या स्वरूपात मिळाली तर वापरकर्ते आपल्याला हवे ते बदल त्या आज्ञावलीत करू शकतात. ती सुधारूही शकतात. पण जर आज्ञावली केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात असेल तर वापरकर्त्यांना ती मिळाली आहे तशी वापरणं ह्यापलीकडे काहीही करता येत नाही.
आज्ञावलीवर नियंत्रण राहावं ह्या हेतूने केवळ यंत्रलेखाच्या स्वरूपात आज्ञावल्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यांना स्वामित्वाधीन (प्रोप्राय्टरी) आज्ञावल्या म्हणतात. वर उल्लेखलेली 'खिडकी' ही ह्या प्रकारातलीच.
पण संगणक हे अशा कार्यकारी प्रणाल्यांद्वारेच वापरता येतात असं नाही. आज्ञालेख हेतुतःच पुरवून संगणन समजून घ्यायला न अडवणाऱ्या, सहकार्यशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यकारी प्रणाल्या आहेतच. त्यांना मुक्त आज्ञावल्या म्हणतात. पण ह्यांचे वापरकर्ते अद्याप मर्यादितच आहेत.
कार्यकारी प्रणाली मुक्त आहे की नाही एवढाच प्रश्न आहे असं नाही. संगणन मुक्त राहू न देणारी संस्कृती हळूहळू फोफावत गेली.
"तुम्हाला पुस्तक वाचायचंय? वाचता येईल. त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील."
हेही आपण मान्य करायला हरकत नाही.
पण "हे पुस्तक वाचायला तुम्हाला आम्ही पुरवू तीच विशिष्ट आज्ञावली किंवा विशिष्ट यंत्रच वापरलं पाहिजे" असंही बंधन येऊ लागलं. पण ते बंधन सोय म्हणून दाखवण्यात आलं.
"आम्ही तुम्हाला पुस्तक वाचायची सोय करून देत आहोत. पण ती वापरण्यासाठी तुम्ही केवळ पैसे देऊन भागणार नाही. तुम्ही काही अटी मान्य करायला हव्यात. तुम्ही पुस्तक आम्ही सांगू तसंच (विशिष्ट यंत्रात किंवा विशिष्ट आज्ञावलीच्या साहाय्यानेच) वाचायला हवं. ही सोय आहे. पण हे यंत्र किंवा ही आज्ञावली नेमकं काय काय करू शकते हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार नाही. तुमची कोणकोणती माहिती ती गोळा करते हे आम्ही सांगू. पण तेवढीच माहिती गोळा करते ह्याची खात्री काय असं तुम्ही आम्हाला विचारता कामा नये. विचारून काही उपयोगही नाही. कारण ते यंत्र किंवा आज्ञावली वापरण्यासाठी आम्ही तुम्हाला देतो तेव्हाच तुम्ही हे मान्य केलेलं असतं की आम्ही केवळ आज्ञावली वापरू. पण ती कशी काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. तसा प्रयत्न आमच्याकडून झाल्यास आम्ही दरोडेखोर ठरू आणि दंडास पात्र होऊ."
इतकी सगळी बंधनं कशासाठी आहेत? प्रतीकरण रोखण्यासाठी? संगणकीय सामग्रीचं जे वैशिष्ट्य आहे? तेच अडवण्यासाठी? केवळ तितकंच नाही.
विदा ही गोष्ट विक्रीयोग्य आहे हे जाणवलेलं आहे. संगणक वापरणाऱ्या व्यक्ती आपले व्यवहार संगणकाच्याच आधाराने करत असतील तर त्यांच्या व्यवहारांविषयीची विदा अनिर्बंधपणे मिळवता येण्यासाठी संगणकीय व्यवहारावर नियंत्रण मिळवावं लागेल. म्हणजे वापरकर्ते संगणक वापरतील. पण त्यावर त्यांचं नियंत्रण कमीत कमी असेल अशा यंत्रणा निर्माण करण्यात येतात. असं करण्यासाठी संगणकीय व्यवहारांत जी यंत्रणा राबवतात तिला इंग्लिशेत डिजिटल-राइट-मॅनेजमेंट तथा डीआरएम अशी संज्ञा वापरण्यात येते. तिचं मराठीकरण करायचं तर संगणकीय-अधिकार-व्यवस्थापन तथा संअव्य असं करता येईल. वस्तुतः पाहिलं तर हे संअव्य म्हणजे संगणकीय-अडवणूक-व्यवस्थापन असतं. वापरकर्त्यांना संगणकीय सामग्री सहज वापरता येणार नाही अशा अडचणी पेरून ठेवणं, वापरकर्त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करण्याचे उपाय योजणं हे ह्या व्यवस्थांचं काम असतं. असं करण्यामागे विविध कारणं असतात. मुख्य कारण हे नफा कमावणं हे असतं. त्यासाठी यंत्र (हार्डवेयर) किंवा आज्ञावली (सॉफ्टवेयर) ह्यांचा वापर करण्यात येतो.
तेव्हा संअव्य ही व्यवस्था वापरकर्त्यांवर अनावश्यक बंधनं घालणारी, त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था आहे. तिच्या नावात जरी अधिकाराचा उल्लेख असला तरी तिचा हेतू अडवणूक करणं हाच आहे. कारण ह्या व्यवस्थांच्या वापराविनाही ते संगणकीय व्यवहार शक्य आहेत. उदा. संगणकीय पुस्तक वाचता येण्यासाठी एखाद्या संअव्य वापरणाऱ्या विशिष्ट आज्ञावलीची आणि तिला लागणाऱ्या विशिष्ट स्वरूपातील पुस्तकाची आवश्यकता नाही. इपब-सारख्या मुक्त स्वरूपात इ-पुस्तके तयार करता येतात आणि ती वाचण्यासाठी वेगवेगळ्या मुक्त आज्ञावल्यांपैकी कोणतीही आज्ञावली वापरली तरी चालते.
उदा. संअव्य वापरून जी पुस्तकं वाचायला मिळतात ती आपल्याला आपल्या मित्रांना देता येत नाहीत. कारण प्रतीकरण शक्य नाही. मुद्रित पुस्तकांपेक्षा संगणकीय पुस्तकाचं प्रतीकरण सहज शक्य आहे. पण ते इथे ते अडवण्यात येते.
संअव्य वापरून ज्या गोष्टी वापराव्या लागतात त्यांत प्रतीकरणच अडवण्यात येते असे नाही. वापरकर्त्यांची विविध प्रकारची माहिती ती आज्ञावली वा ते यंत्र संकलित करत असू शकते. पण ते नेमके काय करते आहे हे वापरकर्त्यांना कळण्याची सोय नसते. कारण ते यंत्र नेमके काय करते वा ती आज्ञावली काय करते हे पाहण्याची सोय वापरकर्त्यांना उपलब्ध नसते. त्यामुळे वापरकर्ते अगतिक असतात.
संअव्ययुक्त गोष्टी मुक्त नसल्याने त्या वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या यंत्रांत वा आज्ञावलीत परस्पर बदल घडवून आणू शकतात. उदा. एका प्रसिद्ध उद्योगसमूहाने आपल्या वापरकर्त्यांच्या वाचनयंत्रांतून ऑरवेलच्या १९८४ ह्या कादंबरीच्या प्रती परस्पर उडवून टाकल्या.
संअव्यच्या समर्थनार्थ वेगवेगळे युक्तिवाद करण्यात येतात. त्यातला एक म्हणजे संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकाराचे रक्षण होते हा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा उद्देश प्रतीकरण मर्यादित करणे असा आहे. म्हणजे प्रतीकरण प्रतिमुद्राधिकारधारकाच्या अनुमतीनेच व्हावे असा आहे. प्रतिमुद्राधिकाराचा भंग झाल्यास शिक्षेची तरतूद असते. प्रतिमुद्राधिकार त्यावेगळ्या वापरावर नियंत्रण ठेवत नाही. संअव्यमुळे वापरकर्त्यांवर अतिरिक्त बंधने येतात. ती अनावश्यक असतात.
संअव्यमुळे प्रतिमुद्राधिकार अबाधित राहतो असं नाही. ज्या कुणाला अनधिकृतरीत्या प्रत करून घ्यायची आहे ते ह्या व्यवस्थांचा वापरच करणार नाहीत आणि ज्यांना अनधिकृत वापर करायचा नाही त्यांना ह्या व्यवस्था वापरल्यामुळे अनावश्यक बंधनांना सामोरे जावं लागतं. आपल्या स्वातंत्र्याचा संकोच करून घ्यावा लागतो. संअव्य वापरून प्रतिमुद्राधिकाराचं रक्षण होतं असं म्हणणं हे "साक्षर व्हा" असे फलक लिहिण्याइतकंच हास्यास्पद आहे. ज्यांना ते वाचता येणार नाहीत (म्हणजे जे निरक्षर आहेत) त्यांच्यासाठी तो संदेश लिहिलेला आहे आणि जे संदेश वाचू शकतात (म्हणजे जे साक्षर आहेत) त्यांना त्या संदेशाची आवश्यकताच नसते.
संअव्यचा वापर केला नाही तर निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचं मोल मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असा युक्तिवाद अनेकदा करण्यात येतो. पण संअव्य न वापरताही निर्मात्यांना आपल्या कलाकृतीचा उचित मोबदला मिळणं शक्य आहे. अनेक लेखक आपली पुस्तके अशा पद्धतीने वितरितही करत असतात. ही पद्धती अद्याप फारशी रूढ झालेली नसली तरी जोम धरते आहे. अनेक प्रकाशकही आपण संअव्यमुक्त पुस्तकं विकतो असे सांगताना आढळतात. (उदा. https://www.smashwords.com/about/supportfaq#drm आणि https://leanpub.com/theoldleanpubmanual/read) उलट संअव्यचा वापर राबवण्याची यंत्रणा ही सामान्यतः प्रत्यक्ष निर्मात्यांकडे नसतेच. ती प्रकाशकांकडे वा वितरकांकडे असते.
संअव्यचा वापर टाळायला हवा कारण ही व्यवस्था मुक्त आज्ञावल्यांचा वापर करत नाही हे तर्कतःच स्पष्ट आहे. ती वापरकर्त्यांवर बंधन घालते. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करते. त्यामुळे शक्य तितकी ही गोष्ट टाळायला हवी.
संअव्य टाळण्यासाठी काय काय करता येईल?
ज्यांत विशिष्ट आज्ञावली वा विशिष्ट यंत्राचाच वापर आवश्यक आहे अशा गोष्टी शक्य तितक्या टाळाव्या. त्यांऐवजी मुक्त स्वरूपात असणाऱ्या गोष्टी वापराव्या. उदा. संगणकीय पुस्तकांसाठी इपब अथवा पीडीएफ अशा विशिष्टच एका आज्ञावलीवर आधारित नसलेल्या स्वरूपांची निवड करावी.
ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेयर फाउंडेशनचे संअव्यविरोधी चळवळीचे संकेतस्थळ (https://www.defectivebydesign.org/) पाहता येईल. ह्या संकेतस्थळावरील (https://www.defectivebydesign.org/guide) हा विभाग बराच उपयुक्त आहे. प्रस्तुत लेखात ह्या संकेतस्थळावरील माहितीचा साभार उपयोग केला आहे.
दि. ०४ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय संअव्यविरोधी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने हे लहानसे टिपण लिहिले आहे.
प्रतिमुद्राधिकार, शर्विलकी (पायरसी) ह्यांबाबत एका लेखकाचं मत.
संगणक साक्षर होण्यासाठी फारच उपयुक्त माहिती, सगळ्या बारीकसारीक तपशिलांसह 👌🏻👏
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
हटवामाहितीपूर्ण लेख. ही चळवळ व्हायला हवी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
उत्तर द्याहटवा