शींव ते सायन : प्रवासाच्या निमित्ताने
मुंबईतल्या एका विभागाचं नाव शीव असं आहे. रेल्वेस्थानकावर, शासकीय व्यवहारात हेच नाव रूढ असलेलं दिसतं. मात्र लोकांच्या व्यवहारात (नि त्यामुळे काही वेळा प्रशासकीय व्यवहारातही) सायन असं नाव रूढ आहे. हा नावाचा शीव ते सायन हा प्रवास कसा झाला हे पाहणं गंमतीचं आहे. आपण रेल्वेस्थानकावरच्या ह्या नावाच्या पाट्या पाहिल्या तरी आपल्याला ह्या नामान्तराचा सहज बोध होऊ शकेल. पाटीवर देवनागरी लिपीत हे नाव शीव असं तर रोमी लिपीत SION असं लिहिलेलं आढळतं. त्यावरून सायन ह्या नावाचा उगम ह्या रोमी अक्षरवाटिकेत आहे हे उघड आहे. पण शीव ह्या नावाचं लेखन रोमी लिपीत सायन असं का व्हावं?
पूर्वी शीवऐवजी हे नाव शींव असं शिरोबिंदुयुक्त लिहिलं जात असे. माडगावकरांच्या ‘मुंबईचे वर्णन’ ह्या पुस्तकात असंच लेखन आढळतं. त्याचा उच्चारही सानुनासिक होत असावा. ‘SION’ हे रोमी लेखन खरं तर ह्याच लेखनाला वा उच्चाराला अनुसरणारं आहे. कसं ते पाहू. ‘श’साठी ‘S’ हे अक्षर आलं. ‘S’ ह्या अक्षराचा उच्चार अनेक ठिकाणी श असाच अभिप्रेत असतो. उदा. Sewari म्हणजे शिवडी (S = श). इकारासाठी I वापरलेला आहे. स्वराचा अनुनासिक उच्चार नि पुढे व येत असेल (शींव ह्यात ई हा सानुनासिक आहे नि त्यापुढे व येतो. श्-ई-ं-व्.) तर ‘व’साठी रोमी लेखनात O वापरून आधी येणाऱ्या अनुनासिकाच्या उच्चाराचं चिन्ह म्हणून येणारं N हे अक्षर O ह्या अक्षरानंतर लिहिण्याची प्रथा आहे. तुळा : गांव = GAON.
म्हणजे देशी भाषांतल्या उच्चारांचं वा लेखनाचं रोमीकरण करण्याच्या जुन्या संकेताप्रमाणे SION ह्याचं वाचन शींव असंच व्हायला हवं. पण हा संकेत ठाऊक नसलेल्या कुणी तरी SION ह्याचं वाचन LION ह्या वाचनाला अनुसरून सायन असं केलं असावं नि सध्या तेच रूढ होतं आहे.
शींव ते सायन हा प्रवास इथं संपत नाही. तो अनेक वेगवेगळे प्रश्न मनात उभे करतो आणि त्यांचा धांडोळा घेणं भाग पडतं. शीव हे नाव देवनागरीत वाचता येणारे असंख्य लोक त्या नावाचा उच्चार सायन असा रोमी लेखनाला अनुसरून का करतात? कारण उघड आहे. देशाला स्वातंत्र्य लाभून पन्नास वर्ष उलटली असली तरी इंग्रजी भाषेचा आणि रोमी लिपीचा दरारा अद्यापही लोकांच्या मनातून पुसला गेलेला नाही. देशी भाषांची आणि लिप्यांची उपेक्षाही संपलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. देशी भाषांतला ज्ञानव्यवहार दिवसेंदिवस उणावतो आहे. जो आहे तो केवळ इंग्रजीवर आधारलेला नि तेवढ्याच अर्थाने परभृत स्वरूपाचा आहे. त्यामुळे जे इंग्रजीतलं नि रोमीतलं तेच फारशी चिकित्सा न होता प्रमाण मानलं जातं. अनेकांना ह्या प्रकारात काही चूक आहे हेच उमगत नाही. स्वभाषेविषयी त्यांच्या भावना बोथटलेल्या आहेत. ते परभाषेलाच आपली भाषा मानत आहेत. तीच त्यांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा होऊ पाहात आहे. ह्यातून आपला मानसिक परधार्जिणेपणा आणि बौद्धिक आळसही दिसून येतो. ह्या आळसाची काही आणखी उदाहरणं लेखनाच्या संदर्भातच पाहता येतात.
कल्याण ह्या रेल्वेस्थानकाचं नाव देवनागरी ह्याच लिपीचे भेद वापरणाऱ्या हिंदी नि मराठीत वेगवेगळं होतं. एऱ्हवी कुणीही हिंदी भाषक ‘मेरा कल्यान करो’ असं लिहिणार नाही. पण स्थानकाचं नाव मात्र ‘कल्याण’ असं न लिहिता ‘कल्यान’ असंच लिहितात. स्थानिक उच्चाराचं योग्य देवनागरी लेखन उपलब्ध असताही कल्यानच का? तर ते रोमीवरून लिप्यन्तरायचं म्हणून.
दुसरं उदाहरण आपलं म्हणजे मराठी माणसांचं घेऊ. ओडिसा ह्या राज्याचं नाव आपण तरी ओरिसा असं का लिहितो. त्याच्या रोमी लेखनात R हे अक्षर आहे म्हणूनच ना? नृत्याचं नाव मात्र आपण ओरिसी असं न लिहिता ओडिसी असंच लिहितो. रोमी लेखनाचं अनुसरण. दुसरं काय? आपल्या शेजाऱ्याची ओळख आपल्याला परकीयांच्या मध्यस्थीवाचून करून घेता येत नाही. आणि ही परकीयांनी करून दिलेली ओळख बरोबर आहे की नाही ह्याची त्या शेजाऱ्याला विचारून निश्चिती करावी असंही आपल्याला वाटत नाही. हा ‘रोमी वाक्यं प्रमाणम्’चा प्रकार आपला बौद्धिक आळस नि अंध भक्तीच दाखवत नाही काय? आपापल्या लिप्यांत आपल्या देशातली स्थलनामं अचूक लिहावीत असं आपल्याला वाटतच नाही.
पानी, लोनी हे उच्चार ज्या शिक्षितांना खटकतात त्यांना वांद्र्याला बॅण्ड्रा म्हटलेलं खटकत नाही. बंगळूरु, मंगळूरु म्हणायला त्यांची जीभ अडखळते. बॅङ्गलोर त्यांना प्रतिष्ठेचं वाटतं. वस्तुतः ह्या नावांमधल्या ऊर ह्या भागाचं लेखन रोमीत ORE असं होत असे.
उदा.
Banglore बंगरूळ
Vellore वेलूर
Mysore मैसूर
Tagore ठाकूर
आपण ते ऊर असंच वाचलं पाहिजे (दक्षिणी नावांसंदर्भात उरु असं सुधारूनही घेतलं पाहिजे) हा विवेक आपल्याकडे उरलेला नाही. कारण अशा विवेकासाठी स्वतंत्र बुद्धी लागेल. आपल्याकडे तिची बहुतांश ठिकाणी वानवा आहे. साहेब बोबडं बोलतो म्हणून आपणही बोबडंच बोललं पाहिजे ही भावना आपल्या मनातून गेलेली नाही.
मराठीच्या देवनागरी लेखनसंकेतानुसार (हिंदीचा देवनागरी लेखनसंकेत मराठीहून अनेक ठिकाणी वेगळा आहे ह्याची आठवण ठेवली पाहिजे.) स्थल, व्यक्ती इत्यादींची नावं कशी लिहावीत हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. डॉ. अशोक केळकर ह्यांच्या वैखरी ह्या ग्रंथात भारतीय स्थलनामांचं लेखन कसं करावं ह्याविषयी एक लेख आहे. पण हा अपवाद वगळता (इतकी वर्षं जगाला शहाणं करणाऱ्या इंग्लिशेत शिकूनही) आपल्याला असं काही करावंसं वाटलेलं नाही. निदान भारतापुरता तरी हा प्रयत्न करून पाहायला हवा. त्यात अडचणी नसतील असं नाही. पण स्वतंत्र बुद्धीने काही तरी केल्याचा आनंद त्यात नक्कीच असेल.
आजही मुंबईला मराठीमध्येसुद्धा बॉम्बे म्हणणारे महाभाग पाहिले की आश्चर्य वाटते. सर्व माध्यमांना कसोशीने तमिळमध्ये उत्तरे देणारा करुणानिधी हे मुख्यमंत्री एकीकडे आणि मुख्यमंत्री झाल्यावर पहिलेच निवेदन हिंदीमध्ये करणारे अशोक चव्हाण यांच्या स्वाभिमानाच्या कसात एवढा फरक का हे समजत नाही.
उत्तर द्याहटवा- सलील कुळकर्णी
वाह राव! मस्तच! लई बेस उतरला आहे लेख.
उत्तर द्याहटवाया "बेस"चा संबंध बेस्टशी नाही. बांङ्लात (बेंगॉलीत नाही!)
आज़ही बेश चा प्रयोग खूप या अर्थी होतो. बेश भालो इ. प्रयोगात
प्रचूर आहे. असो. लेख लईच बेस उतरला आहे.
चिन्मय
मस्तच, झक्कास लेख आहे.
उत्तर द्याहटवा