मुक्त ज्ञानाचा परवाना


(सदर लेख अन्वय ह्या दिवाळीअंकात (२०२४) प्रकाशित झाला आहे. )


 

प्रतिमेचे श्रेय : Shaddim; original CC license symbols by Creative Commons, CC BY 4.0, via Wikimedia Commons

माणसे उपद्व्यापी आणि अप्पलपोटीच असतात असे नाही. माणसे उदार आणि सहकार्यशीलही असतात. ती जसे अडवणुकीचे व्यूह रचतात तसेच त्या व्यूहांतून निसटण्याच्या वाटाही शोधतात. इतरांचे घेतात तसे इतरांना देऊही पाहतात. ज्ञान राखून ठेवण्याइतकीच ज्ञान मुक्त करण्याचीही प्रेरणा मानवीच आहे. ह्या प्रेरणेतूनच आधुनिक काळात मुक्त ज्ञानाची चळवळ साकारलेली आहे. ह्या चळवळीला वैधानिक (कायदेशीर) आधार पुरवण्याचे काम क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या संस्थेच्या विविध परवान्यांनी केलेले आहे. अलीकडे विद्याशाखीय व्यवहारात ह्या परवान्यांचा वापर वाढलेला आढळतो. ह्या परवान्यांमुळे अभ्यासासाठी, निर्मितीसाठी विविध प्रकारची सामग्री विधिसंमत स्वरूपात उपलब्ध होते. ह्या परवान्यांमागील विचार, परवान्यांचे स्वरूप, त्यांच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी ह्यांचा संक्षिप्त परिचय ह्या लेखातून करून देण्यात येत आहे.

१  तंत्र, संपत्ती आणि नियमन

तंत्रविद्या1 माणसांना स्थलकालाच्या बंधनातून मुक्त करते. उदा. लेखन हे एक तंत्र आहे. लेखनपूर्व काळात दोन व्यक्तींना परस्परांशी संवाद साधायचा असेल तर त्या व्यक्ती एका स्थळी एका काळात असणे आवश्यकच होते. पण लेखनामुळे ही मर्यादा दूर झाली. एका व्यक्तीने आता लिहिले ते नंतरच्या काळात वाचता येते. दूरच्या व्यक्तीचे लेखन (पत्र किंवा इतर) दुसरीकडे पोहोचवता आले तर एकमेकांपासून दूर असलेल्या व्यक्तींचा संवाद शक्य होतो.

माणसांच्या जगात केवळ तंत्रविद्या नसते. तंत्र असते तसेच नियमनही असते. विपुला धरणीवर माणसे रेघोट्यांनी घरे पाडतात. ही भूमी आपली. ती त्यांची. अशी वाटणी करतात. इकडले कुणी तिकडे सरकू लागले तर अटकाव करतात. प्रसंगी डांबून ठेवतात किंवा ठारही करतात. हे सारे नियमनाचे प्रयत्न आहेत. तंत्रविद्या सोय निर्माण करते. पण ती कुणी, कधी, कशी वापरावी ह्याचे नियमन माणसे करतात. संचय आणि रक्षण हा ह्या नियमनाचा हेतू असतो. ज्याचा संचय आणि ज्याचे रक्षण करायचे असते ती संपत्ती ठरते. म्हणजे माणसांच्या जगात केवळ तंत्र नसते तर संपत्ती आणि त्यासाठीचे नियामक विधीही (कायदेही) असतात. तंत्र बदलते तसे ह्या विधिनियमांतही बदल होत असतात. त्यांचा अधिक विचार करण्याची किंवा पुनर्विचार करण्याची निकड निर्माण होते. त्यातून नवे विचार आणि नव्या व्यवस्था उदयाला येतात.

२  मुद्रणाचे युग

लेखनाच्या तंत्राने माणसांनी ज्ञानाचे संचित निर्माण केले. कोणतेही संचित राखणे कठीणच. ज्या माध्यमावर लिहायचे ते माध्यम टिकाऊ हवे. ते टिकाऊ असले तरी परवडणारे हवे. त्यामुळे ग्रंथशाळाही मोजक्याच होत्या. ग्रंथाची प्रत करणे कष्टाचे होते. मागणी कमी, पुरवठाही मर्यादित. त्यामुळे नियमनही फार नव्हते. एकाचा ग्रंथ दुसरा वाचू शके. किंबहुना वाचन सार्वजनिकच असायचे. विश्वास वाटला तर ग्रंथसंग्रहाचा मालक आपल्याकडचा ग्रंथ वाचायला वा नकलायालाही देई.

हळू हळू तंत्र प्रगत झाले. छाप्याची पुस्तके निघू लागली. एका पुस्तकाच्या अनेक प्रती सहज करता येऊ लागल्या. लोक अशा प्रती बाळगूही लागले. मुद्रणाचे हे नवे तंत्र युरोपात निर्माण झाले आणि त्याअनुषंगाने तेथे विविध घडामोडी घडू लागल्या.

जेव्हा येशूचे चरित्र आणि त्याच्या शिकवणी येशूचे शिष्य सगळ्यांना सांगत होते. त्यावेळी ते मौखिकच होते. मग कुणी तरी ते लिहून काढले. मग त्या प्रतींच्या प्रती काढायचे काम सुरू झाले. असे करता करता येशूचा धर्म स्थापन झाला आणि तो स्थानिक मर्यादा ओलांडून पसरत चालला. ह्या पसरण्याला मर्यादा होत्याच. पण मुद्रण आले आणि ह्या पसरण्याचा वेग वाढला. गुटेनबर्ग नावाच्या तंत्रविद्याे पहिल्यांदा बायबल छापले. बायबल छापता येते तशा इतरही गोष्टी छापता येतात हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लेखन छापण्याचा सपाटा लागला. छापण्यासाठी एकाहून अधिक व्यक्तींचे हात लागत होते. एका पुस्तकाच्या निर्मितीत अनेकांचा हातभार लागू लागला. पुस्तक म्हणजे पुस्तकाचा मजकूर लिहिणे, खिळे जुळवून तो मांडणे, तो छाप्यावर छापणे, पाने एकत्र बांधणे, बांधलेल्या प्रतींची ने-आण करणे अशा अनेकांच्या सहभागाने पुस्तक तयार होऊ लागले. पण आता ह्या पुस्तकाचा मालक कोण?

३  अधिकाराचा प्रश्न

पुस्तक कुणाचे? हा प्रश्न आला. मुळात कुणी लिहिलेच नाही तर पुढचे काहीच शक्य नाही. त्यामुळे लेखक प्रधान. अन्य गौण. त्यामुळे मूळ मालक लेखक हाच. त्यामुळे मग लेखक महत्त्वाचे ठरले. लेखकांमुळे लेखन होते. लेखनाद्वारे मानवी विचारविकार नोंदवण्यात येतात. त्याने आधीच्या पिढीचा पुढच्या पिढीशी, एका विचार करणाऱ्या व्यक्तीचा विचार करणाऱ्या वा करू पाहणाऱ्या अनेक व्यक्तींशी संबंध जुळून येतो. लेखक हे प्रतिभावंत असतात. नवनिर्मिती करणारे असतात. त्यामुळे लेखकांना जपायला हवे असे वाटू लागले. म्हणजे लेखकाने लिहिल्याबद्दल लेखकाला पारिश्रमिक मिळायला हवे. पण लेखक एकच प्रत लिहितो. त्याच्या अनेक प्रती छापता येतात. मग लेखकाला एकदाच पारिश्रमिक द्यायचे का? पण लेखकाने लिहिलेच नाही तर अनेक प्रती छापणेही शक्य होणार नाही. त्यामुळे लेखकाला एक अधिकार देण्यात आला. त्यानुसार त्याच्या लेखनाच्या प्रती त्याच्या अनुमतीविना काढता येणार नव्हत्या. त्या अनुमतीसाठी त्याला काही मानधन मिळवणे शक्य होणार होते आणि त्यायोगे अनेकांना लेखन करायला हुरूप येणार होता. हा अधिकार प्रति-मुद्रा-अधिकार म्हणून प्रसिद्ध आहे.

पण अडचण अशी की लेखनाला एक मस्तक, दोन हस्तक, लेखणी, दौत, कागद इतकी सामग्री पुरते. लिहिलेले पुस्तक छापायला मात्र बरेच काय काय लागते. त्या सगळ्या गोष्टी लेखकाच्या हाती असतीलच असे नाही. त्यामुळे लेखक हा छापखान्याच्या मालकावर अवलंबून राहू लागला. पूर्वी प्रकाशक आणि मुद्रक हे एकच होते. पुढे छापणारे वेगळे, प्रकाशित करणारे वेगळे अशीही व्यवस्था आली. ह्या सगळ्यात लेखकाच्या नावावर प्रतिमुद्राधिकार अबाधित राहिला. पण त्याचा खरा लाभ आधी मुद्रकांना आणि नंतर प्रकाशकांनाच मिळत राहिला असे म्हणता येईल. प्रतिमुद्राधिकाराची ही संकल्पना केवळ लेखनापुरती मर्यादित राहिलेली नाही. एकंदर वेगवेगळ्या स्वरूपात तिचा विचार होत असतो. ह्या लेखात सोयीसाठी तो प्राधान्याने लेखनासंदर्भात मर्यादित केला आहे.

४  प्रतिमुद्राधिकार : हवा-हवासा आणि नको-नकोसा

अर्थातच प्रतिमुद्राधिकाराची संकल्पना काही वादातीत नाही. कारण लेखक नवनिर्मिती करतात म्हणजे नेमके काय नवीन करतात? त्यांच्या कृती परंपरासापेक्ष असल्याने परंपरेकडून ते किती आणि काय घेतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरते.

दुसरे म्हणजे प्रतिमुद्राधिकाराची व्याप्ती आणि मर्यादा काय असावी हाही प्रश्न आहेच. काहींना प्रतिमुद्राधिकार काही मर्यादित काळापुरता असावा असे वाटते तर काहींना तो निरंतर असावा असे वाटते.

अशा वेगवेगळ्या वैध मुद्द्यांमुळे प्रतिमुद्राधिकाराबाबत दोन टोकाच्या भूमिका घेण्यात आलेल्या आढळतात. पहिली भूमिका म्हणजे लेखकांच्या कृतींना प्रतिमुद्राधिकार मिळालाच पाहिजे आणि त्याची व्याप्ती निरंतर असली पाहिजे. तर काहींना प्रतिमुद्राधिकार असण्याची मुळीच आवश्यकता वाटत नाही. परंपरासापेक्ष निर्मितीला विशेषाधिकाराची आवश्यकताच काय अशीही भूमिका काहींनी घेतलेली आढळते.

५  नियमन : मुद्रणापासून संगणनापर्यंत

मुद्रणाच्या काळात ग्रंथव्यवहाराचे नियमन प्रतिमुद्राधिकाराद्वारे होत होते. प्रतिमुद्राधिकाराचा अर्थ प्रत करण्यासाठी अनुमती देण्याचा अधिकार असा होता आणि अनुमती देण्याचा मूळ अधिकार निर्मात्याचा (लेखकाचा) होता. अर्थात पुढे निर्मात्याने तो अधिकार अन्य कुणाकडे सोपवला तर तो त्या अन्य व्यक्ती वा संस्थेकडे असणार हे स्पष्ट होते. म्हणजे प्रती करण्यासाठी लेखकाची अनुमती आवश्यक असण्यापासून प्रती करण्यासाठी प्रतिमुद्राधिकारधारकांची अनुमती आवश्यक, इथवर ह्या नियमनाचा प्रवास झालेला आढळतो.

पण ह्या काळात प्रतिमुद्राधिकाराने नियमित असणारा व्यवहारच मर्यादित होता. प्रती करायच्या असतील तरच अनुमती आवश्यक होती. मी माझी प्रत मित्रांना वाचायला देऊच शकत होतो. हे कृत्य विधिसंमत नसले तरी विधिविरोधीही नव्हते. वस्तुतः ते विधिकक्षेच्या बाहेरचे होते. अशा नियमनरहित कृतींचे क्षेत्र मोठे होते. पण हळू हळू ते आक्रसत जाऊ लागले.

प्रतीकरणाची प्रगती होत असताना एक टप्पा आला तो प्रतिरूपणाचा. छायाप्रतींचा. पुस्तकाची छायाप्रत करता येऊ लागली. एकच प्रत करता येणे शक्य झाले. कधी ती थोडी महाग पडे. पण मुद्रणाइतका खर्च येत नव्हता. पण प्रतीकरणातला हा टप्पा एका माध्यमापुरताच मर्यादित राहिला. अर्थात लवकरच ह्या कृती नियमनाच्या कक्षेत आल्या. त्यांना अटकाव करण्यात येऊ लागला.

आणि मग संगणक आले. आधी टेबलावर, मग मांडीवर आणि आता हातांतही. दृक्-श्राव्य अशा विविध प्रकारच्या सामग्रीची निर्मिती आणि वितरण हे संगणकामुळे शक्य झाले. त्याला देशांच्या मर्यादा राहिल्या नाहीत. विजेच्या साहाय्याने आणि विद्युद्वेगाने संपर्क होऊ लागले. देवाणघेवाण शक्य झाली. जे जग आपल्याला अलब्धच होते ते सहज दिसू लागले. ही यंत्रे आधी महाग होती. खोलीएवढ्या विस्ताराची होती. मग त्यांचे आकार आणि किंमती आवाक्यात येऊ लागल्या आणि क्षमता मात्र भरमसाट वाढू लागली.

संगणकांनी नवी आशा आणली. नवी संस्कृती आणली. संपर्काच्या मर्यादा उधळून लावल्या. हे विश्वचि माझे घर ही ज्ञानोबांची उक्ती साकारलीच आहे असे वाटेल अशी परिस्थिती दिसू लागली. मानवी संस्कृतीचे युगानुयुगींचे संचित संगणकाच्या शून्यैकी संकेतात रूपांतरित होऊ लागले. संकलित होऊ लागले.

पण संगणकावर एखादी गोष्ट वाचणे म्हणजे प्रत करूनच घेणे ठरू लागले. बरे, ह्या संगणकीय प्रतीकरणासाठी वेगळा काही खर्चही नसे. प्रतीकरण सोपे झाले होते. ह्या परिस्थितीत नियमनाची व्याप्तीही वाढू लागली. पूर्वी वाचण्यासाठी अनुमतीची आवश्यकता नव्हती. आता संगणकावर वाचनासाठीही अनुमती लागते. अनेकदा त्यासाठी पैसे मोजावे लागतात. जवळपास प्रत्येकच कृतीसाठी आता अनुमती आवश्यक ठरू लागली. अर्थातच ह्या नियमनांचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता अनेकांना वाटू लागली.

६  मुक्त आज्ञावल्यांची चळवळ

संगणकीय नियमनामुळे इतक्या महत्त्वाच्या तंत्रविद्यााच्या किल्ल्या काही मूठभर ’आहे रे’ वर्गाकडे जात आहेत हे लक्षात येणारेही अनेकजण होतेच. मुळात संगणक जेव्हा प्रस्थापित होत होते तेव्हा संगणकीय व्यवहार मर्यादित असला तरी तो मुक्त होता. संगणकीय व्यवहारासाठी आज्ञावली लागतात. आज्ञावली म्हणजे संगणकाकडून एखादे काम करून घेण्यासाठी संगणकाला दिलेल्या आज्ञांचा लेख. हा लेख माणसे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लिहितात. त्याला आज्ञालेख (सोर्स कोड) असे म्हणतात. त्याचे इलेक्ट्रॉनिक (वीजकीय) संकेतांत (द्विमानी/ बायनरी) रूपांतर होऊन यंत्राला आज्ञा मिळतात आणि यंत्र त्यानुसार संगणन करून फलित निर्माण करते. विविध आज्ञावल्या एकाच संगणकावर चालवण्याची सोय ही एका मध्यस्थ आज्ञावलीद्वारे करण्यात येते. तिला कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) म्हणतात.

ह्या सगळ्या व्यवहारात आज्ञावली हा कळीचा मुद्दा होता. पूर्वी आज्ञावल्यांची मुक्त देवाणघेवाण होत होती. इतरांची आज्ञावली आपण घ्यावी त्यात हवे ते बदल करावेत आणि बदललेली आज्ञावली अन्य कुणी आपल्याकडे मागितली तर त्यांनाही त्यांच्या उपयोगासाठी द्यावी असा मुक्त व्यवहार रूढ होता.

पण ह्यामुळे आज्ञावलीच्या लेखकाला लाभ कसा मिळेल असा विचार करून मग आज्ञावलीसाठीही प्रतिमुद्राधिकाराची संकल्पना लागू करण्यात आली. ह्या काळात व्यक्तिगत संगणकही (पर्सनल कंप्यूटर) उपलब्ध होऊ लागले. त्यांवर कार्यकारी प्रणाली असणे आवश्यक होते. त्यामुळे अशा कार्यकारी प्रणाल्या तयार करून त्या विकून श्रीमंत होता येईल हे लक्षात आले. पण जर आज्ञावल्यांची सहज देवाणघेवाण होऊ शकत अशेल तर मग आज्ञावल्या लिहिणाऱ्यांना पैसे कसे कमावता येतील?

ह्यासाठी दोन कॢप्त्या योजण्यात आल्या. पहिली म्हणजे वापरकर्त्याला आज्ञावली ही आज्ञालेखाच्या (सोर्स-कोडच्या) स्वरूपात न देता केवळ यंत्रगम्य अशा द्विमानी (बायनरी) स्वरूपात द्यायची प्रथा अस्तित्वात आली. त्यामुळे संगणन नेमके कसे होते हे वापरकर्त्यांना कळण्याचा वा समजून घेता येण्याचा मार्गच बंद झाला. हे यंत्राच्या वापराच्या स्तरावरचे तंत्रज्ञांद्वारे करण्यात आलेले नियमन होते.

मुळात संगणकाची आज्ञावली ही संगणकावरच प्रातिभासिक (व्हर्चुअल) स्वरूपातच उपलब्ध असते. जर एखाद्या खटपट्या व्यक्तीने द्विमानी स्वरूपातील आज्ञावलीचे निरीक्षण करून तिचे आज्ञालेखाचे स्वरूप शोधायचे ठरवले तर ते बरेच कष्टाचे झाले असते. पण असे करणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा करण्याची तरतूद करणारे विधिसंमत नियमन अस्तित्वात आले. त्यामुळे कार्यकारी प्रणालीचा वापर सुरू करतानाच — ही आज्ञावली केवळ माझ्या वैयक्तिक वापरासाठी आहे, तिचा वापर मी मर्यादित ठेवीन, ती कशी काम करते हे समजून घेण्यासाठी खटपटी करणार नाही — अशा आशयाच्या अटी मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र मान्य केल्याची नोंद करावी लागते. त्यातील अटींचा भंग झाल्यास व्यक्तीवर खटला दाखल होऊ शकतो. वापरकर्त्यांवर अशी तंत्रविद्याात्मक आणि वैधानिक बंधने घालणाऱ्या आज्ञावल्यांना स्वामित्वाधिकारित (प्रोप्रायटरी) आज्ञवल्या असे म्हणतात.

रिचर्ड स्टॉलमन ह्या प्रतिभावंत आज्ञावलीकाराला हे बदल मान्य नव्हते कारण तो मुक्त आज्ञावल्यांच्या काळात वाढला होता. स्टॉलमनने ह्या स्वामित्वाधिकारातील आज्ञावल्यांसारखेच काम करून देऊ शकणारी ग्नू2 नावाची एक नवी कार्यकारी प्रणालीच तयार करण्याचा निर्णय घेतला. हा तंत्रविद्याात्मक नियमनाला भेदण्याचा मार्ग होता. पण त्याच वेळी स्टॉलमनला वैधानिक नियमनातूनही मार्ग काढणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्याने त्याने अनेक विधिज्ञ मंडळींच्या साहाय्याने एक परवाना लिहिला. त्याचे नाव ग्नू जनरल पब्लिक लायसन्स असे होते.

ह्या परवान्यासाठी स्टॉलमनने प्रतिमुद्राधिकाराच्या वैधानिक चौकटीचा कौशल्याने वापर केला आणि जे विधिनियम वापरकर्त्यांना अडवण्यासाठी वापरण्यात येत होते. त्यांच्या जागी त्याच प्रतिमुद्राधिकाराचा वापर करून आज्ञावलीसंदर्भात चार स्वातंत्र्ये वापरकर्त्यांना देऊ केली. ह्या परवान्यानुसार आज्ञावली लिहिणारा आज्ञावलीकार हा प्रतिमुद्राधिकारधारक म्हणून वापरकर्त्यांवर बंधने घालण्याऐवजी त्यांना पुढील स्वातंत्र्ये प्रदान करतो.

  • ००3 . आज्ञावलीचा हवा तसा (व्यावसायिकही) वापर करण्याचे स्वातंत्र्य
  • ०१. आज्ञावली कशी काम करते ते पाहण्याचे आणि आपले काम करून घेण्यासाठी त्या आज्ञावलीत आवश्यक ते बदल करण्याचे स्वातंत्र्य 4 .
  • ०२. इतरांना साहाय्य करण्यासाठी ह्या आज्ञावलीच्या प्रती करून त्या इतरांना देण्याचे स्वातंत्र्य.
  • ०३. आपण आज्ञावलीत काही बदल केले असतील तर ह्या बदलांसह ही सुधारित आज्ञावली इतरांना वापरासाठी उपलब्ध करून देण्याचे स्वातंत्र्य.

पण हा परवाना एकच अट घालतो. ती म्हणजे, ह्या परवान्याअंतर्गत जी सामग्री तुम्हाला मिळाली आणि ह्यातील ०३ ह्या क्रमांकाच्या स्वातंत्र्याचा वापर करून तुम्ही सुधारित आज्ञावली वितरित करणार असाल तर तुम्हाला मिळालेली चारही स्वातंत्र्ये तुम्हाला इतरांनाही द्यावीच लागतील.

स्टॉलमन ह्यांनी प्रतिमुद्राधिकाराच्या वैधानिक नियमनाचा अतिशय कौशल्याने वापर करून वापरकर्त्यांची अडवणूक करण्याऐवजी त्यांना स्वातंत्र्ये देऊ केलेली आढळतात.

७  क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने

स्टॉलमन ह्यांच्या परवान्यापासून प्रेरणा घेऊन क्रिएटिव्ह कॉमन्स ह्या संस्थेने आपले काही परवाने तयार केलेले आढळतात. ते तयार करताना त्यांनी केलेला विचारही लक्षात घेणे आवश्यक आहे.

मुळात बराचसा कलाव्यवहार हा वर्तमानकालीन अथवा भूतकालीन इतर कलाव्यवहाराच्या सापेक्षतेनेच होत असतो. कलावंत अन्य कलावंतांच्या कलांचा आस्वाद घेत कलानिर्मिती करायला शिकतात. आपल्या पूर्वसूरींना कलास्वरूपात प्रतिसाद देताना त्यांच्या काही आविष्कारांचे अनुकरण, प्रतिरूपण वा विरूपणही करतात. साहित्यव्यवहारातही हेच होत असते.

पण जेव्हा एक कलावंत आपल्या पूर्वसूरींचे अनुकरण, प्रतिरूपण वा विरूपण करू पाहतो तेव्हा त्याला प्रतिमुद्राधिकारामुळे संभ्रम पडतो. अनेक जण अर्थातच प्रतिमुद्राधिकार धुडकावून जे करायचे ते करतच असतात. सापडले तर ते अपराधी ठरतात. न सापडले तर काहीच होत नाही.

पण जे प्रामाणिक आणि सद्हेतूने पूर्वसूरींच्या सामग्रीचा वापर करू इच्छितात त्यांना प्रतिमुद्राधिकाराच्या तरतुदीमुळे परवानगी मिळेल की न मिळेल ह्याबाबत अनिश्चितता असते. अनेकदा प्रतिमुद्राधिकारधारकाची माहिती उपलब्ध नसते. पण नेमका आपण वापर केला आणि नंतर प्रतिमुद्राधिकारधारक उपस्थित झाला तर काय करायचे हा प्रश्नच असतो.

तेव्हा अशा प्रामाणिक हेतू असलेल्या वाचकांना, लेखकांना आणि कलावंतांना सामग्रीच्या वापराबद्दल संभ्रम राहू नये ह्यासाठी क्रिएटिव्ह कॉमन्सच्या परवान्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हे परवाने आपल्या सामग्रीचे कोणत्या प्रकारचे वापर शक्य आहेत हे स्पष्ट करतात. त्यामुळे संभ्रमाला वाव उरत नाही.

संगणकीय आज्ञावलीसंदर्भातील मुक्त परवान्यात आज्ञालेख देणे ही अट कळीची अट आहे. कारण आज्ञा कशा लिहिल्या आहेत, त्या कोणत्या क्रमाने कोणत्या कृती करायला सांगतात हे कळले नाही तर वापरकर्त्याला खऱ्या अर्थी स्वातंत्र्याचा वापरच करता येणार नाही.

पण आज्ञावलीतर सामग्रीसाठी आज्ञालेखासंदर्भातील अटीचा विचार करावा लागतो. पुस्तक वाचताना त्यातील पाठ्य हेच इथे आज्ञालेखासारखे कार्य करत असते. पाठ्य मिळाले की मग काही अडचण राहत नाही. ते कोणत्याही स्वरूपात असो.

दुसरे म्हणजे पुस्तकासंदर्भातील बदल करण्याचे स्वातंत्र्य हा मुद्दा थोडा अडचणीचा ठरू शकतो. एखाद्या लेखात माझी मते व्यक्त झालेली असतील तर त्या पाठ्यात कुणी बदल करावा असे मला वाटणे कठीण ठरेल.

त्यामुळे ह्या संस्थेने सामग्री संदर्भात कोणकोणत्या कृती शक्य आहेत ह्यांचा विचार करून पुढील घटक निश्चित केले आहेत.

  • सामग्रीची प्रत करून घेणे आणि ती यथामूल प्रत इतरांना देणे
  • उचित श्रेयनिर्देश करणे
  • सामग्रीचा वापर वैयक्तिक स्वरूपात करणे किंवा व्यावसायिक स्वरूपात करणे
  • सामग्रीवर आधारित सामग्री तयार करण्यास अनुमती देणे वा न देणे

संगणकीय व्यवहारात ह्यांपैकी कोणत्याही मुद्द्यासाठी प्रत करून घेणे व इतरांना देणे ही बाब अंतर्भूतच असल्याने तसेच उचित श्रेयनिर्देश करण्यासंदर्भात मतभेदाला वावच नसल्याने केवळ वापराचे स्वरूप (व्यावसायिक वा व्यावसायिकेतर) आणि आधारित निर्मितीला अनुमती देणे वा न देणे ह्या दोनच बाबींचा विचार करणे आवश्यक ठरते. त्यानुसार पुढील परवाने सिद्ध होतात.

१. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून हवा तसा वापर करण्यासाठी आणि आधारित सामग्री तयार करण्यासाठी अनुमती देणारा श्रेयनिर्देशन-परवाना (CC BY)
२. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून हवा तसा वापर करण्यासाठी आणि आधारित सामग्री तयार करण्यासाठी अनुमती देणारा पण आधारित सामग्रीचे वितरण करताना हाच परवाना लावला पाहिजे अशी अट घालणारा श्रेयनिर्देशन-समवितरण-परवाना (CC BY-SA)
३. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून केवळ अव्यावसायिक वापरासाठी अनुमती देणारा श्रेयनिर्देशन-अव्यावसायिक-उपयोजन-परवाना (CC BY-NC)
४. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून केवळ अव्यावसायिक वापरासाठी अनुमती देणारा आणि आधारित सामग्रीचे वितरण करताना हाच परवाना लावला पाहिजे अशी अट घालणारा श्रेयनिर्देशन-अव्यावसायिक-उपयोजन-समवितरण परवाना (CC BY-NC-SA)
५. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून यथामूल सामग्रीचा हवा तसा वापर करण्यासाठी अनुमती देणारा पण आधारित सामग्रीच्या वितरणाला प्रतिबंध करणारा श्रेयनिर्देशन-उपयोजन-यथामूल-वितरण-परवाना (CC BY-ND)
६. उचित श्रेयनिर्देशाची अट पाळून यथामूल सामग्रीचा केवळ अव्यावसायिक वापरासाठी अनुमती देणारा पण आधारित सामग्रीच्या वितरणाला प्रतिबंध करणारा श्रेयनिर्देशन-अव्यावसायिक-उपयोजन-यथामूल-वितरण-परवाना (CC BY-NC-ND)
७. सर्वाधिकार सार्वजनिक करून वापर, वितरण ह्यांसंदर्भात कोणतीही अट नसलेला सार्वजनिक-परवाना (CC0)
 
 
उपरोक्त ७ परवान्यांपैकी १ ते ६ हे परवाने त्यांच्या मुक्ततेच्या उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. म्हणजे पहिला परवाना सर्वाधिक मुक्त असून सहावा परवाना सर्वात कमी मुक्त आहे.

७ व्या परवान्यात प्रतिमुद्राधिकार ० असल्याने त्यात स्वातंत्र्ये देण्याचा प्रश्नच उरत नाही. हा परवाना लावलेली सामग्री मूलतःच मुक्त असते.

उपरोक्त ७ परवान्यांपैकी १, २ आणि ७ हे परवाने मुक्त संस्कृतीचे परवाने म्हणून ओळखण्यात येतात. कारण त्यांत वापरकर्त्यांवर कमीत कमी बंधने आहेत आणि जे बंधन (क्र. २च्या परवान्यात) आहे ते एकंदर वापरकर्त्यावर्गाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने घातलेले आहे. आधारित सामग्री ह्याच परवान्याअंतर्गत वितरित करण्याची अट ही परवान्याने दिलेली स्वातंत्र्ये अबाधित राखण्याची काळजी घेते.

उर्वरित परवाने मुक्त संस्कृतीचे परवाने गणण्यात येत नाहीत कारण त्यांत वापरकर्त्यांवर काही बंधने घातलेली आढळतात. ह्यांपैकी काही परवान्यांसंदर्भात मुक्त ज्ञानाच्या चळवळींतीलच काही जणांनी टीका केलेली आढळून येते. अधिक माहितीसाठी पाहा : https://stallman.org/articles/online-education.html

क्रिएटिव्ह कॉमन्सचे एक संस्थापक लॉरेन्स लेसिग ह्यांनी ह्याचे स्पष्टीकरण दिले आहे की आमचे धोरण सर्वाधिकार राखीव ह्याऐवजी काही अधिकार राखीव असे मध्यममार्गी आहे. पण ह्यांपैकी कोणत्याही परवान्यात प्रत करण्याचा आणि ती यथामूल इतरांना देण्याचा अधिकार नाकारण्यात येत नाही.

८  परवान्यांची कक्षा

ह्या परवान्यांमुळे सामग्रीचा दुरूपयोग झाला तर काय करायचे? अशी शंका काहींना येऊच शकते. मुळात दुरुपयोग टाळणे हे परवान्यांच्या कक्षेत येतच नाही. सर्वाधिकार राखीव ठेवणाऱ्या परवान्यांच्या अटींचाही भंग होऊच शकतो. त्याला शास्ती मिळेल की नाही हे परवानाधारकाच्या हाती किती सत्ता आहे ह्यावरच अवलंबून आहे. उदा. माझ्या ह्या लेखाची बिल गेट्स ह्यांनी अनधिकृत प्रत वितरित केली तरी त्यांना शास्ती करण्याइतकी सत्ता माझ्याकडे असणार नाही. ह्याउलट त्यांच्या बाबतीत माझ्याकडून अगदी लहान आगळीक झाली तरी मला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकेल.

परवाने दुरुपयोगाला अटकाव करू शकत नाहीत. पण ते सदुपयोगाला साहाय्यभूत होऊ शकतात. क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने हे ह्या प्रकारातले आहेत.

९  काय फल ह्या तपाला?

आज क्रिएटिव्ह कॉमन्सचे परवाने लागलेली प्रचंड सामग्री महाजालावर उपलब्ध आहे. छायाचित्रे, नकाशे, पाठ्यपुस्तके, विदागारे (डेटाबेस), ध्वनिमुद्रणे, ध्वनिचित्रमुद्रणी अशी हवी ती बरीच सामग्री आज उपलब्ध झालेली आहे. ह्यांपैकी काही सामग्री शोधण्यासाठी पुढील दुव्याचा वापर करता येईल. https://search.creativecommons.org/

विकिपीडिया आणि त्याच्याशी संबंधित सर्व सामग्री क्रिएटिव्ह कॉमन्सच्या मुक्त परवान्यांअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कलावंत ह्या सर्वांसाठी ही सामग्री पुनर्वापर करण्यासाठी सहज उपलब्ध आहे. गूगलच्या हुडकयंत्रणेत (सर्च-इंजिन) मुक्त परवाने असलेली सामग्री शोधण्याची सोय आहे.

ज्ञान मुक्त असावे अशी भूमिका घेणाऱ्यांपैकी अनेकांना ह्या संस्थेचे मुक्त परवाने आपल्या सामग्रीसाठी वापरता येण्यासारखे आहेत.

संदर्भ


Lessig, Lawrence (12 ऑक्टो., 2005अ). CC in Review: Lawrence Lessig on How it All Began. दुवा: https://creativecommons.org/2005/10/12/ccinreviewlawrencelessigonhowitallbegan/ (07/10/2024 भेट दिली).


— (06 ऑक्टो., 2005आ). CC in Review: Lawrence Lessig on Supporting the Commons. दुवा: https://creativecommons.org/2005/10/06/ccinreviewlawrencelessigonsupportingthecommons/ (07/10/2024 भेट दिली).

सदर लेख क्रिएटिव्ह कॉमन्सच्या श्रेयनिर्देशन-समवितरण \00\00\00 ह्या परवान्याअंतर्गत वितरित करण्यात येत आहे. उचित श्रेयनिर्देश करून ह्या लेखाची प्रत आपण करून घेऊ शकता तसेच ह्या लेखावर आधारित अशी सामग्री आपण तयार करू शकता. मात्र त्या आधारित सामग्रीचे वितरण ह्याच परवान्याअंतर्गत करावे लागेल. परवान्याच्या सविस्तर अटी व शर्तींसाठी पुढील दुवा पाहावा. https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट