हा ब्लॉग शोधा

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या

Free JavaScripts provided
by The JavaScript Source

आज सकाळी कार्यालयात पोहोचलो आणि आशिषचा निरोप मिळाला. नेरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळं पाहिली. सगळा भयानक प्रकार लक्षात आला.

गेली कित्येक वर्षे दाभोलकरांचं काम पाहतो आहे. त्यांचे विचार आणि काम करण्याची शैली मला १००% पटलेली होती असं नाही. त्यांच्या काही गोष्टी मला आवडत नसत आणि त्याविषयी मी मित्रांशी अनेकदा बोललोही आहे. पण त्यांचं काम समाजाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही. अनेक वर्षे सातत्याने आपल्याला पटलेल्या विचारसरणीचा वैचारिक मार्गाने प्रचार-प्रसार करण्याचं काम दाभोलकर करत होते. अंधश्रद्धा, बुवाबाजी ह्यांच्या विरोधात त्यांनी सातत्याने वैचारिक झुंज दिली. मोठमोठ्या बुवांची बिंगं फोडली. वाणी आणि लेखणी ह्यांचा प्रभावी वापर केला. सनदशीर आणि अहिंसक मार्गाने चळवळी चालवल्या. अंधश्रद्धानिर्मूलनसमितीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली वैचारिक चळवळ ही महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचीच आहे.

समितीचं काम करताना त्यांचा युक्तिवाद मला अनेकदा वकिली ढंगाचा वाटायचा. ती त्यांची शैली होती. आपल्याला हवा असलेला बदल समाजात घडावा ह्यासाठी त्यांनी स्वीकारलेला प्रचाराचा मार्ग होता.

दाभोलकरांचे सगळे भाऊ आपापल्या पद्धतीने समाज कार्य करीतच आहेत. महाराष्ट्रातील समाजाच्या भल्याचा वसा घेतलेल्या कुटुंबांपैकी दाभोलकर बंधूंचा उल्लेख करावा लागेल. स्वतः नरेंद्र दाभोलकर हे उत्तम कबड्डीपटू असल्याचा उल्लेख त्यांच्या एका मुलाखतीत ऐकला होता. पण पुढचं आयुष्य अंधश्रद्धानिर्मूनाला त्यांनी वाहून घेतलं. गेली अनेक वर्षे 'साधना' ह्या साप्ताहिकाचे ते संपादक होते.

आज सकाळी पुण्यात जे घडलं ते कडकडीत निषेध करण्याच्या पलीकडलं आहे. भयानक क्लेशदायक आहे. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. नुकतीच दाभोलकरांनी अंधश्रद्धानिर्मूलनसमितीच्या माध्यमातून जातपंचायतींच्या विरोधातली चळवळ सुरू केली होती. ह्या चळवळीला विरोध होणार हे उघडच होतं. पण महाराष्ट्रात असं काही घडेल ह्याची कल्पना नव्हती. जे घडलं ते अतिशय वाईट आणि निषेधार्ह आहे.

शासनाने दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा लवकरात लवकर छडा लावला पाहिजे. त्यांच्या दुष्कृत्याचं माप त्यांच्या पदरात घालून संविधानसंमत शिक्षा त्यांना झालीच पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...