व्याकरणपरंपरेच्या सजग अभ्यासाची आवश्यकता
दि. २४ ऑक्टोबरच्या दै. लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत श्री. शुभानन गांगल ह्यांचा 'शोध मराठीचा : मूलभूत व्यंजन आणि मूलभूत स्वर; व्याख्यांची गरज' ह्या शीर्षकाचा पानभर मजकुराचा मुलाखतवजा लेख छापण्यात आला आहे. ह्या मुलाखतवजा लेखात त्यांनी मराठी व्याकरण, ध्वनिविज्ञान, मोडी लिपी, देवनागरी, शुद्ध लेखन ह्यांविषयी काही मते मांडली आहेत. त्यांपैकी काहींचे परीक्षण ह्या लेखात करायचे आहे.
मूलभूत स्वर आणि मूलभूत व्यंजन ह्यांची लक्षणे (व्याख्या)
श्री. गांगल ह्यांनी मूलभूत स्वर आणि मूलभूत व्यंजन ह्यांची लक्षणे (व्याख्या) देण्यासाठी 'जातीगुणवैशिष्ट्य' ह्या संकल्पनेचा आधार घेतला आहे. "जातीगुणवैशिष्ट्य म्हणजे ध्वनीतील 'फ्रिक्वेन्सी, लाऊडनेस, कालमापन' या गुणधर्मांपेक्षा वेगळा असा जाणता येणारा गुणधर्म" असे ह्या गुणधर्माचे लक्षण गांगल ह्यांनी केले आहे. ह्या विधानाने उपरोक्त गुणधर्म हा फ्रिक्वेन्सी इत्यादींहून वेगळा आहे हे कळते. पण तो नेमका कसा आहे, त्याचे मापन कसे करायचे हे कळत नाही. त्यामुळे शास्त्रीय दृष्टीने हे लक्षण निरुपयोगी आहे. अमुक उच्चारात एकच एक जातीगुणवैशिष्ट्य आहे की एकाहून अधिक जातीगुणवैशिष्ट्ये आहेत हे कसे ओळखायचे? भाषाविज्ञानात ध्वनीचे वर्णन उच्चाराचे स्थान (कंठ, तालु, मूर्धा इ.) आणि प्रयत्न (अल्पप्राण, महाप्राण, नाद, घोष इ.) ह्यांच्या आधारे करतात. त्यासाठी उच्चारणात होणाऱ्या मुखातील हालचालींचा आधार घेतात. जातीगुणवैशिष्ट्य ह्या वेगळ्या संकल्पनेचा वापर त्याच कामासाठी करायचा असेल तर ती संकल्पना पुरेशा स्पष्ट रीतीने मांडणे आवश्यक ठरते. तशी गांगलांनी मांडलेली नाही.
श्री. गांगल ह्यांनी आपल्या मूलभूत व्यंजनांच्या तक्त्यात 'ख्, घ्' इ. महाप्राण व्यंजने ही मूलभूत नसून ओघवती आहेत असे दाखवले आहे. हे पडताळून पाहायचे असेल तर क् ह्या व्यंजनात एकच जातीगुणवैशिष्ट्य आहे आणि ख् ह्या व्यंजनात एकाहून अधिक जातीगुणवैशिष्ट्ये आहेत हे कसे ठरते हेही सांगायला हवे. एकच एक असे म्हटल्याने जातीगुणवैशिष्ट्ये अनेक असतात हे उघड आहे. मग ती एकूण (किंवा ज्ञात असलेली) किती आहेत आणि क् आणि ग् हे त्यांच्यामुळे मूलभूत ठरत असतील तर त्यांपैकी क् ह्या व्यंजनातील जातीगुणवैशिष्ट्याचे स्वरूप हे ग् ह्या व्यंजनातील जातीगुणवैशिष्ट्याहून कसे वेगळे आहे हे दाखवण्याची आवश्यकता आहे. परंतु श्री. गांगल असे स्पष्ट न करता केवळ विधाने करतात. त्यामुळे ही त्यांनी दिलेली लक्षणे प्रत्यक्षात उपयोगी ठरत नाहीत.
प्रथम सांगण्याचा दावा
मराठी व्याकरणात आपण बऱ्याच गोष्टी प्रथम सांगतो आहोत असा दावा गांगलांनी केला आहे. पण ते बरोबर नाही. मराठी लेखनातील इकारउकारांच्या ऱ्हस्व आणि दीर्घ अशा लेखनाविषयीची त्यांनी मांडलेली मते नवी नाहीत. मराठीतील ऱ्हस्वदीर्घ हे अर्थभेद करणारे नाहीत आणि कुठे ऱ्हस्व स्वर यावा आणि कुठे दीर्घ स्वर यावा हे सोबतच्या वर्णांच्या सापेक्षतेने त्या स्वराचे स्थान कोणते ह्यावरून ठरते. त्यामुळे इकारउकारांच्या ऱ्हस्वदीर्घभेदाकरता वेगळ्या चिन्हांची आवश्यकता नाही असे मत सदाशिव आठवले ह्यांनी (‘रसिक’ दिवाळी अंक, १९८३; ललित मासिक, एप्रिल १९८४ पृ. ६२;) पूर्वी मांडलेले आहे. ललित मासिकातील गमभन ह्या सदरात त्याविषयीचे आपले वेगळे मत पंतोजी ह्या टोपणनावाने कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी नोंदवलेले आहे (ललित मासिक, फेब्रुवारी १९८४ पृ. ५१-५२; जून १९८४ पृ. ४२-४३). मराठी लेखननियमांवरील संस्कृताचा प्रभाव ह्या विषयावर डॉ. वि. भि. कोलते ह्यांनीही आपली परखड मते व्यक्त केली आहेत. इकारउकारासाठी एकच चिन्ह असावे अशी सूचना त्यांनीही १९६७ साली भोपाळ येथे भरलेल्या अ. भा. मराठी-साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात केली आहे. ह्या लोकांनी मांडलेली मते सर्वांना मान्य होतील असे नाही. पण त्यांनी ह्या दृष्टीने आधी विचार मांडलेले आहेत हे महत्त्वाचे.
मराठीचे व्याकरण हे मराठीला धरून लिहिले पाहिजे संस्कृत वा अन्य भाषांच्या साच्याला अनुसरून नव्हे हे मतही मराठी व्याकरणकारांनी आणि मराठी व्याकरणाच्या परीक्षणकारांनी अनेकदा मांडलेले आहे. ह्यात कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा. भि. गुंजीकर, कृ. श्री. अर्जुनवाडकर, डॉ. अशोक केळकर अशा विद्वानांचा समावेश होतो. गांगल ह्यांपैकी कुणाचाही उल्लेख न करता मराठी व्याकरणाच्या परंपरेत आपणच काही तरी नवे मांडतो आहो हा जो आव आणतात तो आक्षेपार्ह आहे.
श्री. गांगल ह्यांनी लेखात दिलेला मूलभूत स्वरांचा तक्ता डॉ. ना. गो. कालेलकरांनी 'ध्वनिविचार' ह्या पुस्तकात (मौज प्रकाशन, आवृत्ती दुसरी, १९९०) पृ. २६वर पूर्वीच दिलेला आहे. भेद इतकाच आहे की ज्यासाठी श्री. गांगल हे 'मूलभूत' अशी संज्ञा वापरतात त्यासाठी डॉ. कालेलकरांनी 'शुद्ध' अशी संज्ञा वापरली आहे. त्यात व्यंजनांविषयीही सविस्तर विवेचन आलेले आहे. स्वरांचे आणि व्यंजनांचे असेच सविस्तर विवेचन डॉ. कालेलकर ह्यांनी मराठी विश्वकोशाच्या बाराव्या खंडातील 'मराठी भाषा' ह्या नोंदीतही (पृ. क्र. ११९७ ते १२०६) केले आहे. स्वरांचा उपरोक्त तक्ता (पृ. क्र. ११९८) आणि गांगलांपेक्षा व्यंजनांचे अधिक सविस्तर विवेचन करणारा तक्ता (पृ. क्र. ११९९) ह्या नोंदीत पाहायला मिळतो. तेव्हा आपले विवेचन अपूर्व आहे, हा काही तरी नवा शोध आहे हा गांगल ह्यांचा दावा सपशेल खोटा आहे.
मोडी लिपी आणि देवनागरी
मोडी लिपी आणि देवनागरी ह्यांविषयीची गांगल ह्यांची विधाने ही अज्ञानमूलक आहेत. मोडी लिपीचा वापर मराठीने हजारो वर्षे केला असे ते म्हणतात. पण ह्याला काहीही आधार नाही. मराठीच्या उगमापासून मराठी ही केवळ मोडी लिपीत लिहिली जात असे अशी परिस्थिती दिसत नाही. जुने मराठी शिलालेख हे देवनागरीतच लिहिलेले आहेत. मोडीतला शिलालेख शिवकालातच दिसतो. गद्यासाठी मोडी आणि पद्यासाठी देवनागरीचा वापर होत असे हेही योग्य नाही. महानुभाव पंथाचे विपुल गद्यवाङ्मय उपलब्ध आहे आणि ते मोडी लिपीत लिहिलेले नाही. देवनागरीला बाळबोध असे म्हणत. ह्याचे कारण मोडीच्या तुलनेत ती शिकायला आत्मसात करायला सोपी वाटे असे दिसते. श्री. गांगल मात्र हजारो वर्षे मोडी वापरात होती असे सांगतात. तसे खरेच असेल तर आनंदच आहे. आताही गांगलांकडे ह्याचा काही सबळ पुरावा असेल तर तो त्यांनी जाहीर करावा. त्याचा वापर करून मराठीलाही तमिळेप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करणे सोपे होईल.
संस्कृत आणि मराठी
संस्कृतात धातू असतात आणि मराठीत ते नसतात हे विधान हास्यास्पद आहे. मुळात धातू, प्रातिपदिक, प्रत्यय इ. संकल्पना ह्या भाषाविशिष्ट नसून विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या अर्कभूत (अमूर्त) संकल्पना आहेत. भाषिक सामग्रीचे समान रूप आणि समान अर्थ ह्या दृष्टीने विश्लेषण केले तर जे अवयव मिळतात त्यांपैकी एका प्रकाराला धातू हे नाव दिलेले आहे. उदा. करणे, करतो, करणारा आणि बसणे, बसतो, बसणारा ह्या शब्दांत कर-णे, कर-तो, कर-णारा, बस-णे, बस-तो बस-णारा अशी फोड करता येते. ह्यांपैकी कर आणि बस ह्यांना धातू असे म्हणतात. आख्याताचे म्हणजे काळ आणि अर्थ ह्यांचे प्रत्यय अशा शब्दांना लागतात. दादोबांपासून दामल्यांपर्यंतच्या अनेक मराठी व्याकरणकारांनी आपल्या व्याकरणांत धातू ही संकल्पना वापरलेली आहे. तशी ती वापरणे कसे चुकीचे आहे हे श्री. गांगल ह्यांनी साधार सिद्ध केलेले नाही. अशी फोड मराठीप्रमाणेच इतर भाषांतील शब्दांचीही करता येते आणि ह्या अर्थी त्या भाषांतही धातू आहेत असे मानता येते. ध्वनींचे अणुरेणू शोधून काढण्याची भाषा करणाऱ्या गांगलांना ही फोड कळायला हरकत नव्हती. जर धातू ही संकल्पनाच नाकारायची असेल तर विश्लेषणाची वेगळी पद्धती विकसित करून ती नाकारता येईल. पण मग त्या मांडणीनुसार संस्कृतातही धातू नसतील आणि मराठीतही नसतील. त्यामुळे संस्कृतात धातू असतात आणि मराठीत नसतात हे श्री. गांगल ह्यांचे विधान निराधार आहे.
भाषाग्रहण आणि भाषाशिक्षण
संस्कृतात धातूंपासून पद घडवण्यात येते आणि मराठी मात्र शब्द स्वीकारते. संस्कृतात पद घडवण्यासाठी घोकंपट्टी लागते हे त्यांचे विधान म्हणजे तर व्याकरण आणि भाषा ह्यांविषयीच्या अज्ञानाचा कळस आहे. भाषेतील पदाची घडण कशी असते ह्याचा अभ्यास आणि भाषेत पदे कशी बनतात हे शिकणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाषाशिक्षण आणि भाषाग्रहण ह्यातील भेद त्यांना उमगलेला नाही. आता आपल्याकडे संस्कृत शिकणारे ती भाषा मातृभाषा म्हणून ग्रहण करत नाहीत तर दुसरी भाषा म्हणून शिकतात म्हणून घोकंपट्टी लागते. उलट मराठी ही भाषा लहान मुले आपल्या अवतीभोवतीच्या संस्कारातून ग्रहण करतात (शिकत नाहीत). जर एखादी व्यक्ती संस्कृत ही भाषा मराठीप्रमाणेच स्वाभाविकपणे ग्रहण करत असेल तर तिलाही घोकावे लागणार नाही. पण व्याकरणिक विश्लेषणाच्या विशिष्ट दृष्टीने भाषेतील पद घडण्याची प्रक्रिया दोन्हीकडे एकाच तऱ्हेची असते (भाषेचे वर्णन हे व्याकरणाचे मुख्य उद्दिष्ट असते. भाषा शिकणे-शिकवणे हा आनुषंगिक उपयोग आहे.). उदा. पाणिनीय व्याकरणानुसार संस्कृतातील करोति हे क्रियापद कृ ह्या धातूला उ हे विकरण आणि तिप् (ति) हा तिङ् ह्या गटातला प्रत्यय लागून बनले आहे. मोरो केशव दामले ह्यांच्या व्याकरणानुसार मराठीतही करतो हे क्रियापद कर् ह्या धातूला तो हा प्रथमताख्याताचा (पाहा : शास्त्रीय मराठी व्याकरण - मोरो केशव दामले) प्रत्यय लागून बनले आहे. व्याकरणाच्या विशिष्ट दृष्टीने मराठीतही अवयवांपासूनच पद घडते आहे.
व्याकरण की शुद्ध लेखन
सबंध लेखात गांगल व्याकरणाविषयी सुरवात करतात आणि शुद्ध लेखन ह्या विषयावर घसरतात. मुळात व्याकरण आणि शुद्ध लेखन ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्ही स्वतंत्रपणे भाषेशी संबंधित आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
व्याकरण हे मुख्यत्वे बोलण्याशी संबंधित असते. त्यात येणारी वर्गीकरणे बोलण्यावरून केलेली असायला हवीत लेखनावरून केलेली नव्हेत. मराठीच्या बऱ्याच व्याकरणांत हा दोष कसा आढळतो हे अर्जुनवाडकर, अशोक केळकर ह्यांसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. एऱ्हवी मराठी व्याकरणकारांना दोष देणारे श्री. गांगल हे शिरीन, विमल अशी नावे लिहून ती मराठीत अकारान्तात गणतात असे दिसते. कारण ती नामे ते संस्कृतात अ-कारान्त असल्याने स्त्रीलिंगी ठरत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. पण ही नामे मराठीत व्यंजनान्त उच्चारण्यात येतात. त्यामुळे ती व्यंजनान्त आहेत असे म्हटले पाहिजे. लेखनात अशा व्यंजनान्त नामांचे लेखन पायमोडीचे (्) चिन्ह लावून करत नाहीत (गांगलांना प्रिय असलेल्या मोडी लिपीत तर ह्या चिन्हाचा वापर जुन्या काळी होतच नसे) पण ह्यामुळे ती नामे व्याकरणदृष्ट्या अकारान्त ठरणार नाहीत. अशा अनेक चुका गांगल ह्यांच्या लेखात आढळतात.
शाळा आणि शास्त्र
मराठी व्याकरण म्हणजे केवळ श्री. मो. रा. वाळंबे ह्यांचे पुस्तक अशी गांगल ह्यांची समजूत असावी असे त्यांचे लेखन वाचून वाटते. कारण मराठी व्याकरणाच्या परंपरेत विविध विषयांवर जी कडोविकडीची चर्चा झाली आहे, वाद झडले आहेत त्याचा मागमूसही गांगल ह्यांच्या लेखनात दिसत नाही. त्यांचा मराठीच्या व्याकरणपरंपरेशी पुरेसा परिचय नसावा असे वाटते. ही परंपरा त्यांनी नीट समजून घेतली तर संस्कृत आणि इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे प्रयत्न ह्या परंपरेत झाले आहेत, होत आहेत हे त्यांच्या लक्षात येईल. एखादा विषय शालेय पाठ्यपुस्तकांत नीट मांडलेला नाही म्हणून त्या विषयावर शिस्तीने काम झालेलेच नाही असे मानण्याचे कारण नाही.
गांगलांचा लेख वाचल्यावर लक्षात येते की गांगलांची मराठीच्या लेखनाबाबत काही मते आहेत आणि ती रूढ व्हावीत असा त्यांचा प्रयत्न आहे. ह्यात चुकीचे काहीच नाही. पण ही मते ते साधार आणि तर्कशुद्ध रीतीने थेट मांडतील तर अधिक बरे होईल. त्यासाठी व्याकरण, ध्वनिविज्ञान, लिपी, भाषेचा इतिहास ह्यांना उगाचच वेठीला धरण्याचे कारण नाही. ह्या गोष्टींचा त्यांचा पुरेसा अभ्यास आहे असे दिसत नाही. तो नसेल तेव्हा अभ्यासाच्या मर्यादेत जपून विधाने करण्याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. पण ते प्रमाणे न देता विधाने करत जातात. त्यात अनेक विषयांची असंबद्ध भेळ करतात. ह्यामुळे त्यांचे लेखन दुर्बोध आणि तर्कदुष्ट होते. त्यांनी आपली मते तपासून ती अभ्यासपूर्वक, सप्रमाण मांडावीत असे सुचवावेसे वाटते.

chhaan lekh!!
उत्तर द्याहटवा