सुबोध


 

सुबोध

 (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा)

माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत राहतात. काहींचा सहवास सातत्याने लाभूनही जवळीक मात्र निर्माण होत नाही. उलट काही लोक सहवासात नसले तरी मनांत घर करून राहतात.

सुबोधला जाऊन आता महिना होत आला तरी ती बातमी खरी नाही, निदान खरी असू नये, असं वाटत राहिलंय. सुबोधशी मैत्रीचं नातं जुळलं ते फार वेगळं होतं. आम्ही परस्परांच्या व्यक्तिगत गोष्टी फारच क्वचित बोललो असू एकमेकांशी. रूढार्थाने ज्याला जीवलग मैत्री म्हणतात तिची लक्षणं ह्या मैत्रीत कुणाला क्वचितच दिसतील. पण तरी त्याच्या जाण्याने काही तरी हरवल्याची जाणीव मनात येतच राहिली. स्मरणं तपासू लागलो तर ह्या जाणिवेचा काही बोध होऊ शकेल असं वाटतं.

इ. स. २००२च्या सुमारास संवाद ह्या वाचकगटाच्या कार्यक्रमात सुबोधची भेट झाली. नेमकी कधी ते आठवत नाही. पण एका कार्यक्रमानंतर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिल्याची नोंद माझ्या दैनंदिनीत आहे. त्या गप्पांत सहभागी असणाऱ्यांत सुबोधचं नाव आहे.

संवाद ह्या वाचकगटाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी मराठी साहित्यावर चर्चेचा कार्यक्रम असे. विषय रोचक असत. सहभागाला कुणालाच कसलीच आडकाठी नव्हती. गटाचं स्वरूप बरंचसं अनौपचारिक होतं. भेटीची जागा तशी माझ्या तेव्हाच्या घरापासून जवळची होती. वरळीच्या नेहरू केंद्राच्या तालीमकक्षात ह्या चर्चेसाठी सगळे जमायचे. सगळंच सोयीचं होतं. त्यामुळे अगदी सहजच मी त्या उपक्रमांना उपस्थित राहू लागलो आणि चर्चेनंतरच्या चर्चेतही.

चर्चेत सहभागी होणारे बरेच असले तरी काही लोक अर्थातच लक्ष वेधून घेणारे होते. संवादची सगळी जमवाजमव सहजपणे करणारे प्रमोद बापट हे तर संवादचं केंद्र आहे हे सहज लक्षात येण्याजोगं होतं. लक्ष वेधून घेणाऱ्यांत एक सुबोधही होता. विषय कोणताही असला तरी त्याच्याकडे त्यातलं वेगळं सांगण्यासारखं काही तरी असायचं. त्याचं वाचन चौफेर होतं. मुख्य म्हणजे ते केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नव्हतं. नियतकालिकांतल्या लेखांचे, दिवाळीअंकांचे संदर्भ त्याच्या बोलण्यात अगदी सहज यायचे. जादुगाराने आपल्या पोतडीतून काही तरी अद्भुत काढून दाखवून आपल्याला मंत्रमुग्ध करावं तसं आपल्या पोतडीतून सुबोध काय काय काढून दाखवायचा. बरं हे सगळं सहज व्हायचं. त्यात आपल्याला किती माहीत आहे हे दाखवण्याचा आव नसायचा. आपलंच ऐकवण्याचा अट्टाहासही नव्हता. इतरांना दाद देण्याचा उमदेपणाही होताच.

संवादच्या ठरलेल्या विषयावरील चर्चेनंतर मोजक्या लोकांच्या गप्पा सुरू होत. सुबोध त्यात असायचाच. पुढेपुढे तर त्या संवादनंतरच्या संवादासाठीच आम्ही भेटू लागलो की काय असं वाटायला लागलं. रात्रीरेव व्यरंसीत असं होऊ लागलं. माझं घर तसं जवळ होतं. पण इतर अनेक जण लांब लांब राहणारे. उपनगरांतले. पण गप्पा अशा रंगायच्या की वेळेचं भानच उरायचं नाही. मार्गाच्या कडेला उभं राहून तासन् तास आम्ही बोलत असू. कधी बंद दुकानांच्या पायऱ्यांवर थोडं टेकतं होत असलो तर तेवढंच.

ह्या काळात सुबोधच्या भेटीगाठी झाल्या त्या मुख्यत्वे संवादच्या निमित्ताने. पण हळू हळू निष्कारणही आम्ही भेटू लागलो हेही आठवतंय. सुबोध हा सतत काहीतरी योजना डोक्यात घेऊनच वावरायचा. संवादच्या सहकाऱ्यांपुढे त्याने एक योजना तेव्हा मांडली होती. पुस्तकांच्या मानाने नियतकालिकांतलं साहित्य वैशिष्ट्यपूर्ण असलं तरी दुर्लक्षित राहतं. त्यामुळे दर तीन महिन्यांनी नियतकालिकांतल्या निवडक साहित्याचा परिचय करून देणारी एक त्रैमासिक पत्रिका टाइम्स लिटररी मॅगझिनच्या धर्तीवर काढावी अशी त्याची योजना होती. ही योजना त्याने ज्यांच्यापुढे मांडली होती ते आम्ही सगळे आपापल्या निर्वाहाच्या कामांत इतके अडकलेले होतो की त्यानंतर त्या योजनेचं काही झालं नाही हे सांगायची आवश्यकता नाही. पण नंतरही सुबोध अशा योजना आखत राहिला आणि सांगत राहिला. बऱ्याचशा योजना बारगळल्या तरीही.

नंतरच्या काळात मी आयाआयटी मुंबईतल्या संगणकविज्ञान आणि संगणकअभियांत्रिकी विभागांतर्गत भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रात काम करत असताना कालांतराने सुबोधही काही काळ तिथे माझा सहकारी म्हणून काम करत होता. तो तिथे कसा लागला ते आठवत नाही. पण तिथे सुबोध आल्यामुळे त्याचा सहवास अधिक मिळाला. तिथल्या मित्रपरिवारात तो अर्थातच मिसळून गेला. ते दिवस खरोखरंच आयुष्यातले फार छान दिवस होतो. मनांत उत्साह होता. आव्हानात्मक अभ्यासविषय होते आणि कडोविकडीचे वाद घालता येतील आणि मनसोक्त चर्चा करता येईल असे सगळे मित्र होते.

तिथे चालणाऱ्या चर्चांत सुबोधच्या मार्मिक टिप्पण्या रंग भरायच्या. ह्या काळात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात आली ती म्हणजे एखादी गोष्ट समजून घेऊन ती नेमक्या शब्दांत मांडण्याची सुबोधची क्षमता. ही क्षमता इतकी अफाट होती की 'सुबोध उवाच' अशा नावाचा संग्रहच काढावा अशी चर्चा आमच्या मित्रांत होत असे.

गणिताचा अभ्यासक असलेल्या आमच्या एका तर्कप्रेमी मित्राचं वर्णन करताना सुबोध म्हणाला, "आपल्या शिडी लागते ती आपल्याला वर जायचं असतं किंवा खाली यायचं असतं ह्यासाठी. पण त्याला शिडीवरून वरखाली करता येतं ह्याचाच आनंद आहे." नीट पाहिलं तर हे वर्णन टवाळकीचं नव्हतं. तर्कबुद्धीकडे पाहण्याच्या आमच्या आणि त्या दृष्टिकोणातलं अंतरही ह्यात अधोरेखित झालं होतं. आम्ही तर्काचा उपयोग साधन म्हणून करत होतो. त्याला तर्काचे आकृतिबंध शोधण्यात रस होता ही गोष्ट सुबोधने नेमक्या शब्दांत सांगितली होती.

सुबोधला अशा गोष्टी सहज दिसायच्या. आमचं काम भाषा आणि संगणक ह्यांच्यातल्या संवादाच्या व्यवस्था तयार करण्याचं होतं. त्यामुळे व्याकरणिक विश्लेषणावर चर्चा व्हायच्या, वाद व्हायचे. एऱ्हवीच्या बोलण्यातही व्याकरणातल्या संज्ञांचा वापर व्हायचा. क्रियापदांचं विश्लेषण करताना काळ, व्याप्ती आणि अर्थ ह्या अनुषंगाने विश्लेषण होतं. इंग्लिशेत ह्यांना अनुक्रमे टेन्स, आस्पेक्ट आणि मूड अशा संज्ञा आहेत. त्यांची आद्याक्षरी टीएएम ह्या अक्षरांनी टॅम अशी होते. तर सुबोधने एकदा मर्ढेकरांच्या कवितेतल्या ओळी आम्हा सर्वांना इ-टपालाने पाठवल्या : "होते, आहे, होइल यांतुन वीज वाहते होण्याचीच". ह्या पत्राला शीर्षक दिलं होतं : "मर्ढेकरांची टॅम कविता".

सुबोधचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक विषयांत रस तर होताच. पण गतीही होती. त्याचं औपचारिक शिक्षण म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयातली पदविका तो उतरला होता. पण त्याची जिज्ञासा पदवीने अडवलेली नव्हती. त्याचं वाचन चौफेर होतं. श्रीनिवास हरि दीक्षितांच्या 'भारतीय तत्त्वज्ञान' ह्या पुस्तकापासून अमेरिकी कादंबऱ्यांपर्यंत त्याने बरंच काही वाचलं होतं आणि तो सतत वाचतही असायचा. राजीव साने ह्यांची मांडणी त्याला आवडायची. शिक्षणक्षेत्रांतल्या प्रयोगांकडे त्याचं लक्ष असे. डब्ल्यू. टी. सॉयर ह्यांच्या दि व्हिजन इन एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स ह्या पुस्तकातली मांडणी त्याला खूप आवडली होती. आपल्याला आवडलेल्या पुस्तकांविषयी सुबोध इतकं प्रभावी वोलायचा की तो तुमचा विषय असो वा नसो, ते पुस्तक आपण वाचलंच पाहिजे असं वाटायचं.

भाषेची सूक्ष्म जाण असल्याने साहित्यातले बारकावे सुबोधला कळायचे. त्याचं कवितावाचन अर्थवाही असे. त्याच्या कवितावाचनाचं ध्वनिमुद्रण करायला हवं होतं असं आता जाणवायला लागलं. पण आता उशीर झालाय. कवितेतली सौंदर्यस्थळं तो अचूक टिपायचा. शंकर वैद्य ह्यांची 'हा असा पाऊस पडत असताना' वाचताना त्या कवितेतला सगळा मिश्कीलपणा सुबोधच्या वाचनातून ठळक व्हायचा. आयआयटीत असताना एकदा त्याने मंगेश पाडगांकरांच्या प्रेमकविता वगळून इतर कविता वाचण्याचा कार्यक्रम ठरवला होता. त्यावेळी सुबोधने वाचलेली 'सकाळ' ही त्यांच्या विदूषक ह्या संग्रहातली कविता आताही माझ्या कानांत आहे. दया पवारांच्या 'उत्खनन' ह्या कवितेत शेवटच्या "बरे झाले, असे शहर गाडण्याच्याच लायकीचे" ह्या ओळीने साधलेल्या उत्कर्षबिंदूचं रसग्रहण त्याच्याकडूनच ऐकावं असं असे.

एखाद्या विषयात कुतूहल वाटलं की मिळेल त्या मार्गाने त्या विषयाची माहिती मिळवायची त्याची वृत्ती होती. मग तो त्या विषयांतल्या तज्ज्ञांना भेटण्यासाठी प्रयत्न करायचा. 'मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद' ह्या पुस्तकातली मांडणी त्याला आवडल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर ह्यांना भेटण्यासाठी तो पुण्याला त्यांच्या घरी जाऊन पोहोचला. पण त्या वेळी त्यांचं वय झालं होतं. त्यामुळे चर्चा हवी तशी झाली नाही. सुबोधच्या मते ते तेव्हा तर्ककर्कश युक्तिवाद करणारे अभ्यासक राहिल नव्हते तर प्रेमळ आजोबा झाले होते. पण तरी त्यांचे शुद्धलेखनाविषयीचे लेख महाजालावर घालण्यासाठी त्यांची अनुमती घ्यायला सुबोधने खूप साहाय्य केलं होतं.

'संवाद वाचकगटा'च्या विविध उपक्रमांत सुबोधचा सहभागच असायचा असं नव्हे. तो सक्रिय असायचा. बोरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने केलेला एक कार्यक्रम गोव्यात झाला. तो पार पाडण्यात सुबोधने बरंच योगदान दिलं होतं. आमची एकत्र भेटण्यासाठीची जागा नंतर मिळेनाशी झाली तेव्हा सुबोध वेगवेगळ्या ठिकाणी भेटण्याच्या युक्त्या सुचवायचा. उपाहारगृहांत, मैदानांत असे प्रयोग करून झाले. नंतर वांद्र्याला त्याच्या ओळखीने एका शाळेतही एक चर्चा झाली. पण नंतर 'संवादभेटी' उणावतच चालल्या होत्या. तेव्हा सुबोधने फेसबुकावर एक गट करून तिथे चर्चा करण्याचा मार्ग सुचवला. त्याने गटही तयार केला.

सुबोधच्या वृत्तीत एक भटक्या होता. त्याच्याविषयी भाकितं करणं कठीण असे. त्याच्या मनात असेल तर तो कुठेही प्रकट व्हायचा. नाही तर त्याची भेट कधी होईल हे सांगता यायचं नाही. तो असला आपल्यासोबत तर आपला असे. नाही तर नाही.

एकदा सुबोध आणि मी नाणेघाटाला जायचं ठरवून निघालो. सकाळी निघून संध्याकाळी परतायचं असा बेत होता. नाणेघाटात पोहोचल्यावर घाटमाथ्यावरून पलीकडे गेल्यावर देशावर जाता येईल हे लक्षात आलं. मग लगेच बेत बदलला. घाटमाथ्यावरच्या एका शेतकऱ्याच्या घरी विचारणा केल्यावर दुपारी जुन्नरला जाणारी एसटीची बस मिळू शकेल हे कळलं. मग ती बस धरून जुन्नरला पोहोचलो. रात्री तिथेच एका धर्मशाळेत राहिलो. दुसऱ्या दिवशी शिवनेरी आणि लेण्याद्री पाहून मगच मुंबईला पोहोचलो.

आपण केलेल्या गोष्टी मिरवत न बसणं हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. त्याने आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या. त्या अनुभवांचं मोलही दिलं होतं. पण त्यांतून त्याच्या गाठीशी बरंच संचितही जमलं होतं. पण हे संचित तो फारसं मिरवत नसे. कधी तरी सहज बोलता बोलता त्याच्या तोंडून काही कळलं तर कळायचं. त्यामुळेच शिक्षणक्षेत्रातल्या त्याच्या कामामुळे तो किती लोकप्रिय आहे ह्याची कल्पना त्याच्या शोकसभेपर्यंत खऱ्या अर्थाने आलीच नाही. त्याचं कौतुक वाटायचं. पण आदर वाटायला हवा होता हे फार उशिरा जाणवलं.

शिक्षणातला ज्ञानाचा आनंद आणि शिक्षणव्यवस्थेत शिकणाऱ्यांची व्यावहारिक प्रयोजनं ह्या दोन्ही गोष्टींचं सजग भान सुबोधच्या बोलण्यातून दिसायचं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा उतरण्याचे उपाय तो सुचवायचा. परीक्षा उतरणं हे एक तंत्र आहे असं तो अनेकदा म्हणायचा. पण विषय कळण्यासाठी केवळ तंत्र पुरत नाही. गणित आणि विज्ञान नीट शिकता येण्यासाठी विद्यार्थ्याचं किमान एका भाषेवर चांगलं प्रभुत्व हवं अशी त्याची ठाम धारणा होती. विद्यार्थ्यांना सल्ले अनेकजण देत असतील. पण विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यासाठी त्यांनी कोश वापरले पाहिजेत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे पालक आणि कोश प्रकाशित करणारी संस्था ह्यांना एकत्र आणण्याची कल्पना त्यालाच सुचायची.

आता विचार करतो तेव्हा लक्षात येतं की सुबोध मला भेटल्यानंतर तो अनेक ठिकाणी माझ्यासोबत होता. त्यांपैकी अनेक गोष्टींशी त्याचा कोणताही थेट संबंध नव्हता. पण त्याला जिज्ञासा होती आणि तो कर्ता सुधारक होता. मराठी-अभ्यास-केंद्राच्या वतीने आम्ही युनिकोडाची पहिली कार्यशाळा घेतली तेव्हा कार्यशाळेच्या पूर्वतयारीला आदल्या दिवसापासून सुबोध माझ्यासोबत होता. कार्यशाळेच्या दिवशीही होता. अशोक शहाणे ह्यांच्याशी कोलटकरांविषयी गप्पा मारायचा कार्यक्रम ठरला. तेव्हा त्यांना सोबत घेऊन येण्यापासून पुन्हा घरी सोडण्यापर्यंतचं दायित्व सुबोधने आपणहून घेतलं होतं. अर्जुनवाडकरांचे लेख संकेतस्थळावर घालण्यासाठी त्यांच्या अनुमतिपत्रावर त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी सुबोध पुण्याला गेला होता. संवाद वाचकगटाने नंतर राबवलेल्या 'आप्तवाक्य' ह्या उपक्रमात सुबोध सहभागी होताच. पण नंतर त्या कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणं घेऊन त्यांतील महत्त्वाचे अंश संकलित करून यूट्यूबेवर घालण्याचा उद्योगही सुबोधनेच केला. त्यासाठीचा पाठपुरावाही तोच करत राहिला.

ह्याच वृत्तीने तो अनेक गोष्टी करत राहिला. त्यातल्या काही त्याच्याकडून कळल्या होत्या. बचतगट चालवायला मार्गदर्शन करणं, दबावगट निर्माण करणं इ. तीन-चार वर्षांपूर्वी त्याने दोन उपक्रम आखले. एक होता गणेशोत्सवांत मराठी शाळांविषयी जागृती करण्याचा. त्यासाठीचे फलक त्याने बनवून घेतले होते. गणेशोत्सवांच्या व्यवस्थापकांना भेटून ते लावण्याची व्यवस्था करणं आणि तिथे जमलेल्या लोकांशी बोलायची संधी मिळवणं अशी दोन कामं करायची होती. मला तरी ह्या कामांत फारसं यश लाभलं नाही. बाकी काय झालं ते माहीत नाही. दुसरा उपक्रम म्हणजे मराठी शाळांत जाऊन मुलांना चांगल्या कविता वाचून दाखवायच्या. त्यासाठी त्याने एका पत्राचा मजकूरही तयार केला होता. ते पत्र घेऊन मीही काही शाळांत गेलो. एकाच शाळेने प्रारंभी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. पण नंतर काहीच नाही. पण सुबोधकडे अशा योजनांची उणीव नव्हती. त्याला आणखीही काय काय सुचतच राहायचं.

लिहिण्यासारखं पुष्कळच आहे. सगळंच लिहिता येईल असंही नाही. त्यातून सुबोध मला जसा दिसला तसाच इतरांना दिसला असेल असं नाही. माणसाच्या जगण्याला अनेक पैलू असतात. त्याचा मला जो मर्यादित सहवास लाभला त्यांत मला ज्या गोष्टी अनुभवता आल्या त्यांत प्राधान्याने एका जिज्ञासू, रसिक, सक्रिय कार्यकर्त्या मित्राची प्रतिमा मला जाणवली. सगळ्यांना सुबोध असाच दिसला असेल असंही नाही.

सुबोधविषयी सांगताना दोन वैयक्तिक प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आयाआयटीत असताना नंतर नंतर कामाविषयीचं असमाधान वाढू लागलं होतं. नवीन असतानाची नवलाई संपली. कोणत्याही नोकरीत आपल्याला हवं तसं सगळं घडतंच असं नाही हे अद्याप उमगलेलं नव्हतं. अशा वेळी सगळ्या असमाधानाचा आणि त्राग्याचा त्रास सहन करावा लागायचा तो सहकाऱ्यांना. आज विचार करताना आपल्या मूर्खपणाचं हसूही येतं आणि आपण मित्रांशी कसे वागलो ह्याची लाजही वाटते. अशाच एका उद्रेकाच्या क्षणी आता आपण ही नोकरी करू नये असं वाटू लागलं. आपण करतोय ते सगळं निरर्थक आहे. हे काम आपल्या योग्यतेचं नाही असं काहीही मनात येऊ लागलं. हे कुणाशी बोललो नव्हतो. पण वर्तन बदललेलं दिसतच होतं. सहकारी आणि मित्र समजूत काढायला आले तर मी त्यांच्याविषयीच गैर समज करून बसलो आणि त्यांनाच दुरुत्तरं केली. खूप चिडचिड करून घेऊन घरी आलो. खूप वाईट मनस्थिती होती. आपण मित्रांशी चुकीचं वागलो ह्याची जाणीव होती. कामावर जावंसंच वाटत नव्हतं. सगळं जगणंच निरर्थक वाटत होतं. अशा वेळी संध्याकाळी प्रमोद बापट आणि सुबोध माझ्या घरी आले. बापटांना सुबोध घेऊन आला होता हे उघड होतं. त्या दोघांनी मला काय समजावलं हे मला आता लक्षातही नाही. पण ती संध्याकाळ आणि त्या दिवशी त्या दोघांचं येणं मी विसरू शकणार नाही.

दुसरा प्रसंग माझे वडील गेले तेव्हाचा. वडिलांची साखर कमी झाल्याने ते कोमात गेले होते. केईएम रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छ्वासावर त्यांना ठेवलं होतं. मी सकाळी त्यांना तिथे दाखल केलं तेव्हापासून रुग्णालयातच होतो. सकाळी त्यांना दाखल करायला नेताना सुबोधचा दूरध्वनी आला होता. तेव्हा केवळ त्याला असं असं झालंय हे सांगितलं होतं. रात्री रुग्णालयात थांबण्यासाठी सुबोध आला. मी त्या दिवशी तिथेच थांबायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला म्हटलं तू घरी जा. पण तो मला सोबत द्यायला तिथेच थांबला. झोप काही होणार नव्हती. तरी त्याने काही काळ आग्रहाने मला झोपायला लावलं. सकाळी मी घरी गेल्यावर आई रुग्णालयात यायची होती. सुबोधने सकाळी माझ्यासाठी खायला आणलं. मला काही खायची इच्छा नव्हती. पण त्याने खूप आग्रह करून दोन घास खायला लावले. मी खात असतानाच वडिलांची प्राणज्योत मालवल्याचं यंत्रांनी दाखवलं. माझा भाऊ मला सांगायला आला. मी जाऊन पाहिलं आणि पायांतलं त्राणच गेलं. पुढचा काही काळ काहीच कळलं नाही. पण ह्या काळात सुबोधने सगळ्या मित्रांना कळवलं होतं. पुढची व्यवस्था लावून मगच तो तिथून निघाला.

ह्या दोन्ही प्रसंगांत सुबोधने माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्या त्यांविषयी त्याने नंतर कधी एक शब्दही काढला नाही. ते त्याचं सहजकर्म होतं.

उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे । 

राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ।।

हे मित्रलक्षण सुबोधने बऱ्यापैकी निभावलं होतं. मला मात्र त्याची परतफेड करता आली नाही.

प्रियजनवियोग ही आयुष्यातली अपरिहार्य घटना आहे हे जाणवण्याच्या वयाच्या टप्प्यावर आता पोहोचलो आहे. वाचनातून, अनुभवांतून आता असे प्रसंग येणं स्वाभाविक आहे ह्याची जाणीवही झाली आहे.  पण ज्याविषयी असा विचारच केला नव्हता अशा कुणाचं तरी अचानक कालवश होणं स्वीकारायला जड जातंच. ०७ जून हा त्याचा वाढदिवस. ह्यापुढे शुभेच्छा देण्याऐवजी स्मरणच करायचंय हे कालौघात उमजून येईलच. 

कालवश व्यक्तींचा उल्लेख करताना वापरण्यात येणाऱ्या धर्मसंबद्ध संज्ञांऐवजी स्मृतिशेष ही इहवादी संज्ञा आम्हा दोघांनाही आवडली होती. सुबोधविषयीच ती वापरण्याचा योग येईल हे मात्र वाटलं नव्हतं.


============================================

सुबोधच्या लेखनाचे आणि भाषणांचे महाजालावरचे दुवे

 

अनुदिनी

लेखन


चित्रफिती

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट