सुबोध
सुबोध (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळी माणसं भेटत राहतात. काहींचा सहवास सातत्याने लाभूनही जवळीक मात्र निर्माण होत नाही. उलट काही लोक सहवासात नसले तरी मनांत घर करून राहतात. सुबोधला जाऊन आता महिना होत आला तरी ती बातमी खरी नाही, निदान खरी असू नये, असं वाटत राहिलंय. सुबोधशी मैत्रीचं नातं जुळलं ते फार वेगळं होतं. आम्ही परस्परांच्या व्यक्तिगत गोष्टी फारच क्वचित बोललो असू एकमेकांशी. रूढार्थाने ज्याला जीवलग मैत्री म्हणतात तिची लक्षणं ह्या मैत्रीत कुणाला क्वचितच दिसतील. पण तरी त्याच्या जाण्याने काही तरी हरवल्याची जाणीव मनात येतच राहिली. स्मरणं तपासू लागलो तर ह्या जाणिवेचा काही बोध होऊ शकेल असं वाटतं. इ. स. २००२च्या सुमारास संवाद ह्या वाचकगटाच्या कार्यक्रमात सुबोधची भेट झाली. नेमकी कधी ते आठवत नाही. पण एका कार्यक्रमानंतर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिल्याची नोंद माझ्या दैनंदिनीत आहे. त्या गप्पांत सहभागी असणाऱ्यांत सुबोधचं नाव आहे. संवाद ह्या वाचकगटाच्