काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे !!!
आज आषाढीचा दिवस. हा खरं तर महाराष्ट्रीय संतांच्या आणि विठूरायाच्या स्मरणाने साजरा व्हायला हवा आहे. पण आज त्याला एका लाजिरवाण्या परिस्थितीचा डाग लागलेला आहे असं मला वाटतं. पंढरपुरात मेहतर समाजाला आपल्याला मानवी मैला हाताने उचलावा लागू नये ह्यासाठी आंदोलन करण्याची पाळी आलेली आहे (पाहा). २१व्या शतकाच्या, यंत्रयुगाच्या आणि जगाला समतेची शिकवण देणाऱ्या संतांच्या भागवतधर्माच्या फुशारक्या मारणाऱ्या महाराष्ट्राने आज लाजेने मान खाली घातली पाहिजे.
मैल्याचं व्यवस्थापन करणं भाग आहे आणि त्यासाठी कुणाला तरी ते करावं लागणार. पण आपल्याकडच्या जातिव्यवस्थेमुळे ही कामं विशिष्ट समाजालाच करावी लागतात. स्वातंत्र्यानंतरही ही स्थिती फारशी पालटलेली नाही. दुसरीकडे ह्या तऱ्हेची कामं करणाऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही वाईट आहे. हे काम काही तरी हलक्या दर्जाचं आहे असं मानण्यात येतं. आपला मैला दुसऱ्यांनी स्वच्छ केलेला आपल्याला चालतो. पण दुसऱ्याचा मैला स्वच्छ करायची वेळ आपल्यावर आली तर ते अनेकांना स्वाभाविकरीत्या किळसवाणं वाटतं. रुग्णालयांत अतिसाराच्या रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांचं निरीक्षण केलं तरी ही गोष्ट सहज लक्षात येईल.
ह्या तऱ्हेचं स्वच्छतेचं काम करणाऱ्या व्यक्तींना ते काम करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध व्हायला हवी. ज्यात त्या व्यक्तीच आजारांना, अस्वच्छतेला बळी पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यायला हवी. पण हे काम करणाऱ्या व्यक्तीही माणसंच आहेत ह्याची जाणीव आपल्या समाजात ठळकपणे दिसत नाही.
खरं तर १९९३ च्या अधिनियमाद्वारे मानवी मैला हाताने उचलण्यास मनाई आहे. पण असं असूनही २०१२ ह्या वर्षात लोकांना आंदोलन करावं लागावं ही घटना लाञ्छनास्पद आहे. श्रीम. सोनिया गांधी ह्या ज्याच्या अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रीय सल्लागार-समितीनेही ऑक्टोबर २०११ मध्ये ही प्रथा नाहीशी करण्यासंदर्भात केंद्र-शासनाला सूचना दिलेल्या आहेत (पाहा). पण तरीही आपल्याला आज ह्या बातम्या वाचायला मिळाव्या हे दुर्दैवीच नव्हे तर संतापजनकही आहे.
पंढरपुरात प्रत्येक वर्षी आषाढीला यात्रा भरते आणि लक्षावधी वारकरी तिथे जमतात. अशा वेळी ह्याप्रकारचं व्यवस्थापन करावं लागणार हे उघड आहे. पण ह्या प्रश्नाचा नीट विचार करून एक नेहमीसाठीची व्यवस्था उभी राहायला हवी होती. पण हे काम मेहतर समाजातील लोकांचंच आहे असं जणू आपला समाज गृहीत धरून चालला आहे. जर असं असेल तर वेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्नच होत नाही ह्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
ह्या संदर्भात मला अत्यंत धक्कादायक वाटलेली गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नासंदर्भात वारकऱ्यांनी आणि त्यांच्या धुरिणांनी काहीच केल्याचं दिसत नाही. त्यांनी विचार करून मार्ग सुचवायला हवा होता. त्यासाठी स्वयंसेवकांच्या फळ्या उभ्या राहायला हव्या होत्या. त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करायला हवा होता आणि हे सगळं वारीच्या आधीच सुरू व्हायला हवं होतं. पण ह्या संदर्भात वारकऱ्यांकडून काही पावलं उचललेली असल्यास त्याची माहिती मला मिळालेली नाही. मला अशी माहिती मिळाली तर वारकऱ्यांविषयीचं माझं हे मत मी आनंदाने मागे घेईन.
पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं एक श्रद्धास्थान आहे. पण ते श्रद्धास्थान वर्षानुवर्षं ह्या परिस्थितीचा विचार न करता राहतं ही गोष्ट मला तरी योग्य वाटत नाही. आधुनिक काळातील खरा संत असं ज्यांना म्हणता येईल त्या गाडगेमहाराजांची थोरवी अशा वेळी अधिकच जाणवते. ते स्वतः कधी पंढरपुरच्या मंदिरात गेले असतील किंवा नसतील पण त्यांनी यात्रेला येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होईल ह्याची काळजी घेतली. मुंबईत जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक येतात. त्यांत रुग्णासोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवाऱ्याचा विचार केवळ गाडगेबाबांनाच केला. तिथे धर्मशाळा बांधली. ते सश्रद्ध होते. पण सजगही होते. हा सजगपणा वारकऱ्यांनी आणि पंढरपुरच्या विठ्ठलावर प्रेम करणाऱ्या इतरांनीही दाखवायला हवा.
गाडगेबाबा आपल्या कीर्तनात एक गोष्ट सांगायचे. एक पुरभय्या जेवणासाठी चौक सारवत होता. तो सारवताना त्याने डावा हात बाहेर धरला होता. त्याला कुणीसं विचारलं. "भय्याजी आपने वह बायाँ हाथ बाहर क्यों धरा है?" त्यावर तो पुरभय्या म्हणला "वह हात गंदा काम करता है. गंदगी धोता है." त्यावर त्या माणसानं विचारलं "गंदगी धोने वाला हाथ तो आपने बाहर धरा है लेकिन गंदगी का पिटारा जो पेट है, वह तो चौके में ही है. उसका क्या?" ह्या गोष्टीचा विचार आपल्या सगळ्या समाजाने करण्याची आवश्यकता आहे.
स्वच्छता, शुचिता ह्यांचे आपले निकष केवळ व्यक्तिगत राहतात. ते सामाजिकही झाले पाहिजेत आणि अधिक मानवसन्मुख झाले पाहिजेत. निदान पुढल्या वर्षीच्या वारीच्या वेळी आपल्याला असं काही ऐकायला मिळू नये ह्यासाठी प्रशासन, वारकरी आणि वारीविषयी आस्था असलेल्या अनेकांनी ह्या प्रश्नाचा पाठपुरावा येत्या वर्षभरात करण्याची आवश्यकता आहे. तुकोबांचे शब्द उसने घेऊन प्रशासन आणि वारकरी ह्यांना इतकंच सांगावंसं वाटतं की
काय तुम्ही येथे नसालसे जाले । आम्ही न देखिले पाहिजे हे
होय. तू म्हणतो आहेस ते वेदनादायक वास्तव आहे. मराठा जातीच्या अस्मितेच्या नावाखाली दुर्लक्षित आणि नगण्य असणार्या ब्राह्मण समाजाच्या विद्वेषावर राजकारण करणार्या दोन्ही कॉंग्रेस राज्यकर्तेच याला जबाबदार आहेत. आपण आपल्याला जमेल तेवढे वैयक्तिक काम करणे एवढेच आपल्याला जमण्यासारखे आहे.
उत्तर द्याहटवाविद्याधर
ह्याला केवळ राज्यकर्तेच जबाबदार नाहीत. केवळ कॉंग्रेसही नाही. एकंदर समाजच जबाबदार आहे. मराठे, ब्राह्मण धरून संबंधित असलेला सगळा महाराष्ट्रीय समाज. सगळेच राजकीय पक्ष. एऱ्हवी ऊठसूट हिंदुत्वाचा शंख करणारे राजकीय पक्षसुद्धा ह्या परिस्थितीला जबाबदार आहेत असं मला वाटतं.
हटवापर्यायी व्यवस्थेचा आराखडा तयार करता आल्याशिवाय या उमाळ्याना अर्थ नाही.
उत्तर द्याहटवाखरेतर धर्मातच किंवा अध्यात्मातच हे शिक्षण गुंफून द्यायला हवे. कारण ज्या धर्मात = वारकरी संप्रदायात मी हरामाचा पैसा खाणार किंवा घेणार नाही, कोणालाही विनाकारण त्रास देणार नाही असे शिकवले जाते त्यातच मी असा घाण त्रास कोणालाही देणार नाही असे प्रबोधन करणेही शक्य आहे. नवीन गांधी किंवा गाडगेबाबा यावे लागतील.
उत्तर द्याहटवा...... पण बाह्य परिस्थिती बदलणे धर्माच्या किंवा कोणाच्याच हातात नाही असेच दिसते.
एखादी आदर्श दिंडी काढून हा बदल करता येईल का? ते पाहायला हवे.
अजून एक आषाढी काळात फक्त पायी येणाऱ्या दिंड्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्यायला हवा.