हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

नव्या मराठी ओव्या

आज खूप दिवसांनी अचानक ह्या ओव्या स्फुरल्या. आता घरोघर अशा नव्या ओव्या घुमू लागायला हव्यात.

नव्या मराठी ओव्या

जात्यावरल्या ओवीत
माझ्या मराठीची साद
होती घुमत एकदा
इथे भिजल्या स्वरांत

तेव्हापासूनच तिचा
जडे यंत्रासवे संग
तिच्या करणीने धावे
साहाय्याला पांडुरंग

दिस जात्याचे सरले
आला संगणक हाती
तिच्या निरोपाच्या खुणा
महाजालही व्यापती

युनिकोडाचा संकेत
तिचे नवे सिंहासन
तिने झुगारले आता
स्थलकालाचे बंधन

आता जग सारे आहे
तिच्यासाठी भीमातीर
नव्या ज्ञानाच्या गजरी
दुमदुमे दिगंतर

तिच्या विजयाचे खांब
आता रोवा गावोगाव
घरोघरी जन्मू देत
नवे तंत्रज्ञानदेव

गुरुवार, ३ सप्टेंबर, २००९

शींव ते सायन : प्रवासाच्या निमित्ताने

मुंबईतल्या एका विभागाचं नाव शीव असं आहे. रेल्वेस्थानकावर, शासकीय व्यवहारात हेच नाव रूढ असलेलं दिसतं. मात्र लोकांच्या व्यवहारात (नि त्यामुळे काही वेळा प्रशासकीय व्यवहारातही) सायन असं नाव रूढ आहे. हा नावाचा शीव ते सायन हा प्रवास कसा झाला हे पाहणं गंमतीचं आहे. आपण रेल्वेस्थानकावरच्या ह्या नावाच्या पाट्या पाहिल्या तरी आपल्याला ह्या नामान्तराचा सहज बोध होऊ शकेल. पाटीवर देवनागरी लिपीत हे नाव शीव असं तर रोमी लिपीत SION असं लिहिलेलं आढळतं. त्यावरून सायन ह्या नावाचा उगम ह्या रोमी अक्षरवाटिकेत आहे हे उघड आहे. पण शीव ह्या नावाचं लेखन रोमी लिपीत सायन असं का व्हावं?
पूर्वी शीवऐवजी हे नाव शींव असं शिरोबिंदुयुक्त लिहिलं जात असे. माडगावकरांच्या ‘मुंबईचे वर्णन’ ह्या पुस्तकात असंच लेखन आढळतं. त्याचा उच्चारही सानुनासिक होत असावा. ‘SION’ हे रोमी लेखन खरं तर ह्याच लेखनाला वा उच्चाराला अनुसरणारं आहे. कसं ते पाहू. ‘श’साठी ‘S’ हे अक्षर आलं. ‘S’ ह्या अक्षराचा उच्चार अनेक ठिकाणी श असाच अभिप्रेत असतो. उदा. Sewari म्हणजे शिवडी (S = श). इकारासाठी I वापरलेला आहे. स्वराचा अनुनासिक उच्चार नि पुढे व येत असेल (शींव ह्यात ई हा सानुनासिक आहे नि त्यापुढे व येतो. श्-ई-ं-व्.) तर ‘व’साठी रोमी लेखनात O वापरून आधी येणाऱ्या अनुनासिकाच्या उच्चाराचं चिन्ह म्हणून येणारं N हे अक्षर O ह्या अक्षरानंतर लिहिण्याची प्रथा आहे. तुळा : गांव = GAON.
म्हणजे देशी भाषांतल्या उच्चारांचं वा लेखनाचं रोमीकरण करण्याच्या जुन्या संकेताप्रमाणे SION ह्याचं वाचन शींव असंच व्हायला हवं. पण हा संकेत ठाऊक नसलेल्या कुणी तरी SION ह्याचं वाचन LION ह्या वाचनाला अनुसरून सायन असं केलं असावं नि सध्या तेच रूढ होतं आहे.
शींव ते सायन हा प्रवास इथं संपत नाही. तो अनेक वेगवेगळे प्रश्न मनात उभे करतो आणि त्यांचा धांडोळा घेणं भाग पडतं. शीव हे नाव देवनागरीत वाचता येणारे असंख्य लोक त्या नावाचा उच्चार सायन असा रोमी लेखनाला अनुसरून का करतात? कारण उघड आहे. देशाला स्वातंत्र्य लाभून पन्नास वर्ष उलटली असली तरी इंग्रजी भाषेचा आणि रोमी लिपीचा दरारा अद्यापही लोकांच्या मनातून पुसला गेलेला नाही. देशी भाषांची आणि लिप्यांची उपेक्षाही संपलेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढतेच आहे. देशी भाषांतला ज्ञानव्यवहार दिवसेंदिवस उणावतो आहे. जो आहे तो केवळ इंग्रजीवर आधारलेला नि तेवढ्याच अर्थाने परभृत स्वरूपाचा आहे. त्यामुळे जे इंग्रजीतलं नि रोमीतलं तेच फारशी चिकित्सा न होता प्रमाण मानलं जातं. अनेकांना ह्या प्रकारात काही चूक आहे हेच उमगत नाही. स्वभाषेविषयी त्यांच्या भावना बोथटलेल्या आहेत. ते परभाषेलाच आपली भाषा मानत आहेत. तीच त्यांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा होऊ पाहात आहे. ह्यातून आपला मानसिक परधार्जिणेपणा आणि बौद्धिक आळसही दिसून येतो. ह्या आळसाची काही आणखी उदाहरणं लेखनाच्या संदर्भातच पाहता येतात.
कल्याण ह्या रेल्वेस्थानकाचं नाव देवनागरी ह्याच लिपीचे भेद वापरणाऱ्या हिंदी नि मराठीत वेगवेगळं होतं. एऱ्हवी कुणीही हिंदी भाषक ‘मेरा कल्यान करो’ असं लिहिणार नाही. पण स्थानकाचं नाव मात्र ‘कल्याण’ असं न लिहिता ‘कल्यान’ असंच लिहितात. स्थानिक उच्चाराचं योग्य देवनागरी लेखन उपलब्ध असताही कल्यानच का? तर ते रोमीवरून लिप्यन्तरायचं म्हणून.
दुसरं उदाहरण आपलं म्हणजे मराठी माणसांचं घेऊ. ओडिसा ह्या राज्याचं नाव आपण तरी ओरिसा असं का लिहितो. त्याच्या रोमी लेखनात R हे अक्षर आहे म्हणूनच ना? नृत्याचं नाव मात्र आपण ओरिसी असं न लिहिता ओडिसी असंच लिहितो. रोमी लेखनाचं अनुसरण. दुसरं काय? आपल्या शेजाऱ्याची ओळख आपल्याला परकीयांच्या मध्यस्थीवाचून करून घेता येत नाही. आणि ही परकीयांनी करून दिलेली ओळख बरोबर आहे की नाही ह्याची त्या शेजाऱ्याला विचारून निश्चिती करावी असंही आपल्याला वाटत नाही. हा ‘रोमी वाक्यं प्रमाणम्’चा प्रकार आपला बौद्धिक आळस नि अंध भक्तीच दाखवत नाही काय? आपापल्या लिप्यांत आपल्या देशातली स्थलनामं अचूक लिहावीत असं आपल्याला वाटतच नाही.
पानी, लोनी हे उच्चार ज्या शिक्षितांना खटकतात त्यांना वांद्र्याला बॅण्ड्रा म्हटलेलं खटकत नाही. बंगळूरु, मंगळूरु म्हणायला त्यांची जीभ अडखळते. बॅङ्गलोर त्यांना प्रतिष्ठेचं वाटतं. वस्तुतः ह्या नावांमधल्या ऊर ह्या भागाचं लेखन रोमीत ORE असं होत असे.
उदा.
Banglore बंगरूळ
Vellore वेलूर
Mysore मैसूर
Tagore ठाकूर
आपण ते ऊर असंच वाचलं पाहिजे (दक्षिणी नावांसंदर्भात उरु असं सुधारूनही घेतलं पाहिजे) हा विवेक आपल्याकडे उरलेला नाही. कारण अशा विवेकासाठी स्वतंत्र बुद्धी लागेल. आपल्याकडे तिची बहुतांश ठिकाणी वानवा आहे. साहेब बोबडं बोलतो म्हणून आपणही बोबडंच बोललं पाहिजे ही भावना आपल्या मनातून गेलेली नाही.
मराठीच्या देवनागरी लेखनसंकेतानुसार (हिंदीचा देवनागरी लेखनसंकेत मराठीहून अनेक ठिकाणी वेगळा आहे ह्याची आठवण ठेवली पाहिजे.) स्थल, व्यक्ती इत्यादींची नावं कशी लिहावीत हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. डॉ. अशोक केळकर ह्यांच्या वैखरी ह्या ग्रंथात भारतीय स्थलनामांचं लेखन कसं करावं ह्याविषयी एक लेख आहे. पण हा अपवाद वगळता (इतकी वर्षं जगाला शहाणं करणाऱ्या इंग्लिशेत शिकूनही) आपल्याला असं काही करावंसं वाटलेलं नाही. निदान भारतापुरता तरी हा प्रयत्न करून पाहायला हवा. त्यात अडचणी नसतील असं नाही. पण स्वतंत्र बुद्धीने काही तरी केल्याचा आनंद त्यात नक्कीच असेल.शुक्रवार, १९ जून, २००९

मराठीत हे नीट सांगता येतं

प्रसारमाध्यमांतलं मराठी ऐकताना वाचताना अनेकदा आपल्याला त्रास होतो. ते हिंदी वा इंग्रजी वळणाचं मराठी ऐकताना वाचताना आपण चडफडतो. पण नुसतं चडफडण्याने काही साधणार नाही. आपल्याला त्या अ-मराठी वळणाच्या प्रयोगांच्या जागी मराठी वळणाचे प्रयोग कोणते आहेत हे सुचवावं लागेल. ज्यांना व्यवस्थित मराठी बोलावंसं वाटतं त्यांच्यासाठी सहाय्य म्हणून खाली अशा प्रयोगांची सूची करून देत आहे.
अनेकदा अमुक शब्द मराठी नाही असं कळत असतं पण त्याला चपखल मराठी शब्द सुचत नाही. अशा वेळी ही सूची पाहता येईल.

शब्द

  • चहलपहल : वर्दळ सकाळी ह्या ठिकाणी बऱ्यापैकी चहलपहल असते
  • गळ (णे) : विरघळ (णे) गळेल की टिकेल
  • दर्शक : प्रेक्षक मलिकेला दर्शकांचा पाठिंबा मिळतो आहे. (मराठीत दर्शक म्हणजे दाखवणारा. उदा. मार्गदर्शक/दर्शक विशेषण)वाक्य/वाक्यांश/वाक्प्रचार

  • माझी मदत कर : मला मदत कर
  • काट्याची टक्कर : अटीतटीचा सामना


शुक्रवार, १० एप्रिल, २००९

गौरी खरंच शिकू लागली आहे....

आज आमच्या वहिनींनी एक छान बातमी सांगितली. माझी पुतणी गौरी ही यंदा १०वीच्या वर्षाला बसणार आहे. ती मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते. मात्र आठवीत तिने निम-इंग्रजी (सेमी-इंग्लिश) वर्गाच्या तुकडीत प्रवेश घेतला होता. ह्या तुकडीला इंग्रजीतून विज्ञान आणि गणित हे विषय शिकवतात. कारण मराठी माध्यमातली मुलं ११वीत गेल्यावर तिथे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी हेच असतं. तिथे मराठी मुलं मागे पडतील अशी भीती काही पालकांना आणि काही शिक्षकांना (!) वाटते. ही भीती ते मुलांच्याही मनात घालतात. त्यावर हा उपाय शोधलेला आहे.
मला आठवतं आहे की गौरीनेही ह्या तुकडीत प्रवेश घेतला आहे हे वहिनींनी मला सांगितलं होतं. माझी मतं ह्यासंदर्भात किती कडवी आहेत हे त्यांना माहीत होतं. मी त्यांच्यापाशी "हा सर्व मूर्खपणा आहे" असं म्हणाल्याचंही मला आठवतंय. पण मी नंतर गौरीशी किंवा वहिनींशी ह्या विषयावर काहीच बोललो नव्हतो.
मुळात देशीभाषकांच्या इंग्रजीकरणाचा हा एक टप्पा आहे.त्यात देशी भाषांना उघड विरोध नाही. पण गणित आणि विज्ञान हे 'प्रागतिक' विषय आहेत ना! त्यांना प्रागतिक भाषेची जोड हवी. म्हणून ते इंग्रजीत शिकवायचे. अशा मुलांच्या वेगळ्या तुकड्या काढायच्या. त्या मुलांत आणि समाजात खोट्या समजुती पसरवायच्या असा हा डाव आहे. आणि हा डाव आपल्याच देशातले इंडियायी लोक खेळत आहेत. परके नव्हेत. बरं हेच दोन विषय का? इतिहास पुढे इंग्रजीत शिकावा लागला तर तो कठीण होत नाही? का इतिहासाचं इंग्रजी सोपं असतं? खरं असं आहे की सर्वच शिक्षण इंग्रजीतून द्या असं ज्यांना म्हणता येत नाही त्यांच्यासाठी हा मधला सापळा लावलेला आहे. एऱ्हवी सेमी-इंग्रजी घेतलेले सगळेच त्याविषयांत झेंडा फडकवणार आहेत आणि मराठीतून शिकणारांना तो फडकवताच येणार नाही असं थोडंच आहे? असो.
आज वहिनींनी मला सांगितलं की गौरीने पुन्हा पूर्ण मराठी माध्यमाच्या तुकडीत प्रवेश घेतला आहे. झालं असं की ह्या निम-इंग्रजी वर्गात गेल्यावर तिच्या असं लक्षात आलं की तिचा बहुतेक वेळ मजकूर समजून घेण्यातच चालला आहे. विषयाची जाण कमी होते आहे. गौरी ही मुळात खेळाडू आहे. ती टेनिसपटू आहे. त्या खेळात तिला विलक्षण रस आहे. तिने आपला काही वेळ ह्या खेळासाठी देणं फारच आवश्यक आहे. पण ह्या तुकडीत गेल्यावर गुणांची टक्केवारी घसरली. आणि तिचं तिलाच हे कळू लागलं. शेवटी तिने आईला सांगितलं. आणि शाळेत सांगून आपली तुकडी बदलून घेतली.
पण हे सगळं इतकं सहज घडलं नाही. काही शिक्षकांना हा प्रकार विलक्षण चुकीचा वाटला. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू हुशार मुलगी आहेस. उगाच असं का करतेस? पुढे सर्वच विषय इंग्रजीतून शिकायचे आहेत. तेव्हा काय करशील? इ.
ह्या प्रकरणात मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे गौरी आपल्या निर्णयावर ठाम होती. तिचं म्हणणं असं होत की पुढे काय करायचं ते मी पाहून घेईन. पण आता माझा बराच वेळ इंग्रजी समजण्यात जातो. विषय कळतच नाही. घोकंपट्टी होते. त्यापेक्षा मराठीतूनच शिकणं बरं आहे.
ही गोष्ट कळल्यावर मला खूप आनंद झाला. केवळ इंग्रजी टळल्याचा हा आनंद नव्हता. तो आहेच. पण आपल्याला आपला निर्णय घेता आला पाहिजे. तो घेण्याची क्षमता ज्यातून येते ते शिक्षण. एवढ्या विरोधात, जग हेटाळणी करेल हे कळत असून आपल्या वेगळ्या निर्णयावर ठाम राहणं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. नकळत का होईना पण गौरी खरंच शिकू लागली आहे.
हे सेमी-इंग्रजीचं खूळ कुणी काढलं ते माहीत नाही. ही एक नवी जातिव्यवस्था आहे. आणि गंमत म्हणजे तोंडाने सतत समतेचा घोष करणारेच एकतर त्याच्या बाजूने आहेत किंवा त्याला मूक संमती देत आहेत. खरं तर आपल्या देशात अदृश्यपणे २ राष्ट्रं वावरत आहेत. एक आहे इंडिया आणि दुसरा आहे भारत. इंडियाची एकमेव भाषा इंग्रजी आहे तर भारतात बऱ्याच भाषा आहेत. इंडियाचं धोरण तोंडाने विविधतेचा जप करायचा आणि प्रत्यक्षात मात्र विविधतेवर वरवंटा फिरवायचा असंच आहे. उघड आहे ना, निमूटपणे (इंडियावाले ह्याला पीसफुली असं म्हणतील) इंग्रजीचं राज्य लोकांनी स्वीकारावं असं वाटत असेल तर असले विषप्रयोग लपूनछपूनच करायला हवेत.
त्यामुळे विविधतेची भाषा करणारे इंडियायी लोक मुंबईत आपल्या दुकानांना मराठीतल्या पाटीचा विटाळ होणार नाही ह्याची काळजी घेतात. महानगरपालिकेने तसा कायदा केला असला तरी त्याविरोधात न्याय मागायला न्यायालयात धाव घेतात. त्यांच्या शाळांत त्यांना फक्त इंग्रजीच हवी असते. तिथे मराठी शिकवा म्हटलं की लगेच मुलांवरच्या अभ्यासाच्या ओझ्याची आठवण होते. फक्त उच्च पातळीवर असं ओझं देशातल्या अन्यभाषिक लोकांना इंग्रजीतूनच शिकावं लागतं तेव्हा वाटत असेल का हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. तिथे मग शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न निघतो. आणि देशी भाषा ह्या त्या इंग्रजी नसल्याने तर्कतःच मागासलेल्या आहेत.
तुम्ही उच्च शिक्षणात सर्वत्र मराठी अनिवार्य झाली पाहिजे असं नुसतं बोलून पाहा. लगेच असं बोलणं कसं एकारल्या विचाराचं आहे ह्याचे धडे तुम्हाला मिळतील. शेवटी ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं. आधुनिक जगात बहुभाषिक असणं अनिवार्य आहे. फक्त कोणत्या भाषा शिकणं अनिवार्य आहे ते आम्ही सांगतो. इंग्रजी येणं अनिवार्य आहे. देशी भाषा वगळा त्या बहुभाषिकतेतून.
जगात इंग्रजीचं स्थान आचंद्रसूर्य आहे तेच राहणार आहे असं इंडियायींना वाटतं. चीनी, अरबी ह्या भाषांना कधीच वर्चस्व लाभणार नाही. त्या इंग्रजी थोड्याच आहेत? चीनी, जपानी लोकही इंग्रजी शिकतात. फक्त ते थोडे मागासलेले असल्याने आपल्या भाषांना धरून राहतात. तिथे विकायच्या उत्पादनांची माहिती त्यांना अजून त्यांच्या भाषांत हवी असते. पण ह्या दृष्टीने इंडिया प्रगत आहे. देशी भाषांचे गळे आवळतोच आहोत आम्ही.
बरं, देशाच्या अखंडत्वाचा प्रश्न आहेच. पण हे अखंडत्व स्वाभाविक आहे की लादलेलं आहे? असा प्रश्न विचाराल तर लक्षात ठेवा. हा देशद्रोह ठरेल. मुंबईत राहणाऱ्या अन्य भाषकांनी मराठी शिकायलाच हवी असं म्हणालात कीत्यांना मराठी लादली जात्येय असं वाटतं. शासनव्यवहारात, शिक्षणव्यवहारात, आर्थिक आणि अन्य सामाजिक व्यवहारांत आपण इथल्या समाजावर स्वातंत्र्यानंतरही इंग्रजी लादत आहोत हे त्यांना आठवत नाही? कसं आठवेल? कारण इंग्रजी हीच जगाची भाषा आहे ना. ती जगाची अगदी स्वाभाविक भाषा आहे. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल किंवा तुम्ही इंग्रजीला विरोध करत असाल तर तर्कतःच तुम्ही मागासलेले, प्रांतीय, जातीयवादी, संकुचित मनोवृत्तीचे, रूढीवादी, शुद्धिवादी, एकारलेले, न्यूनगंडी, अहंगडी, बदलाला विरोध करणारे इ. ठरता. इंग्रजीच्या बाजूने असाल तर तुम्ही पुढारलेले, राष्ट्रीय, उदार, वैश्विक मनोवृत्तीचे, सुधारक, समावेशक, व्यापक, आत्मविश्वासू, विनयशील, नव्याचं स्वागत करणारे होता.
गौरीला आज हे सारं उमगलं असेल असं नाही. पण तिने तिच्या बुद्धीने तिच्यापुरता जो निर्णय घेतला तसा निर्णय घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. मुद्दा इंग्रजी ही भाषा शिकण्याचा नाहीए. मुद्दा आहे तो एका झापडबंद समजुतीचा. एका भयाचा. एका ढोंगाला बळी पडण्याचा. माझ्या समाजाची भाषा ही त्याच्या आत्मखुणेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अगतिक होऊन ती आत्मखूण त्याला सोडावी लागावी हे मला अपमानास्पद वाटतं. इंग्रजीवाचून आपल्याला तरणोपाय नाही, आपण आपली भाषा बोलून ज्ञानव्यवहार करूच शकणार नाही, प्रगती करू शकणार नाही हे सर्व समज नाहीसे झाले पाहिजेत. कधी तरी असं होईल असं मला नक्की वाटतं.

रविवार, १ फेब्रुवारी, २००९

इथेही मराठीच...

ह्या अनुदिनीवर मराठीच्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर विषयांवर लिहायचं असं ठरवलं. पण अन्य माध्यमाच्या शाळांना मराठी भाषा शिकवण्याचे सक्तीचे आदेश महाराष्ट्र-शासनाने दिल्याची बातमी आत्ताच दूरदर्शनवर ऐकली आणि माझ्या नव्या अनुदिनीच्या पहिल्या लेखाचा विषयही मराठीकडेच वळणार हे निश्चित झालं. माझे मित्र मला म्हणतील इथेही मराठीविषयीच लिहिणार असशील तर आणखी एक अनुदिनी कशाला हवी? पण काय करणार? ज्ञानदेवाने म्हटलंच आहे ना
आवडे ते वृत्ति किरीटी । आधी मनौनि उठी ।
मग काया, वाचा, दिठी ।करांसि ये ।।
जी गोष्ट रात्रंदिवस आपल्या मनाला वेढून राहिलेली असते ती वोलण्या-लिहिण्यात टळणार कशी? ग़ालिबमियाँनी म्हणून ठेवलंय 
दिल ही तो है न संग-ओ-खिश्त दर्द से भर न आए क्यूँ ।
रोएंगे हम हज़ार बार कोई हमें सताए क्यूँ ।।
तात्पर्य काय वाघ्याचा पाग्या झाला तरी येळकोट करायची सवय थोडीच जाणार आहे? मूळ स्वभाव जाईना!!!
महाराष्ट्र हे राज्य १९६०मध्ये अस्तित्वात आलं. असा आदेश काढायला मात्र २००९ हे वर्ष उजाडायला लागलं.आपलं  शासन मराठीविषयी किती तत्पर आहे हे ह्यातून दिसून येतं. आणि हा आदेश राबवायला काय करणार आहेत हे लगेच माहितीचा अधिकार वापरून विचारायला हवं.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. इतर माध्यमांतून (ही का अस्तित्वात आहेत ह्यावर कधी तरी सविस्तर लिहायचंच आहे) शिकणारे विद्यार्थी महाराष्ट्राच्या राजभाषेपासून वंचित का राहावेत? त्यांना ही भाषा शिकवण्याची व्यवस्था करणं हे शासनाचंच कर्तव्य आहे. जर राज्यात राज्याची राजभाषा न येणारी पिढी वावरत असेल तर ती गोष्ट म्हणजे शासनाच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे.
असो. उशिरा का होईना पण शासनाला जाग आली आणि असा निर्णय घेण्याची बुद्धी झाली हेही नसे थोडके. आपण शासनाचं अभिनंदन करू. आणि मराठीचं भलं करणारे ठाम निर्णय घेण्याची आणि ते यशस्वीपणे राबवण्याची परंपरा ह्यातून निर्माण व्हावी अशी सदिच्छा व्यक्त करू.
इथे मराठीबरोबरच इतर विषयांवर लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. पण ठेच लागली़ तर तोंडून मराठीची वेदना उमटणारच नाही ह्याची निश्चिती नाही.
पुन्हा भेटू 

सुबोध

  सुबोध   (छायाचित्राचे श्रेय : श्री. आशिष आल्मेडा) माणसामाणसांतल्या संबंधांमागचं काही गणित असेलही. पण मला तरी अजून ते उलगडलेलं नाही. आपल्या...